मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग ६२

उगवतीचे रंग

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ६२

निजध्यास तो सर्व तूटोनि गेला |

बळे अंतरे शोक संताप ठेला |

सुखानंद आनंद भेदे बुडाला |

मनी निश्चयो सर्व खेदे बुडाला |६२|

अर्थ

भगवंताच्या भक्तीचा किंवा स्वस्वरूपाचा ध्यास एकदा तुटला की मनामध्ये शोक, संताप बळजबरीने ठाण मांडतात. सुख आणि आनंद नष्ट होतो आणि परमेश्वराच्या प्राप्तीचा मनामध्ये केलेला निश्चय देखील नष्ट होतो.

( निजध्यास - स्व स्वरूपाचे अनुसंधान, तूटोनी गेला - खंड पडला)

विवेचन

परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्यामध्ये सातत्य आवश्यक असते. त्याचा ध्यास किंवा वेड मनाला लागणे आवश्यक असते. सततचे अनुसंधान किंवा स्व स्वरूपाचे चिंतन परमेश्वर प्राप्तीसाठी आवश्यक असते. परंतु आपले मन जेव्हा वादात अडकते तेव्हा हे अनुसंधान तुटते. मनामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या शंका येऊ लागतात. मनाला काहीतरी काम देणे आवश्यक असते. रिकामे मन म्हणजे सैतानाचे घर असे आपण म्हणतो. जेव्हा परमेश्वराचे अनुसंधान तुटते तेव्हा या रिकाम्या मनामध्ये नको ते विचार गर्दी करू लागतात.

मनाचा मूळ स्वभाव शांततेचा आहे. जेव्हा सातत्याने परमेश्वराचे अनुसंधान, नामस्मरण, भजन, कीर्तन या गोष्टी सुरू असतात, तेव्हा मनामध्ये शांतता, सुख, समाधान आणि आनंद या गोष्टी नांदत असतात. परंतु ही शांतता, समाधान आणि आनंद मग भंग पावतात. शोक आणि संताप बळजबरीने मनाचा ताबा घेतात आणि मग आपण स्वतःला दुःखी करून घेत असतो.

अशी अवस्था जेव्हा आपल्या मनाची द्विधा स्थिती असते तेव्हा होते. संतांनी सांगितलेला उपदेश ऐकल्यानंतर किंवा कीर्तन, प्रवचन ऐकल्यानंतर आपण परमेश्वराची उपासना करावी अशी तीव्रतेने इच्छा होते. परंतु काही काळ गेल्यानंतर संतांच्या उपदेशाचा प्रभाव ओसरतो. परमेश्वरावर असलेली श्रद्धा डळमळीत होऊ लागते मग असे वाटते की परमेश्वर भेटेल की नाही माहिती नाही परंतु आज जो आनंद आपल्या हातात आहे तो उपभोगावा. जो निजध्यास घेतलेला असतो तो आपण सोडतो. तेवढे धैर्य किंवा तेवढी वाट पाहण्याची तयारी आपली राहत नाही. परिणामी चित्तात शोक आणि संताप घर करतात.

श्रद्धावान लभते ज्ञानम! श्रद्धावंतालाच ज्ञान प्राप्त होते. अर्थात हे ज्ञान म्हणजे परमेश्वर प्राप्तीचे ज्ञान किंवा स्व स्वरूपाचे ज्ञान. परंतु त्यासाठी संयम, विवेक आणि वैराग्य या गुणांची आवश्यकता असते. सामान्य माणसाजवळ एवढा धीर नसतो. म्हणून त्याने जी काही दोन चार पावले परमेश्वर प्राप्तीच्या मार्गावर टाकलेली असतात, तिथून तो मागे येतो. सद्गुरूंनी मला अमुक इतका जप करायला सांगितला होता. तेवढ्या संख्येमध्ये मी तो केला परंतु मला कोणताही अनुभव आला नाही किंवा परमेश्वराची प्राप्ती झाली नाही. असा विचार करून सामान्य माणूस अध्यात्ममार्गापासून ढळतो. पण ज्याची श्रद्धा अविचल असते, तो कितीही संकटे आली किंवा कितीही तपश्चर्या करावी लागली तरी त्यापासून ढळत नाही. जर त्याला कोणी सांगितले की तू एवढा जप केलास परंतु तेवढा पुरेसा नाही. तुला आणखी इतकाच जप करावा लागेल किंवा आणखी अमुक इतकी वर्षे तपश्चर्या करावी लागेल तर तो त्यासाठी आनंदाने तयार होतो. कारण त्याला माहिती असते की त्यानंतर परमेश्वर आपल्याला निश्चितपणे भेटेल. आणि अशा रीतीने ज्यांची श्रद्धा अविचल असते अशा लोकांना परमेश्वराची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही.

म्हणून आपण संतसंगतीचा लाभ घ्यावा. त्यांच्याकडून परमेश्वर प्राप्तीचे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. आणि त्यांच्याशी निरर्थक वाद न घालता त्यांच्या सांगण्याप्रमाणे वाटचाल करावी. वेळीच सावध होणे गरजेचे आहे हेच समर्थ या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितात. तेव्हा निजध्यास सोडू नका. संत सोहिरोबा म्हणतात, " हरी भजनावीण काळ घालवू नको रे. "

स्वसंवाद

१. निजध्यास केव्हा आणि का तुटतो ?

२. कीर्तन-प्रवचनानंतर वाटणारी तीव्र भक्तिभावना काही दिवसांत का ओसरते? यावर उपाय काय?

३. "श्रद्धावान लभते ज्ञानम्" या वचनावर तुमचं दृढ विश्वास आहे का?

४. सद्गुरूंनी सांगितलेला जप केला पण अनुभव आला नाही. अशा वेळी मनात कोणते विचार येतात? तुम्ही त्याला कसे सामोरे जाता ?

५. संत सोहिरोबांची ओळ "हरी भजनावीण काळ घालवू नको रे" हे मला माझ्या व्यस्त आयुष्यात कसे साधता येईल ?

(क्रमशः)

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव

३/५/२०२६ 

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...