उगवतीचे रंग
जगणं जेव्हा ‘नाम’ बनतं…
कधी कधी आयुष्याच्या वाटेवर अशी काही माणसं भेटतात की, त्यांच्या साधेपणातच एक विलक्षण तेज दडलेलं असतं. ते तेज शब्दांत मावणारं नसतं. ते अनुभवावं लागतं. अशा व्यक्तींना भेटल्यानंतर आपला खुजेपणा आपल्याला जाणवायला लागतो. अशाच एका अद्भुत व्यक्तिमत्त्वाशी काही दिवसांपूर्वी भेट झाली… माँ कोंडाळकर आजी!
वय वर्ष ८५…सडसडीत बांधा पण शरीरात विलक्षण चैतन्य, चेहऱ्यावर प्रसन्न शांतता आणि डोळ्यांत अपार श्रद्धेचा उजेड. स्मृती आणि श्रवणशक्ती अत्यंत उत्तम. भूक लागणे हा निसर्गनियम आहे. परंतु या निसर्ग नियमावर मात करून त्याच्या विरुद्ध जगणारी काही उदाहरणे मी माझ्या आकाशझुला पुस्तकात एका लेखात दिली होती. त्यापैकी एक होत्या पश्चिम बंगालमधील प्यारी बाई आणि दुसरे उदाहरण होते गुजरातमधील एका बाबांचे. ज्यांना लोक चुडीवाले माताजी म्हणून ओळखत असत. आता ते दोन्हीही हयात नाहीत. परंतु त्या दोघांनी अन्नपाण्याशिवाय कित्येक दिवस काढले ही गोष्ट खरोखरच अद्भुत आणि आश्चर्यचकित करणारी होती. युरोपातील देखील एक संत महिला अशाच प्रकारची होती.
परंतु अशा व्यक्तींचे उदाहरण मला प्रत्यक्ष पाहायला मिळेल आणि त्यांच्याशी भेट होऊ शकेल असे कधी वाटले नव्हते. परंतु माँ कोंडाळकर यांना भेटलो आणि खरोखरच खूप धन्यता वाटली. त्यांच्या आहाराबद्दल ऐकलं आणि आश्चर्यचकितच झालो. आठ वर्षांपासून त्या फक्त दोन केळी आणि थोडं दूध यावर जगत आहेत. हे ऐकताना प्रथमदर्शनी अविश्वसनीय वाटतं. वारीत तर खाद्यपदार्थांची रेलचेल असते. तरी देखील दुपारी फक्त दोन केळी त्या घेतात. त्या व्यतिरिक्त इतर कोणताही आहार त्या घेत नाहीत. पण त्यांच्यासमोर बसल्यावर जाणवतं की, शरीराच्या गरजा मर्यादित केल्या की आत्म्याची शक्ती किती व्यापक होते ! शरीरात ऊर्जा केवळ अन्नामुळे येते असा आपला समज असतो. परंतु तो या माउलींनी खोटा ठरवला आहे श्रद्धेचे बळच त्यांना जगण्याची ऊर्जा देते. केवळ दोन केळी आणि दूध एवढाच आहार त्यांना या वयात देखील संपूर्ण वारी पायी करण्याएवढी ऊर्जा प्रदान करतो हे केवढे आश्चर्य!
त्यांच्याशी भेटायची उत्सुकता मला आधीपासूनच होती. माझ्या मुलीच्या सासूबाईंमार्फत त्यांच्याबद्दल ऐकलं आणि मग एक दिवस मी, माझी पत्नी श्रद्धा आणि मुलीचे सासू-सासरे असे आम्ही चौघं त्यांना भेटायला गेलो. पुण्यातील महात्मा सोसायटीत त्या राहतात. त्यांची भेट झाली आणि मी अक्षरशः भारावून गेलो.
त्यांचं आयुष्य म्हणजे एक अखंड वारी आहे. त्यांना कळायला लागल्यापासून त्या वारी करीत आहेत. आजपर्यंत एकही वर्ष त्यांनी पंढरपूरची वारी चुकवलेली नाही. वारीला जाण्याआधी त्या आळंदीला जातात, तिथून वारीसोबत पंढरपूर, आणि परत येतानाही जेव्हा इतर लोक वाहनाने येतात, तेव्हा त्या मात्र पायीच परत येतात. पुन्हा आळंदीला जाऊन दर्शन घेऊनच वारीची सांगता ! सदानंद महाराज आळंदीकर हे त्यांचे गुरु! गुरूंनी अनुग्रह दिला आणि गुरूकडून घेतलेले नाम त्यांनी आयुष्यभर जपले आणि जपत आहेत.
त्या सांगत होत्या," वारी म्हणजे साधी गोष्ट नाही. त्यात खूप शिस्त असते. कोणी शिस्त मोडण्याचा प्रयत्न केला तर त्याला वारीतून काढून टाकतात. परंतु तिथे खूप मजा सुद्धा असते. तिथं कोणी कोणाला काही म्हणत नाही. सगळे एकमेकांना ‘माऊली’ म्हणतात. ‘माऊली चला… माऊली या…’ असं म्हणताना सगळा अहंकार गळून पडतो.” वारीत अभंग, भजन किंवा गवळणी म्हणताना आजही या वयात त्या एखाद्या लहान मुलीसारख्या रममाण होऊन नाचतात. नाचताना सगळं काही विसरून जातात.
खरंच… ‘माऊली’ या एका शब्दातच समतेचा आणि प्रेमाचा एक विलक्षण सुगंध दडलेला आहे ! आपल्या वागण्याबोलण्यामुळे वारीत त्या सगळ्यांच्या माऊलीच झाल्या आहेत. वारीत, आळंदीला आणि पंढरपूरला सगळेजण त्यांना माँ या नावानेच संबोधतात.
त्यांची दिनचर्या ऐकली की आपण थक्क होतो. रात्री सात-साडेसातला निजणं… आणि पहाटे तीनला उठणं! त्या स्वतः सांगतात,“रात्री नामस्मरण करताना केव्हा झोप लागते ते कळतही नाही.” पहाटे उठल्यावर पुन्हा नामस्मरण, भजन-कीर्तन… सकाळी सहाला राजाराम पुलाजवळच्या विठ्ठल मंदिरात जाऊन भजनपूजन… साडेआठला परत… दुपारी ज्ञानेश्वरी, गीता, तुकाराम गाथा, विष्णू सहस्त्रनाम यांचे वाचन… आणि दिवसभर नामात रममाण!
घरात दोन मुलं, सुना, नातवंडं—सगळा संसार आहे; पण त्या त्यात कणभरही हस्तक्षेप करत नाहीत. संसारात असूनही त्या अलिप्त आहेत. संसारात राहून अलिप्तपणे जगणारी आणि आपल्या साधनेत गढून गेलेली ही योगिनी आहे. त्या स्वयंपाकघरात चुकूनही डोकावत नाहीत. समोर काहीही अगदी त्यांचा आवडता पदार्थ ठेवला तरी त्या घेत नाहीत. मंदिरात प्रसादाचा पेढा मिळाला तरी तो स्वतः न खाता दुसऱ्याला देतात!
त्यांच्या आयुष्यात दानधर्मालाही तेवढंच महत्त्व आहे. वारीत त्या एक दिवस सर्व वारकऱ्यांना आपल्या वतीने भोजन देतात. “दानधर्म केला पाहिजे,” हे त्यांचं ठाम मत आहे.
त्यांच्या बोलण्यात एक सहज विनोदही आहे. त्यांनी सांगितलेला एक प्रसंग तर अतिशय गमतीदार होता. काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी त्या कोथरूडला राहत होत्या. बहुधा थंडीचे दिवस असावेत. पहाटेच्या अंधुक प्रकाशात पांढरे केस, पांढरे कपडे घालून त्या बाहेर पडल्या होत्या. एका टेम्पोवाल्याने त्यांना पाहिलं आणि त्याला वाटलं भूतच आहे! तो एवढा घाबरला की त्याने गाडी एका बाजूला घेऊन थांबवली. आजी त्याला समजवायला पुढे गेल्या, तर तो आणखीच घाबरला! मग थोडे उजाडेपर्यंत त्यात तशाच थांबल्या. शेवटी उजाडल्यावर त्यांनी खिडकीवर टकटक करून सांगितलं, “बाळा, घाबरू नकोस… मी आजी आहे!” पण भीतीमुळे तो माणूस अक्षरशः ओलाचिंब झाला होता.
ही गोष्ट सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरचं निरागस हास्य मनात घर करून राहत होतं.
त्यांच्या श्रद्धेची खोलीही तितकीच विलक्षण आहे. मीराबाई, जनाबाई यांची उदाहरणं देताना त्या म्हणाल्या, “श्रद्धा अशी असावी ! नाम हीच इस्टेट आहे. आपण ती वापरली, तर देवाला आपली काळजी घ्यावीच लागते!”
त्यांना दोन मुले आहेत. मोठा मुलगा बाणेरला राहतो आणि धाकटा त्यांच्याजवळच महात्मा सोसायटीत असतो. त्यांचे नाव सतीश. या सतीशदादांना आम्ही भेटलो. सतीशदादा म्हणजे प्रसन्न व्यक्तिमत्व! त्यांच्याशी थोड्या गप्पाही झाल्या. आपल्या आईबद्दल बोलताना ते म्हणाले की आठ वर्षांपासून ती काहीही खात नाही. आमच्या घरात सर्वजण माळकरी आणि शाकाहारी आहेत. सकाळी आपल्या आईला विठ्ठल मंदिरात घेऊन जाण्याचे आणि परत आणण्याचे काम सतीशदादा आनंदाने करतात.
माँ यांनी आपल्याजवळील सर्व पैसे, दागदागिने मुलांमध्ये वाटून टाकले. तुकाराम महाराज म्हणतात, " सोने आणि रूपे आम्हा मृत्तिकेसमान. सोन्याची,धनाची, पैशाची कोणतीही आसक्ती त्यांनी ठेवली नाही. " बोले तैसा चाले "या उक्तीप्रमाणे वागणाऱ्या त्या आहेत. देह सुटल्यानंतरही कोणाला आपला त्रास नको म्हणून मुलांना त्यांनी स्पष्ट सांगून ठेवलं की, तिरडी, लाकूड काही नको… थेट विद्युत दाहिनीमध्ये माझे अंत्यसंस्कार करा! देहाबद्दलचे प्रेम आणि देहाची आसक्ती भल्याभल्यांना सुटत नाही. पण इथे त्यांची विरक्ती स्पष्टपणे दिसून येते.
ही विचारांची स्पष्टता… ही अलिप्तता… आणि तरीही सगळ्यांवर असलेलं प्रेम !मला वाटतं हेच खऱ्या अध्यात्माचं लक्षण असावं.
निघताना माँ ना सहज विचारलं. परमेश्वराचा एखादा साक्षात्कार आपल्या अनुभवास आला आहे का ? तेव्हा त्या म्हणाल्या मी ८५ वर्षाची आहे. फक्त दोन केळी आणि थोडे दूध एवढाच आहार आहे. या देहाला तो भगवंत दरवर्षी वारीला घेऊन जातो आणि सुखरूप परत घेऊन येतो हा मोठा चमत्कार नाही का ? खरंच आहे. हे तर माझ्या लक्षात आलंच नव्हतं. मी निघताना पुन्हा एकदा त्या माउलीच्या पायावर नतमस्तक झालो.
त्यांच्याकडून निघताना एक वेगळीच शांतता मनात उतरली होती. जणू काही आतल्या गोंधळावर कोणीतरी अलगद हात फिरवला होता…"रामकृष्ण हरी "हा जयघोष मनात सुरु होता.
©विश्वास विष्णू देशपांडे, चाळीसगाव.
२ /५ २०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा