उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ६५
नको दैन्यवाणे जिणे भक्तिऊणे ।
अती मूर्ख त्या सर्वदा दुःख दूणे ।
धरी रे मना आदरे प्रीती रामी ।
नको वासना हेमधामी विरामी ।६५।
अर्थ
भक्तीविना जीवन म्हणजे दीनवाणे जगणे. ज्या मुर्खांना हे कळत नाही, त्यांचे दुःख वाढतच जाते. म्हणून हे मना, आदरपूर्वक रामावर प्रेम करायला शीक. सोन्याचे घर जरी असले पण त्यात रामाचा निवास नसला तर त्याची कामना काही उपयोगाची नाही.
( भक्तिऊणे - भक्तीशिवाय, जिणे - जगणे, दूणे - दुप्पट, हेमधामी - सोन्याचे घर, विरामी - ज्यात राम नाही असे )
विवेचन
आधीच्या श्लोकात समर्थांनी अति काम किंवा अति लोभामुळे काय होते ते सांगितले. या श्लोकामध्ये ते आपल्याला भक्ती विना जीवन म्हणजे काय हे सांगत आहेत. ज्याप्रमाणे अति काम आणि क्रोध यांच्यामुळे व्यक्तीचे जगणे लाचारीचे होते, त्याप्रमाणेच भक्तीशिवाय जीवन म्हणजे दैन्यवाणे जगणे. भक्ती म्हणजे शक्ती ! ती दिसत नाही पण जो ती मनापासून करतो, त्याला ती जाणवते. सुदामा हा श्रीकृष्णाचा मित्र जरी असला तरी प्रामुख्याने तो त्याचा भक्त होता. जवळ पैसा, वैभव नव्हते पण भक्तीचे तेज होते, शक्ती होती. अनेक संतांना विपरीत परिस्थितीत दिवस कंठावे लागले. त्यांच्याजवळ सत्ता, संपत्ती, वैभव यांचा अभाव होता. पण भक्तीची दौलत अपार होती. या भक्तीचे तेज त्यांच्या मुखावर विलसत होते. कोणत्याही परिस्थितीत आनंदी आणि समाधानी राहण्याची त्यांची वृत्ती होती.
पण ज्यांची भगवंतावर श्रद्धा नाही, असे लोक भक्तीविना जगतात. अशा लोकांचा कोणीही सहज बुद्धिभेद करू शकतो. देव कुठे आहे ? उगाचच त्यावर श्रद्धा ठेवून कशाला जगायचे ? जीवन आहे तोपर्यंत मौजमजा करून घ्या. असे सांगणारे लोक भेटतात. आपल्याला अशा गोष्टी लवकर पटतात. त्यामुळे भगवंतावरील श्रद्धा विसर्जित करून आपण ऐहिक जीवनाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतो. पण ऐहिक जीवनात जेव्हा पदोपदी अपयशाचे, अपमानाचे प्रसंग येतात, संकटे येतात तेव्हा माणूस खचतो. कारण कुठेही श्रद्धा नसते. कुठलाही आधार नसतो. ' Faith can move mountains ' अशी एक इंग्रजी म्हण आहे. श्रद्धेचे सामर्थ्य अपार असते.श्रद्धा तारक आहे. प्रल्हादाची भगवंतावर श्रद्धा होती. या श्रद्धेनेच त्याला सर्व प्रसंगातून तारून नेले. परंतु श्रद्धाहीन माणसाच्या जीवनात दुःखाचा गुणाकार होतो. म्हणूनच समर्थ तळमळीने आपल्याला आदरपूर्वक रामावर श्रद्धा ठेवायला, प्रेम करायला सांगतात.
हेमधामी आणि विरामी ही दोन विशेषणे समर्थांनी फार सुंदर योजली आहेत. हेमधामी म्हणजे सोन्याचं घर, राजवाडा. विरामी म्हणजे रामाशिवाय. हल्ली काही घरांमध्ये ' हे घर श्री महाराजांचे आहे ' अशी पाटी लावलेली आढळते. म्हणजे राहणाऱ्यांची अशी श्रद्धा असते की या घरात महाराज किंवा भगवंत राहतो. हे त्याच्याच मालकीचे आहे. म्हणजे भगवंताच्या छत्रछायेत आपण राहत असतो. आणि इथे भगवंत आहे ही भावनाच किती सुंदर ! असे घर म्हणजे मंदिरच ! हीच कल्पना थोडी आणखी विस्तारली तर आपला देह म्हणजे सुद्धा भगवंताचे निवासस्थान असेही आपल्याला म्हणता येते. त्याच्या श्रद्धेविना असलेला देह म्हणजे फक्त हाडामांसाचे शरीर !
घर सोन्याचे असले तरी घरात राहणाऱ्यांची जर भगवंतावर श्रद्धा नसेल, तर असे घर म्हणजे चार भिंतींचा एक तुरुंग !सोन्याचे घर म्हणजे राजवाडा, वैभव ! पण जिथे राम नाही त्या घराची किंमत शून्य. ज्या दगडांवर रामनाम लिहिले जाते, ते दगड सुद्धा तरतात. रामावर म्हणजे भगवंतावर श्रद्धा नसलेली व्यक्ती म्हणजे मूढ पाषाणच ! या संसार सागरात ती बुडणारच हे ठरलेले आहे !महाभारत युद्धाच्या प्रसंगी अर्जुन आणि दुर्योधन श्रीकृष्णाकडे मदत मागण्यासाठी जातात. भगवंत म्हणतात, " एका बाजूला निःशस्त्र असलेला मी आहे आणि दुसऱ्या बाजूला माझी नारायणी सेना. त्यातून ज्याला जे हवे ते त्याने मागून घ्यावे. " या प्रसंगी दुर्योधन नारायणी सेना मागून घेतो आणि अर्जुन भगवंताला. ही कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण अर्जुनाची भगवंतावर दृढ श्रद्धा होती. म्हणून मला भगवंतच हवा असे त्याला ज्या तीव्रतेने वाटले तसे दुर्योधनास वाटणे शक्यच नव्हते. नारायणाशिवाय नारायणी सेना काय कामाची ? म्हणून अर्जुनाला जसे तीव्रतेने वाटले की मला भगवंतच हवा तसे आपल्यालाही वाटले पाहिजे. तेव्हा हे मना, आदरपूर्वक रामरायावर प्रेम करायला शीक हेच समर्थांचे सांगणे आहे.
स्वसंवाद
१) माझ्या जीवनात श्रद्धेचा आधार किती आहे ? संकटाच्या वेळी मी खचतो की स्थिर राहतो?
२) मी ‘नारायणी सेना’ (संपत्ती, साधने) निवडतो की ‘नारायणाची ' निवड करतो ?
३) माझे घर ‘हेमधामी’ आहे की ‘रामधामी’ ?
४) माझ्या आनंदाचा स्रोत बाह्य गोष्टींमध्ये आहे की अंतर्मनातील भक्तीत?
(क्रमशः)
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
दिनांक : ०५/०५/२०२६
प्रतिक्रियेसाठी : ९४०३७४९९३२
(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा