उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ४१
बहु हिंडता सौख्य होणार नाही |
सीणावे परि नातुडे हीत काही |
विचारे मना अंतरा बोधवीजे|
मना सज्जना राघवी वस्ती कीजे|४१|
अर्थ: समाधान किंवा आनंद प्राप्त व्हावा म्हणून खूप हिंडले किंवा फिरले तरी समाधान होणार नाही. त्याने नाहक श्रम मात्र होतील पण हाती काही लागणार नाही. म्हणून हे मना, तू नीट विचार करून स्वतःची समजूत घाल आणि भगवंतापाशीच कायमचा आश्रय घे.
( नातुडे - साध्य होत नाही/ हाती लागत नाही, अंतरा - अंतर्मन )
विवेचन
हा अतिशय अर्थगर्भ असा श्लोक आहे. "बहु हिंडता सौख्य होणार नाही "या ओळीचे तीन प्रकारचे अर्थ घेता येतात. आपल्या जीवनात आनंद मिळावा, समाधान प्राप्त व्हावे म्हणून आपण वणवण हिंडत असतो. व्यंकटेश स्तोत्रात म्हटल्याप्रमाणे "अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविशी जगदीशा." आपल्या उपजीविकेसाठी सुद्धा आपण आयुष्यभर वणवण करत असतो. उपजीविकेसाठी, पोटासाठी धावपळ करणे हे समजू शकते. हा पहिला अर्थ घेता येईल.
दुसरा अर्थ असा सांगता येतो की परमार्थात सुद्धा माणसे खूप भटकत असतात पण त्यांच्या हाती फारसे काही लागत नाही. मन:शांती नाही, अनेक गोष्टी मनासारख्या घडत नाही म्हणून लोक बाबा, बुवांकडे हिंडत असतात. देवालये, नाना प्रकारची तीर्थक्षेत्रे, तीर्थयात्रा माणूस आयुष्यभर करत राहतो. पण तीर्थक्षेत्री जाऊन सुद्धा तो कोरडाच राहतो. या ठिकाणी एक पौराणिक कथा आठवते.
महाभारतातील युद्ध नुकतेच संपलेले असते. युद्ध संपले असले तरी भीम, अर्जुन आपण युद्धात कसा पराक्रम केला त्याच्याच गोष्टी करीत असतात. हे सगळे ऐकताना श्रीकृष्ण तेथे उपस्थित असतो आणि त्याला हे सगळे ऐकताना गालातल्या गालात हसू येते. युद्धात झालेल्या नरसंहारामुळे धर्मराज युधिष्ठिर अस्वस्थ झालेला असतो. त्याच्या मनात मनःशांतीसाठी तीर्थयात्रेला जायचे असते. तो तीर्थयात्रेचा विषय काढताच भीम आणि अर्जुनही तीर्थयात्रेला जाण्यासाठी तयार होतात. नकुल सहदेव तर तयारच असतात. कृष्ण त्यांना म्हणतो," माझे एक काम करा. मी तुम्हाला एक लिंबाची काडी देतो. तुम्ही ज्या ज्या तीर्थक्षेत्री जाल, त्या त्या ठिकाणी त्या काडीलाही तुमच्याबरोबरच स्नान घाला आणि लवकरात लवकर परत या. "
पांडव मग हरिद्वार, ऋषिकेश इ ठिकाणी तीर्थयात्रा करून परत येतात. कृष्ण मग भीमाला म्हणतो की मी तुला ती लिंबाची काडी दिली होती, ती परत आणलीस का, तिला स्नान घालत होतात ना ? मग भीम ती काडी घेऊन येतो. कृष्ण त्याला म्हणतो, ' आता या काडीला तुम्ही सगळ्या तीर्थक्षेत्री स्नान घातल्यामुळे ती पवित्र आणि गोड झाली असेल. तेव्हा तू ती खाऊन टाक . ' त्यावर भीम म्हणतो, ' केशवा, आमची चेष्टा करतोस का ? कितीही स्नान घातले तरी लिंबाची काडी गोड कशी होईल ? '
तेव्हा कृष्ण ते निमित्त करून त्यांना समजावून सांगतो की आपल्या मनाचेही तसेच आहे. नुसती तीर्थयात्रा केल्याने आपण पवित्र आणि मन शांत होत नाही. त्या ठिकाणी शरीरशुद्धी बरोबरच मनातील पापे, वाईट वासना सुद्धा नष्ट झाल्या पाहिजेत. आपले मन जर पवित्र आणि शुद्ध असेल तर तीर्थाला जाण्याची सुद्धा गरज नाही. समर्थ आपल्याला या श्लोकात हीच गोष्ट समजावून सांगतात.
तिसरा अर्थ सर्वात महत्त्वाचा वाटतो. तो हा की हिंडत राहणे म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून हिंडत राहणे. विषयवासनांमुळे पुन्हा पुन्हा जन्म घेणे, मृत्यू पावणे आणि पुन्हा जन्म घेणे हे चक्र सुरू राहते. यालाच समर्थ बहु हिंडता सौख्य होणार नाही असे म्हणतात. कारण यातून कोणतेही हीत साध्य होत नाही. अनेक जन्म घेऊनही मुक्ती मिळणार नाही, ईश्वर प्राप्ती होणार नाही. जीवात्मा मात्र जन्ममृत्यूच्या या चक्रात भरडून निघतो.
मग अंतिम समाधान किंवा सौख्य कुठे मिळेल ? तर ते एका परमेश्वराच्याच ठायी आहे. आपण विचार करून आपल्या मनाला या गोष्टीचा बोध करून दिला पाहिजे. आणि त्या राघवाच्या ठिकाणीच आपले मन कायम स्वरूपी एकाग्र केले पाहिजे. "सर्व सुखाचे आगर, बाप रखुमादेवीवर.."असे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ते यासाठीच !
स्वसंवाद
१) मी आयुष्यात कशासाठी सर्वाधिक वणवण केली ? पैशासाठी, यशासाठी की मनःशांतीसाठी ? त्यातून खरे समाधान मिळाले का ?
२) लिंबाची काडी स्नानाने गोड होत नाही. माझ्या बाह्य धार्मिक कृतींमागे अंतर्मनाची शुद्धी आहे का ?
३) तीर्थयात्रा, उपवास, पूजापाठ या गोष्टी मी करतो. परंतु माझ्या मनातील वाईट विचार, राग, मत्सर कमी झाले आहेत का ?
४) जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती हे आपले अंतिम ध्येय आहे.माझ्या दैनंदिन जगण्यात या ध्येयाची जाणीव मला असते का ?
(क्रमशः)
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
३/४/२०२६
प्रतिक्रियेसाठी : ९४०३७४९९३२
(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा