मुख्य सामग्रीवर वगळा

उत्तराखंडमधील एक निसर्गरम्य प्रवास - भाग एक

उगवतीचे रंग 

उत्तराखंडमधील एक निसर्गरम्य प्रवास - भाग एक 

कधी कधी आपल्या ध्यानीमनी नसताना अचानक प्रवासाचा असा एखादा योग येतो की तो एका वेगळ्याच वातावरणात आपल्याला घेऊन जातो. असेच काहीसे आमचे नैनिताल सहलीबाबत घडले. एप्रिल महिन्याच्या सुटीत पुण्याला गेलो असताना माझ्या मुलाने आम्हां दोघांना नैनिताल, कौसानी वगैरे निसर्गरम्य ठिकाणी तुम्ही जाऊन या म्हणून आग्रह केला. एवढे करूनच तो थांबला नाही, तर आम्हाला स्वतः ट्रॅव्हल्स कंपनीच्या ऑफिसमध्ये घेऊन गेला. आणि १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६ दरम्यान आमचे गिरिकंद हॉलिडेज तर्फे नैनिताल, कौसानी, रानीखेत, जिम कॉर्बेट या ठिकाणी जाण्याचे ठरले देखील ! सहलीला जाण्याच्या दोन दिवस आधी पुन्हा एकदा आम्ही गिरिकंदच्या ऑफिसला भेट दिली. आम्हाला ज्या काही शंका होत्या, त्यांचे निराकरण करून घेतले. यावेळी माझी मुलगी सौ सारिका आमच्यासोबत आली होती. 

दोन तीन दिवस आधीपासूनच प्रवासाची तयारी सुरु होती. आठवणीने प्रत्येक गोष्ट घ्यावी लागत होती. कुठेही जायचे तर हल्ली आधार कार्ड, फोटो इ. गोष्टी लागतातच. ते आठवणीने घेतले. तिथे थंडी असणार असे आम्हाला सांगितले गेले होते. त्यामुळे थंडीचे कपडे, बूट मोजे या सगळ्या गोष्टी आवर्जून घेणे भाग पडले. विमानतळावर सामान चेक होते म्हणून लगेज बॅगमध्ये कोणत्या वस्तू ठेवायच्या, केबिन बॅग मध्ये कोणत्या वस्तू ठेवायच्या याचा विचार करून बॅगा भरल्या जात होत्या. १९ एप्रिलचा दिवस अक्षय तृतीयेचा होता. पण आमच्या प्रवासाची सुरुवातच त्या दिवशी होणार होती. मनात म्हटले ' प्रत्येक वेळी अक्षय तृतीया आपण घरीच साजरी करतो. यावेळी ती प्रवास करून साजरी करू या. १९ तारखेला पहाटे तीन वाजताच उठावे लागले. पुण्याहून सकाळी साडेसात वा. इंडिगो विमानाने प्रवास ठरला होता. साडेचारला तयार होऊन कॅबने विमानतळावर पोहोचलो. 

चेकिंगच्या सर्व सोपस्कारातून यशस्वीपणे पार पडलो. आमचे विमान येणार त्या नियोजित गेटजवळ येऊन थांबलो. आमचा एकूण १८ जणांचा ग्रुप होता. त्यातील दोन व्यक्ती मुंबईहून परस्पर येणार होत्या. आमच्याजवळ असलेल्या कंपनीच्या ठराविक हॅन्डबॅग आणि कॅप यांच्या साहाय्याने विमानतळावरच आम्ही आमच्यासोबत सहलीला येणाऱ्या सहप्रवाशांना ओळखले. बरोबर पावणेसातच्या सुमारास आम्हाला विमानात प्रवेश देण्यात आला. आणि ठरलेल्या वेळेला म्हणजे सकाळी साडेसातला विमानाने हवेत झेप घेतली. ९.४५ ला आम्ही दिल्ली विमानतळावर होतो. तिथून सामान घेऊन बाहेर पडल्यानंतर आम्हा सर्वांना एका ठिकाणी थांबण्यास सांगितले होते. 

आमचा टूर मॅनेजर अक्षय गुप्ता बाहेर आमच्या स्वागतासाठी उभाच होता. त्याने आपल्या सहज संवाद साधण्याच्या पद्धतीने थोड्याच वेळात आम्हा सगळ्यांना आपलेसे केले. थोड्याच वेळात गिरिकंदची बस आली. आम्ही सगळे बसमध्ये बसलो आणि आमचा दिल्ली ते भीमताल असा प्रवास सुरु झाला. हा प्रवास साधारणपणे ७ ते ८ तासांचा आहे. दिल्ली ते भीमताल हे अंतर ३११ किमी आहे. आमची बस दिल्लीतील प्रमुख रस्त्यांवरून धावत होती. अकबर रोड, इंडिया गेट, दिल्लीतील vip लोकांचे बंगले आमच्या दृष्टीस पडत होते. आमचा टूर मॅनेजर अक्षय आम्हाला अधूनमधून त्याबद्दल माहिती देत होता. एकदा मध्ये थांबून चहा नाश्ता झाला. परत एकदा जेवणासाठी बस एका ठिकाणी थांबली. त्याठिकाणी उत्तम गरमागरम जेवणाचा आनंद सर्वांनी घेतला. उत्तर प्रदेश मधून उत्तराखंडकडे बस धावत होती. आम्ही जाणार होतो तो सगळा भाग कुमाऊं रिजनमध्ये येतो. हा सगळा भाग हिमालयाच्या पर्वतराजीने समृद्ध आणि नटलेला आहे. दिल्लीतून बाहेर पडताना मोठमोठे फ्लायओव्हर्स, अनेक पदरी रस्ते होते. त्यामुळे बस भराभर पुढे वाटचाल करीत होती. एकामागून एक गावे मागे पडत होती. 

उष्ण प्रदेश मागे टाकून आमची वाटचाल थंड प्रदेशाकडे होत होती. लवकरच हिमालयाच्या पर्वतराजीमध्ये बसने प्रवेश केला. मोठे भव्य रस्ते आता मागे पडून पहाडातील अरुंद रस्ते दृष्टीस पडत होते. साहजिकच बसचा वेगही कमी झाला होता. घाटातील रस्त्यांवर आमच्या बसचा ड्रायव्हर अतिशय कौशल्यपूर्वक बस चालवत होता. शहरी वर्दळ, इमारतींचे जंगल मागे पडले होते. खरेखुरे जंगल आणि हिरवीगार वृक्षराजी आमचे मन मोहून घेत होती. सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी वृक्षांमध्ये जणू स्पर्धा लागली होती. त्यामुळे एकमेकाला न दुखवता ते आपली उंची वाढवत होते. दुसऱ्याच्या पुढे जायचे असेल तर त्याची रेघ लहान न करता आपली रेघ मोठी करावी हेच वृक्ष अप्रत्यक्षरीत्या तर सांगत नव्हते ? 

आता संध्याकाळ होत आली होती. नैनितालपासून साधारण बावीस किमी अलीकडे असणाऱ्या भीमताल या ठिकाणी आमचा आजचा मुक्काम होणार होता. बसने आता भीमताल या ठिकाणी प्रवेश केला आणि तिथे ज्या ठिकाणी आमचा मुक्काम होणार होता, त्या हरशिखर हॉटेलच्या दिशेने आमची बस धावत होती. हॉटेल हरशिखर उंचावर आहे. शिखरच जणू ! तिथे पोहोचले आणि तिथून जे काही दृश्य डोळ्यांना दिसले, त्यामुळे अक्षरशः डोळ्यांचे पारणे फिटले. जणू स्वर्गच धरतीवर अवतरला होता !हॉटेलच्या समोरच भीमताल लेक होते. त्याच्या पाठीमागे हिमालयीन पर्वतराजी. सरोवरातील पाणी, त्यात पडलेले मावळत्या सूर्याचे मनमोहक प्रतिबिंब या सगळ्यांवरून नजर हटत नव्हती. सगळ्यांचे कॅमेरे फोटो काढण्यात व्यस्त होते. कोणत्याही अँगलने कोठलाही फोटो घ्या. तो छानच येणार यात काही शंका नव्हती. 

हॉटेलच्या रस्त्यावर आणि हॉटेलमधील प्रत्येक ठिकाणी विविधरंगी फुले लक्ष आकर्षून घेत होती. निसर्गाने आपल्या सौंदर्याची मुक्तहस्ते उधळण केलेली होती. हा फोटो घेऊ की तो घेऊ असे प्रत्येकाला झाले होते. आता अंधार पडत आला होता. इथे संध्याकाळ इतकी छान दिसते तर सकाळ कशी असेल हा प्रश्न मला पडला होता. पण आम्ही भाग्यवान होतो. सकाळी हा सगळा नजारा आम्हाला मनसोक्त बघायला मिळणार होता. दोन दिवस आमचा इथे मुक्काम होणार होता. हॉटेलच्या स्टाफने आम्हा सर्वांचे मनापासून स्वागत केले. वेगवेगळ्या फ्लेवरची सरबते आम्हाला दिली गेली. ज्याला जे आवडेल, ते त्याने घ्यायचे. हॉटेलच्या रुमदेखील अतिशय देखण्या आणि स्वच्छ. अत्यंत सुखद असे थंड वातावरण होते.  रात्री विविध प्रकारच्या चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेतला. उद्याचा दिवस कसा असेल असा विचार करीत झोपी गेलो. दिवसभरचा प्रवासाचा थकवा असल्याने केव्हा निद्रादेवीच्या अधीन झालो ते कळलेही नाही. ( क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

९/५/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...