मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग ६३

उगवतीचे रंग 

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ६३

घरी कामधेनू पुढे ताक मागे ।

हरीबोध सांडूनि वेवाद लागे ।

करी सार चिंतामणी काचखंडे ।

तया मागता देत आहे उदंडे । ६३ ।

अर्थ 

एखाद्याच्या घरी कामधेनू आहे. पण तो दुसऱ्याच्या घरी ताक मागू लागला तर ही हास्यास्पद गोष्ट ठरते. त्याप्रमाणे आपल्यापाशीच असणाऱ्या भगवंताकडे दुर्लक्ष करून एखादा व्यर्थ वाद घालू लागला तर त्याचे जीवन वाया जाते. एखाद्याच्या हातात चिंतामणी आहे, परंतु तो त्याच्याकडे केवळ काचेच्या तुकड्यांची मागणी करू लागला तर अशा माणसाचे वागणे हास्यास्पद आणि मूर्खपणाचे ठरते. 

( हरीबोध - परमेश्वराचे ज्ञान, वेवाद - व्यर्थ /निष्फळ वाद, काचखंडे - काचेचे तुकडे )

विवेचन 

या आधीच्या श्लोकात समर्थांनी आपल्याला निजध्यास तुटला म्हणजे काय हे सांगितले. या श्लोकातही तोच मुद्दा पण वेगळ्या शब्दात ते आपल्याला समजावून सांगत आहेत. माणूस हा इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आणि वेगळा ठरतो तो त्याला मिळालेल्या बुद्धीच्या वरदानामुळे. या बुद्धीचा वापर करून तो आत्मज्ञान करून घेऊ शकतो. नराचा नारायण होण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. असे असताना कधी कधी तो अगदी हास्यास्पद वागतो. घरी कामधेनू आहे म्हणजे इच्छिलेले सर्व काही देणारी गोमाता आहे. पण याला त्याची जाणीवच नाही. हा दुसरीकडे ताक मागत फिरतो. इथे कामधेनू म्हणजे इच्छिलेले सर्व काही देणारा भगवंत. तो सदैव आपल्याजवळच असतो. पण याची जाणीव नसलेले अज्ञानी जीव मात्र त्याला शोधत इकडेतिकडे फिरतात.भोंदूबाबा, साधूंच्या नादी लागतात. भगवंत आपल्याजवळ आहे. त्याला शोधायला खरं तर कुठेच जायची गरज नाही. ' मंदिरात अंतरात तोच नांदताहे...' पण ही गोष्ट आमच्या लक्षातच येत नाही. आम्हाला परमेश्वरासंबंधी जे काही ज्ञान झाले आहे, ते सोडून देऊन आम्ही व्यर्थ , कोरडे आणि निष्फळ वादविवाद करत बसतो. 

समर्थ जसे कामधेनूचे उदाहरण देतात, तसेच ते चिंतामणी रत्नाचेही देतात. चिंतामणी हे एक दिव्य रत्न असून त्यामुळे जे हवे ते प्राप्त होते. परंतु काही मूर्ख माणसे मात्र अशा या दिव्य चिंतामणीच्या संपर्कात आले असताना देखील त्याच्याकडे काचेच्या तुकड्याची मागणी करतात. कामधेनू किंवा चिंतामणी ही रूपके समर्थांनी वापरली आहेत. परमेश्वर म्हणजे प्रत्यक्ष कामधेनू किंवा चिंतामणी ! इच्छिलेले देणारा. पण आम्हाला त्याचे महत्वाच कळत नाही. एकदा परमेश्वराची कृपा झाली की काही मिळवायचे बाकी राहत नाही. पण आम्ही मात्र जवळ कस्तुरी असूनही कस्तुरीच्या शोधात फिरणाऱ्या कस्तुरीमृगासारखे रानोमाळ भटकत राहतो. ' तुझे आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी ' अशी आमची अवस्था होते. 

हरीबोधाइतकी मौल्यवान कोणतीही गोष्ट नाही. आम्हाला हे समजते पण उमजत नाही. आमची श्रद्धा डळमळीत होऊ लागते. हरीबोध किंवा परमेश्वराची प्राप्ती ही इतक्या सहजासहजी होणारी गोष्ट नसते. त्यासाठी विवेक आणि श्रद्धा आवश्यक असतात. संयमाने उपासना सुरु ठेवावी लागते. पण एकदा का श्रद्धा डळमळीत झाली की नाना प्रकारच्या शंका मनात घर करू लागतात. या आधीच्या श्लोकात समर्थांनी निजध्यास सुटला म्हणजे काय घडते ते सांगितले होते. तेच अशा वेळी घडते. मग परमेश्वर आहे का ? तो मला प्राप्त होईल का ? मी एवढा वेळ कशाला वाया घालवायचा ? त्याऐवजी माझ्या हातात जे आनंदाचे क्षण आहेत, ते मी का गमवावे ? असा मनुष्य संतांशी देखील व्यर्थ वादविवाद करीत बसतो. ज्ञानेश्वरी, दासबोध, गीता वाचणारे त्यातील सांगितलेल्या गोष्टींवर श्रद्धा ठेवून त्याचे अनुकरण करण्यापेक्षा मला किती कळते हे दाखवण्याचा प्रयत्न करीत बसतात. ' ज्ञानेश्वरीच्या बाबतीत एक तरी ओवी अनुभवावी '  असे म्हटले जाते. पण आम्ही तिची अनुभूती घेण्यापेक्षा व्यर्थ, कोरडे वादविवाद करत बसतो. खरे ज्ञान तेच की हृदयापर्यंत पोहोचते.

 गोंदवलेकर महाराज म्हणतात, " मला विद्वानांबद्दल आदर आहे पण प्रेम नाही. "त्याचे कारण हेच आहे. विद्वान माणसे आपल्या पांडित्याचे प्रदर्शन करण्यात धन्यता मानतात. पण भगवंत प्राप्तीसाठी जी तळमळ, श्रद्धा आणि प्रेम लागते, तिचा अभाव त्यांच्यामध्ये असतो. भगवंत उदंड देणारा दाता आहे. त्याच्याकडे काय मागायचे हे आपल्याला कळले पाहिजे. भगवंताच्या रूपाने आपल्याकडे सर्वस्व असते. तोच असतो कामधेनू आणि चिंतामणी. तेव्हा त्याच्याकडे क्षुद्र गोष्टी कशासाठी आणि का मागायच्या ? पैसा, संसार, मुलेबाळे, सत्ता, प्रसिद्धी, कीर्ती हे तर सारेच मागतात. पण मला भगवंत हवा आहे हे मला तीव्रतेने वाटले पाहिजे. त्यासाठीच समर्थांची ही तळमळ !

 स्वसंवाद

१) माझ्याकडे आधीपासून असलेल्या गोष्टींची (श्रद्धा, ज्ञान, साधना) मला खरी जाणीव आहे का?

२) मी बाहेर बाहेर शोधण्यात जास्त वेळ घालवतो का, की अंतर्मुख होण्याचा प्रयत्न करतो?

३) मी आध्यात्मिक ज्ञान फक्त “समजून” घेतो, की खरोखर “जगतो”?

४) मी वाचन, चर्चा, वाद यांत अडकतो का, की प्रत्यक्ष साधना करतो?

५) माझ्या मनात शंका जास्त आहेत का, की श्रद्धा दृढ आहे?

६) मी “चिंतामणी” हातात असूनही “काचखंडे” मागत तर नाही ना याचा कधी विचार केला आहे का?

(क्रमशः)

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
४/५/२०२६
प्रतिक्रियेसाठी : ९४०३७४९९३२
(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा)


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...