मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग ४५

उगवतीचे रंग

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ४५

जयाचेनि संगे समाधान भंगे |

अहंता अकस्मात येऊनि लागे |

तये संगतीची जनी कोण गोडी |

जिये संगतीने मति राम सोडी |४५|

अर्थ : ज्यांच्या संगतीत मनाचे समाधान नष्ट होते आणि अहंकार वाढीस लागतो अशा लोकांची संगत चांगली नाही. ज्यांच्या संगतीत आपण बुद्धीने परमेश्वरापासून दूर जातो अशांच्या संगतीत राहण्यात गोडी ती कोणती ?

विवेचन 

या श्लोकात समर्थांनी अप्रत्यक्षपणे सत्संगतीची महती सांगितली आहे. व्यवहारात आणि परमार्थातही संगत अतिशय महत्त्वाची असते. आपण ज्याच्या संगतीत राहतो त्याचे गुण किंवा दोष आपल्याला लागतात. संत तुकाराम महाराज म्हणतात 

ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला

कुसंगे नाडला साधू तैसा ||

हिरा अत्यंत कठीण असतो परंतु त्याला ढेकणाचे रक्त लागले की तो भंग पावतो असे म्हणतात. त्याप्रमाणेच दुर्जनांच्या संगतीत राहिले की साधू देखील बिघडतो एवढे संगतीचे महत्त्व आहे. 'संगती संग दोषेंण' असे म्हटले जाते. म्हणूनच मोरोपंत म्हणतात," सुसंगती सदा घडो,  सुजन वाक्य कानी पडो." 

व्यसनी माणसाच्या सतत सहवासात राहिल्यामुळे आपल्यालाही व्यसन लागण्याची शक्यता असते. सतत खोटे बोलणाऱ्या व्यक्तीच्या सहवासात जर आपण राहत असू तर आपल्याला तसे वागणे योग्यच वाटायला लागते. श्रीमंत व्यक्तीच्या सहवासात राहिल्यानंतर आपल्यालाही तसेच श्रीमंत व्हावेसे वाटते. या सगळ्या अशा प्रकारच्या संगतीत आपण भगवंताला मात्र विसरतो आणि आपला अहंकार मात्र वाढत असतो. 'मी 'पणाला खतपाणी मिळते.

संत नामदेवराय म्हणतात 

अहंकाराचा वारा | न लागो राजसा | माझिया विष्णुदासा | भाविकांसी ||

क्षमा हे वीराचे भूषण आहे. नम्रता हे विद्येचे भूषण आहे. गर्व नसणे हे श्रीमंतीचे भूषण आहे. परंतु ज्या माणसांना हे माहिती नसते त्यांचा अहंकार बळावतो. अशांच्या संगतीत राहिल्याने आपलाही अहंकार आपण जोपासत राहतो. संत कबीर यांचा एक दोहा फार सुंदर आहे...

‘बडें बडाई न करे, बडे न बोले बोल| हिरा मुख से न कहे, लाख टका मम मोल||

“मैं मैं” बडी बलाई है, सके निकल तो निकले भाग| कहे कबीर कब लग रहै, रुई लपेटी आग||’

समर्थ म्हणतात, “प्राप्त झालेले ज्ञान ‘अहंकारामुळे’ नष्ट होते." अहंकारामुळे काम, क्रोध आदी दुर्गुण वाढीस लागतात. वैज्ञानिक आणि भौतिक प्रगतीमुळे अनेक प्रगत राष्ट्रांमध्ये आर्थिक सुबत्ता आहे. परंतु शांतता आणि समाधान मात्र हरवलेले दिसते. आपल्याला त्यांची प्रगती जरी आकर्षक वाटली तरी त्यातील फोलपणा समजून घेतला पाहिजे.

तात्पर्य, ज्या संगतीने भगवंताचे नाम मुखात येऊन त्याची गोडी लागते अशी  संगत म्हणजे सत्संगत ! सत्संगती धरली तर सद्गुणांची वृद्धी होऊन भगवद्कृपा प्राप्त होते.

स्वसंवाद

​१) ज्या लोकांच्या सहवासात गेल्यानंतर मला अशांत वाटते किंवा स्वतःबद्दल उगाचच बडेजाव (मीपणा) वाटतो, असे लोक माझ्या लक्षात येतात का ?

​२) माझ्या मित्रांच्या किंवा परिचितांच्या वर्तुळात गेल्यानंतर आमचा संवाद भगवंताकडे/सद्गुणांकडे वळतो की केवळ परनिंदा आणि ऐहिक सुखांच्या गोष्टींकडे ?

​३) श्रीमंतांच्या संगतीत स्वतःबद्दलचा न्यूनगंड आणि सत्ताधीशांच्या संगतीत वाढलेला माझा अहंकार मला जाणवतो का ? (हे देखील समाधान भंग पावण्याचे लक्षण आहे).

​४) 'अहंकाराचा वारा' लागून माझी बुद्धी रामापासून (सत्यापासून) दूर जात आहे, हे ओळखण्याची सतर्कता माझ्यात आहे का? ( क्रमशः)

​© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

​ ६ /४/ २०२६

​प्रतिक्रियेसाठी : ९४०३७४९९३२

​(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...