मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग ४४

उगवतीचे रंग

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ४४

मना रे जनी मौन्य मुद्रा धरावी |

कथा आदरे राघवाची करावी |

नसे राम ते धाम सोडोनी द्यावे |

सुखालागि आरण्य सेवीत जावे |४४|

अर्थ : हे मना, समाजात वावरताना शक्यतो मौन धारण करावे. बोलायचेच झाले तर अत्यंत आदराने श्रीरामाचे गुणगान करावे. ज्या ठिकाणी श्रीरामाबद्दल म्हणजेच भगवंताबद्दल प्रेम नाही अशा ठिकाणी राहू नये. ते ठिकाण तत्काळ सोडून द्यावे. भगवंताच्या नामातील सुख प्राप्त करण्यासाठी खुशाल अरण्यात जाऊन राहावे. 

विवेचन 

मन म्हणजे विचार करणे. ज्याला मन आहे तो माणूस ! म्हणजेच जो विचार किंवा चिंतन करू शकतो तो माणूस होय. मौन हा शब्द देखील मन या धातूपासून तयार झाला आहे. केवळ न बोलणे म्हणजे मौन नव्हे तर ज्याच्या अंतरात भगवंताच्या नामाचे चिंतन सुरू आहे आणि अन्य काही बोलण्याची ज्याला आवश्यकता राहत नाही अशी गोष्ट म्हणजे मौन. अशी व्यक्ती केवळ भगवंताचे गुणगान करण्याकरताच बोलते. त्याचीच कथा सांगते.  

मौनाचा हा अर्थ साधकांसाठी सांगितला आहे. अनेक लोक आपला स्वार्थ साधण्यासाठी सोयीस्कर मौन धारण करतात. त्या अर्थाने मौन हा शब्द इथे अपेक्षित नाही. "मौनम् सर्वार्थ साधनं" असे एक प्रसिद्ध संस्कृत वचन आहे. मौनाने सर्व काही साध्य होते असा त्याचा अर्थ आहे. जे लोक मौन पाळतात आणि वायफळ बडबड करत नाहीत, अशांच्या वाणीला सामर्थ्य प्राप्त होते. आपण बोलून जे साध्य करू शकत नाही ते मौनाने साध्य होते. अशा वेळी मौन हेच शस्त्र आणि शास्त्र ठरते.  सतत बडबड करणाऱ्या लोकांच्या बोलण्याला लोक फारशी किंमत देत नाहीत.  

काही अपवादात्मक साधुसंत खरोखरच साधनेसाठी मौन धारण करतात. परंतु बरेचसे साधू मौन तर धारण करतात, परंतु त्यांच्याकडे कोणी आले आणि त्यांना काही विचारले तर ते हातवारे करून बोलतात किंवा आपले म्हणणे पाटीवर लिहून सांगतात. काही साधुसंतांनी मौनाच्या काळात ग्रंथ देखील लिहिल्याचे ऐकण्यात येते. असे मौन खऱ्या अर्थाने पूर्ण मौन म्हणता येणार नाही. 

समर्थांनी जनी मौन्यमुद्रा धरावी असे म्हटले आहे. एक वेळ एकांतातील मौन सोपे आहे परंतु भोवती लोकांची गर्दी असताना सोपे नाही. विपश्यना शिबिरात तर खुणेने देखील बोलायचे नसते. अशा ठिकाणी माणसे दहा दिवस कसाबसा धीर धरतात. परंतु एकदा शिबिर संपले की दहा दिवसांची भर काढून घेतात.

जो खरा साधक असतो तो भगवंताच्या चिंतनात अंतर्बाह्य बुडालेला असतो. त्यामुळे त्याला इतर अनावश्यक बडबड करण्याची आवश्यकता भासत नाही. तो जेव्हा बोलतो तेव्हा आपल्या वाणीने भगवंताच्या गुणांचे वर्णन करतो, भगवंताचे कीर्तन करतो.

जेथे त्याला सुखाने राहून भगवंताचे गुणगान करता येते असे ठिकाण म्हणजे त्याच्या दृष्टीने स्वर्ग. परंतु अशीही काही ठिकाणी असतात की जेथे भगवंताचे चिंतन नामस्मरण केलेले आवडत नाही. भगवंताला न मानणारी माणसे अशा ठिकाणी राहतात. अशा ठिकाणी खऱ्या भक्ताला राहणे कठीण होते. अशा ठिकाणी त्याचा आणि भगवंताचा देखील अवमान होतो. म्हणून ज्या ठिकाणी भगवंताचा अनादर होतो आहे, निंदा होते आहे असे दिसले तर ते ठिकाण तत्काळ सोडावे. 

अशाप्रसंगी वनात जाऊन देखील राहण्यास हरकत नाही तेथे सुखाने भगवंताचे नाम घेता येते त्याच्या स्मरणात राहता येते संत तुकाराम महाराज म्हणतात," येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येत. आकाश मंडप, पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडा करी. " साधकाला मग अशा एकांतातील सुख अनुभवता येते कुठलाही व्यत्यय न येता परमेश्वराचे नामस्मरण घडते. परमेश्वराच्या चिंतनासाठी अनेक संतांनी जनामध्ये राहणे सोडून वनामध्ये निवास केला त्याचे कारण हेच आहे. 

सध्या काळ बदलला आहे. हल्ली समर्थांच्या सांगण्याप्रमाणे वनात जाऊन निवास करणे सर्वसामान्य माणसांसाठी सोपे नाही. हल्ली रोजच्या व्यवहारात शांतता मिळणे कठीण झाले आहे. तीर्थस्थानांना देखील बाजारू स्वरूप प्राप्त झाले आहे. जिथे सुखाने भगवंत चिंतन करता येईल अशा जागा मिळणे कठीण झाले आहे. अशा वेळी आरण्य सेवन याचा अर्थ एकांत सेवन असा घ्यायला हरकत नाही. ज्या ठिकाणी सुखाने आपल्याला हरीचे नाम घेता येईल असे ठिकाण म्हणजे अरण्यच असे म्हटले तर हरकत नाही.

स्वसंवाद

१) माझ्या बोलण्यात किती वेळ भगवंताचे गुणगान असते आणि किती वेळ निरर्थक गोष्टी असतात ?

२) मला भगवंत चिंतनासाठी मौन आवश्यक आहे ही गोष्ट पटते का ?

३) ज्या ठिकाणी भगवंताचा अनादर होतो अशा ठिकाणी राहणे मला जड जाते का, की मी त्याशी तडजोड करतो ?

४) माझ्या दैनंदिन जीवनात "आरण्य" म्हणजे एकांताची जागा कोणती आहे आणि मी ती नियमितपणे वापरतो का ? (क्रमशः)

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

५/४/२०२६

प्रतिक्रियेसाठी : ९४०३७४९९३२

(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा)



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...