मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग ६६

उगवतीचे रंग 

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ६६

नव्हे सार संसार हा घोर आहे ।

मना सज्जना सत्य शोधूनि पाहे ।

जनीं वीष खाता पुढे सूख कैचें ?

करी रे मना ध्यान या राघवाचे ।६६।

अर्थ 

हे मना, हा संसार अनित्य आणि असार आहे. घोर म्हणजे भयंकर आहे. तूच याचा जरा विचार करून सत्य शोधून काढ. एखाद्याने विष भक्षण केले तर ते वाईट परिणाम केल्यावाचून कसे राहील ? तेव्हा तू भगवंताची भक्ती कर. 

विवेचन 

या श्लोकामध्ये संसाराचा फोलपणा समर्थ आपल्याला पटवून देत आहेत. हा संसार असार आहे. विनाशी आहे. संसारात सुखी झाला आणि सुखदुःखे भोगावी लागली नाही असा मनुष्य आढळणे कठीण !त्यातून संसार घोर म्हणजे भयंकर आहे. संत या सगळ्यातून गेले आहेत. संत तुकारामांना भयंकर असा दुष्काळाचा सामना करावा लागला. त्यात मुलेबाळे, पत्नी यांची आहुती गेली. पण संसाराचा फोलपणा त्यांच्या लक्षात आला होता. त्यामुळेच त्यातून बाहेर काढणारी एकच गोष्ट त्यांना माहित होती. ती सारभूत गोष्ट म्हणजे विठ्ठल. त्याचाच ध्यास त्यांनी घेतला होता. सर्वच संतांनी संसाराचा हा फोलपणा लक्षात घेऊन जनसामान्यांना ईश्वरभक्तीचा उपदेश केला. आम्हाला संतांचे सांगणे समजत नाही असे नाही. पण त्यातील फोलपणा ध्यानी घेऊनही आम्ही या विषाचा अनुभव घ्यायला तयारच असतो. विष खाल्ले की ते त्याचे परिणाम दाखवणारच ! विष खाल्ले आणि चांगला अनुभव आला असे कधी होऊच शकत नाही. ते त्याचा प्रभाव दाखवणारच. इथे विष म्हणजे विषयासक्ती असाही अर्थ घेता येईल. 

म्हणून समर्थ या श्लोकात म्हणतात," हे मना, दुसऱ्यांचे सांगणे तुला पटत नसेल तर तू स्वतः अनुभव घेऊन बघ. तू स्वतः त्यातील सत्य शोधून काढ. कधी कधी माणसे दुसऱ्याच्या अनुभवाने शहाणे होत नाहीत. म्हणून स्वतःला जो अनुभव येतो, त्यावर सारासार विचार करून त्यातून तरी योग्य निष्कर्ष आपल्याला काढता आला पाहिजे. समर्थ आपल्याला संसाराचा त्याग करा असं सांगत नाहीत तर त्यातील फोलपणा ध्यानी घेऊन त्यातील आसक्ती कमी करा असेच त्यांचे सांगणे आहे. संसाराकडे साक्षीभावाने आपल्याला पाहता आले पाहिजे. पाण्यात आणि चिखलात राहूनही जसे कमळ त्यापासून अलिप्त असते तसेच आसक्तिरहित आपल्याला संसारात राहता आले पाहिजे. 

एकदा सत्य लक्षात आल्यानंतर मग त्यातून बाहेर पडण्याचा उपाय करता येतो. संसार करताना आपल्या लक्षात येतं की आपल्याला समजायला लागल्यापासून आपण या प्रपंचात किती गुंतत चाललो आहोत. सगळ्यांची मने सांभाळताना आपली किती ओढाताण होते आहे ! किती दिवस ही लटकी नाती जपायची ? कोणाकोणाचा अहंकार जपायचा ?पैसा कमवायचा तरी किती ? किती पैसा मिळवला म्हणजे तो पुरे झाला असे होते ? ही संपत्ती, हे घरदार मी कोणासाठी कमावतो आहे ? हे सगळे तर इथेच ठेऊन जावे लागणार आहे. आपल्यापुढे दोनच पर्याय असतात. एकतर ठेऊन जा, नाहीतर देऊन जा. बरोबर घेऊन जाण्याचा पर्याय आपल्याला परमेश्वराने दिलेला नाही. बरं, ज्यांच्यासाठी हे सर्व करावं, ती पोरंबाळं तरी नंतर आपल्याला विचारतील याची काय खात्री आहे ? गेल्यानंतर काही दिवस आपली तसबीर भिंतीवर लागेल. तिची पूजा होईल. काही दिवसांनी तीही निघून जाईल. हे जगच अनित्य आणि मर्त्य आहे. आधीच्या श्लोकांत समर्थांनी सांगितल्यानुसार ' मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे.' अशी परिस्थिती असते. तरी आपल्याला केवढा गर्व असतो, आपल्या पैशाचा, रूपाचा, सत्तेचा !

हा सगळा विचार कदाचित कोणाला निराशावादी वाटण्याची शक्यता आहे. पण वस्तुस्थितीकडे डोळेझाक केली तरी वस्तुस्थिती थोडीच बदलते ! उलट वस्तुस्थिती समजली तर त्यातून बाहेर पडण्याचा उपाय करता येतो. यावर एकच उपाय आहे. असार संसाराला बाजूला सारून जे सार म्हणजे रामनाम आहे, तेच जीवी धरावे. धान्य पाखडण्याचे सूप आपल्याला माहिती असेल. धान्य पाखडताना ते त्यातील असार म्हणजे खडे, केरकचरा आदी बाहेर टाकून देते. आणि सार म्हणजे जे धान्य आहे ते धरून ठेवते. आपणही सुपाची भूमिका करावी. असार सर्व सोडून द्यावे आणि सार म्हणजे भगवंत त्यालाच घट्ट धरून ठेवावे. रामरायाचे ध्यान सर्व सुख देणारे आहे. ते ' मंगल दर्शन पूर्णविराम ' असे आहे. " म्हणून हे मना, या राघवाचे ध्यान कर "असे समर्थ तळमळीने आपल्याला सांगत आहेत. 

 स्वसंवाद

१) मी संसार करताना त्यात अडकतो आहे का, की त्याकडे साक्षीभावाने पाहतो आहे?
२) “विष” म्हणून सांगितलेली विषयासक्ती माझ्या जीवनात कोणत्या रूपात आहे?
३) मी इतरांच्या अनुभवातून शिकतो का, की स्वतः धडपडूनच शिकतो?
४) माझ्या आयुष्यात “सार” आणि “असार” यातील फरक मला स्पष्टपणे कळतो का?
५) मी रोजच्या जीवनात भगवंताच्या स्मरणासाठी वेळ काढतो का, की तो पुढे ढकलतो?

(क्रमशः)

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
 ०६/०५/२०२६
प्रतिक्रियेसाठी : ९४०३७४९९३२
(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा)








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...