मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग ४३

उगवतीचे रंग

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ४३

मना सज्जना एक जीवी धरावे|

जनी आपुले हीत तुवा करावे|

रघुनायकावीण बोलो नको हो |

सदा मानसी तो निजध्यास राहो|४३|

अर्थ : हे सज्जन मना, आपल्या जीवाशी एक खूणगाठ बांधून ठेव. जीवनामध्ये आपले तू कल्याण करून घे. एकदा भगवंताशिवाय अन्य गोष्टी बोलण्याचे सोडून दे. सदासर्वदा आपल्या मनाला त्याचाच ध्यास लागू दे.

विवेचन 

आपले कल्याण व्हावे ही समर्थांची तळमळ मनाच्या श्लोकांमध्ये ठायी ठायी जाणवते. म्हणून पुनरुक्तीचा दोष पत्करून काही गोष्टी ते पुन्हा पुन्हा सांगतात. आपल्या मनाला उपदेश करताना ते म्हणतात," हे सज्जन मना, एक गोष्ट आपल्या जीवाशी निश्चित करून ठेव. तुला जर तुझे कल्याण करून घ्यायचे असेल तर रघुनायकाचा म्हणजे भगवंताचा ध्यास घे. त्याच्याशिवाय दुसरे काही बोलू नको."

व्यवहारात आपल्या वाणीला म्हणजे बोलण्याला अतिशय महत्त्व असते. आपल्या बोलण्यावरून आपले व्यक्तिमत्व लोकांना समजते. म्हणून व्यवहारात लोकांशी आवश्यक तेवढे बोलावेच लागेल. व्यवहार सोडता येणार नाही. समर्थांनी देखील "आधी प्रपंच करावा नेटका" असे सांगितले आहे. पण जेव्हा व्यवहारातील बोलणे संपेल तेव्हा आपल्या मुखातून भगवंताचे नामच बाहेर पडले पाहिजे. असे नाम सातत्याने येण्यासाठी मनामध्ये त्याचा विचार हवा कारण जसा विचार, तसा उच्चार आणि तसा आचारही होतो. 

हा झाला बाह्य आचार. एक वेळ मुखात भगवंताचे नाम येणे, भगवंताबद्दल बोलणे सहज जमू शकते. पण आपल्या अंतरंगात भगवंताचे अनुसंधान टिकवणे सोपे नाही. त्याच्यासाठी सतत जागेपणी जेवढे शक्य होईल तेवढे भगवंताचे नाव घेत राहण्याचा अभ्यास करायला हवा. इंग्रजी शब्दांचा वापर करून सांगायचे झाले तर ट्वेंटी फोर बाय सेव्हन भगवंताच्या नामाचा ध्यास असायला हवा. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात तुम्ही जागेपणी मनाला नाम घेण्याची सतत सवय लावून घ्या. एकदा हे साधले की मग तुमच्या झोपेत किंवा तुमच्या आजारपणात देखील आपोआप हे नाम घेतले जाईल. 

हे विवेचन वाचत असताना आपल्याला असे वाटेल की हे म्हणजे फारच झाले व्यवहारात आपल्याला एवढे शक्य नाही. परंतु समर्थांचे हे सांगणे आपल्यासारख्या सर्वसामान्यांसाठीच आहे. आपण भगवंताचे नाम का घ्यायचे ?त्याची भक्ती का करायची ? तर आपण साधना मार्गावर चालणारे साधक आहोत. सुरुवातीलाच समर्थांनी आपल्याला "गमू पंथ अनंत या राघवाचा" असे सांगितले आहे. ही गोष्ट एकदा मान्य केली की मग समर्थांचा उपदेश सहज पचनी पडतो.

जसे रोग्याला डॉक्टरांनी सांगितलेले पथ्य पाळणे त्याच्या हिताचे असते, तसेच साधकाला देखील काही गोष्टींची पथ्ये असतात. ती त्याने सांभाळायला हवीत. तुकाराम महाराज म्हणतात," जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी, तेणे पथ्ये सांभाळावी. " आपण साधक आहोत आणि परमेश्वराची प्राप्ती हे आपले साध्य आहे. हे जीवनध्येय एकदा ठरले की मग पुढील वाटचाल सोपी होते. परमेश्वराच्या नामात रममाण व्हायचे की लोकांमध्ये मिसळून आपला वेळ अन्य गोष्टींमध्ये व्यर्थ घालवायचा ? यातील कोणती गोष्ट निवडायची हे खऱ्या साधकाला सांगावे लागत नाही. आपल्या परमार्थाला हानिकारक होतील अशा गोष्टींपासून खरा साधक दूरच राहतो. "विठ्ठल आवडी प्रेमभावो, विठ्ठल नामाचा रे टाहो..." असे संत नामदेव म्हणतात. तसेच आपलेही झाले पाहिजे.

स्वसंवाद

१) माझ्या दिवसातील किती वेळ भगवंताचे नाम किंवा विचार माझ्या मनात असतो – प्रामाणिकपणे सांगायचे तर किती टक्के ?

२) "जसा विचार, तसा उच्चार, तसा आचार" – माझे विचार, बोलणे आणि वागणे यात सुसंगती आहे का ?

३) साधकाला पथ्य असते – माझ्या परमार्थाला हानिकारक कोणती सवय मी अजून सोडलेली नाही ?

४) गोंदवलेकर महाराज म्हणतात जागेपणी नामाची सवय लावा – मी आज या क्षणापासून हे सुरू करण्यास तयार आहे का ?

(क्रमशः)

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

३/४/२०२६

प्रतिक्रियेसाठी : ९४०३७४९९३२

(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...