मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग ४६

 उगवतीचे रंग

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ४६

मना जे घडी राघवेवीण गेली |

जनी आपुली ते तुवा हानी केली |

रघुनायकावीण तो सीण आहे|

जनी दक्ष तो लक्ष लाऊनि पाहे|४६|

अर्थ : हे मना, जो क्षण राघवाच्या स्मरणाशिवाय गेला त्याने तू आपले नुकसान करून घेतले असे समज. ज्या गोष्टीत रामाचे अधिष्ठान नाही अशा गोष्टी करणे म्हणजे व्यर्थ शीणणे असे समजून या जगात तू अत्यंत सावधपणे वावर.

विवेचन 

श्रीराम हे समर्थांचे आराध्य दैवत. एक क्षणही आपण श्रीरामाच्या स्मरणाशिवाय घालवावा असे त्यांना वाटत नाही. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज देखील हेच आपल्याला सांगतात. आपण जर स्वतःला साधक मानत असू आणि संतांनी सांगितलेल्या मार्गावर आपल्याला वाटचाल करायची असेल तर भगवंताच्या नामाशिवाय एक क्षणही व्यर्थ घालवू नये. असा वाया घालवलेला वेळ म्हणजे साधकाने आपले स्वतःचेच करून घेतलेले नुकसान.

आपल्याला दृश्य गोष्टी जास्त आकर्षित करतात. परमेश्वर हा निर्गुण निराकार आहे म्हणून त्याची ओढ आपल्याला वाटत नाही. त्यासाठीच संतांनी आपल्याला सगुण भक्ती करायला सांगितले आहे. डोळ्यासमोर भगवंताची मूर्ती आणि चित्तात त्याचेच ध्यान अशी साधकाची अवस्था असावी. तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम अशी संत परमेश्वराला प्रार्थना करतात यासाठीच.

विज्ञानाच्या प्रगतीने आणि भौतिक समृद्धीने माणसाला ज्या सुखसोयी उपलब्ध करून दिल्या आहेत त्यातच माणूस सुख मानतो. त्या प्राप्त करणे हेच आपल्या जीवनाचे ध्येय समजतो आणि ज्याने आपल्याला जन्म दिला त्या परमेश्वराला आपण विसरतो. भगवंताशिवाय आपल्या हिताचे कोणी नाही आणि उपासनेशिवाय आपल्याला पर्याय नाही हे साधकाने पक्के लक्षात ठेवले पाहिजे.

प्रत्येक व्यक्तीचे जीवनामध्ये कोणते तरी ध्येय असते हे ध्येय प्राप्त करण्यासाठी त्याला त्या ध्येयाचा विसर पडून चालत नाही म्हणजेच त्या ध्येयाकडे सतत लक्ष असावे लागते. ते साध्य होण्यासाठी दक्ष असावे लागते. परीक्षेमध्ये उत्तम गुण प्राप्त करणे हे विद्यार्थ्याचे ध्येय असते. त्यासाठी अभ्यासाकडे लक्ष द्यावे लागते. इतर गोष्टींमध्ये आपला फार वेळ जाणार नाही याबाबत दक्ष असावे लागते. एखाद्याला उत्तम गायक व्हायचे असेल, तर त्याला रोजचा रियाज करणे आवश्यक आहे. आपल्या गळ्याचे आरोग्य बिघडणार नाही याबाबतीत त्याला दक्ष असावे लागते. थंड, तेलकट पदार्थ खाल्लेले त्याला चालत नाहीत. 

त्याप्रमाणेच साधकाने देखील सदैव दक्ष असावे असे समर्थ म्हणतात. सर्वत्र सावधानता बाळगावी असा समर्थांचा आग्रह आहे. मग साधना मार्गावर तर सावधानता अत्यंत आवश्यक आहे. कारण साधकाला आपल्या मोहात पाडून त्याला त्याच्या ध्येयापासून विचलित करणाऱ्या अनेक गोष्टी असतात. त्यासाठी विवेक हवा.

रोज मी भगवंताच्या नामस्मरणासाठी किती वेळ देतो याचा विचार प्रत्येक साधकाने करायला हवा. आजकाल सगळ्या गोष्टी आपण अतिशय घाईने उरकतो. भगवंताची पूजा, नामस्मरण यासारख्या गोष्टी रोजचा उपचार म्हणून उरकल्या जातात. ज्या गोष्टी मनापासून किंवा समर्पण भावनेने केल्या जात नाहीत, त्या गोष्टी उपचार ठरतात. इतरही अनेक गोष्टींमध्ये आपण आपला वेळ घालवत असतो. परंतु समर्थ म्हणतात की भगवंताच्या स्मरणाशिवाय वेळ घालवणे म्हणजे आपली हानी आपण करून घेणे. तो केवळ ' सीण आहे ' म्हणूनच आपण आपला एक क्षणही परमेश्वराच्या स्मरणाशिवाय जाणार नाही याबाबत दक्ष असले पाहिजे.

स्वसंवाद (नवीन)

१) मी स्वतःला साधक मानतो का?

२) माझी पूजा, नामस्मरण या गोष्टी मनापासून होतात की केवळ रोजचा उपचार म्हणून उरकल्या जातात ?

३) ध्येयापासून विचलित करणाऱ्या कोणत्या गोष्टी माझ्या जीवनात आहेत असे मला वाटते ? त्याबाबत मी खरोखर दक्ष आहे का ?

(क्रमशः)

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

७/४/२०२६

प्रतिक्रियेसाठी : ९४०३७४९९३२

(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा)



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...