मुख्य सामग्रीवर वगळा

अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली

 उगवतीचे रंग 

अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली...

कधी कधी एखाद्या पुस्तकातलं एखादा वाक्य आपलं लक्ष वेधून घेतं. वाक्य तसं साधंच असतं पण विचार केला तर त्यात खूप अर्थ भरलेला जाणवतो. असंच एक वाक्य परवा माझ्या वाचनात आलं आणि त्या वाक्यापाशी मी थांबलो. बऱ्याच वेळा आपण वाचून पुढे पुढे जात असतो. परंतु कधी कधी एखाद्या वाक्यापाशी थांबावं आणि त्यावर विचार करावा असं ते वाक्य असतं. पुढचं काही वाचलं नाही तरी चालू शकतं.

ते वाक्य होतं टी हार्व एकर या अमेरिकन विचारवंताचं. तो म्हणतो,"Successful people have fear, doubt and worry too. They just don't let it stop them." यशस्वी लोकांना सुद्धा भीती, शंका आणि चिंता असतात. फक्त ते या भावनांना स्वतःच्या मार्गात अडथळा बनवू देत नाहीत. 

मला हे वाक्य फार आवडलं. यशस्वी माणसांचं जीवन पाहिलं की आपल्याला वाटतं की किती भाग्यवान आहेत ही मंडळी ! यांना सगळं कसं भरभरून मिळालं आहे ! आणि मग अशावेळी आपण नकळत स्वतःची तुलना त्यांच्याशी करू पाहतो. मग आपल्याला आपण किती दुर्दैवी आहोत असे वाटते. आपण म्हणतो की मला माझ्या जीवनामध्ये एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात, माझ्याच वाट्याला संकटे आणि अडचणी येतात. कोणतीही गोष्ट माझ्यासाठी सहजपणे होतच नाही. अगदी हातातोंडाशी आलेले यश मला नेहमी हुलकावणी देते. 

दूरवरून दिसणारे पर्वत आपल्याला खूप सुंदर वाटतात. पण जवळ जाऊन पाहिलं म्हणजे लक्षात येतं की अरे, दुरून हा डोंगर दिसत होता तेवढा सुंदर खचितच नाही ! दगडधोंडे, दऱ्या, तीव्र चढ-उतार या सगळ्या गोष्टी तिथे आहेतच. फक्त आपल्याला त्या लांबून दिसल्या नव्हत्या.

असंच यशस्वी माणसांचंही असतं त्यांच्या जवळ जाऊन पाहिल्याशिवाय त्यांच्या यशाचं मर्म लक्षात येत नाही. ही माणसं सुद्धा अनेकदा अपयशाचे धनी झालेले आढळतात. त्यांच्या जीवनातही संकटे येतात. ते देखील कधी कधी निराश होतात. कारण ती देखील तुमच्या आमच्यासारखी माणसंच आहेत. या मातीतूनच त्यांचा देखील जन्म झाला आहे. मग त्यांच्यात आणि आपल्यात काही फरक आहे का ? होय, नक्कीच ! या ठिकाणी पुन्हा मला एक सुंदर वाक्य आठवतं. "Great men don't do different things. They do things differently." ( महान माणसे वेगळं काम करत नाही फक्त ते आपली कामं वेगळ्या पद्धतीने करतात.)

आपण मात्र संकटे आली, अडचणी आल्या की गांगरतो आणि ती गोष्ट तशीच सोडून देतो. कोणत्याही कार्यात यशस्वी होण्यासाठी प्रयत्नांसोबतच चिकाटीची सुद्धा आवश्यकता असते. संयम आणि धैर्य या गोष्टी देखील महत्त्वाच्या असतात. संकटे आपली एक प्रकारची परीक्षाच घेतात. आपण जे पदवीपर्यंत किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतो, त्या शिक्षणातून खरंतर हे गुण आपल्या अंगी यायला हवेत. परंतु तसं होताना फार कमी आढळतं.

काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात एक बातमी वाचली आणि मन सुन्न झाले. एका तरुण आयटी इंजिनिअरने आणि त्याच्या पत्नीने आत्महत्या केली. कारणही तसेच होते. त्याची अचानक नोकरी गेली. त्याच्या लॅपटॉप वर सकाळी सकाळी एक ई-मेल आला. त्यात कंपनीने म्हटले होते, " कंपनीत आता तुमच्या सेवेची आवश्यकता नसल्यामुळे तुमची नोकरी उद्यापासून संपुष्टात आली आहे. आता तुमची गरज नाही." त्या एका वाक्याने त्या तरुणाच्या डोळ्यासमोर सारा अंधार पसरला. त्याचे नुकतेच लग्न झाले होते. घरासाठी गाडीसाठी त्याने बँकेकडून मोठे कर्ज घेतले होते. आता काय होणार ? कर्जाचे हप्ते कसे भरणार? घर कसे चालणार ? प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न... या प्रश्नांची काजळी त्याच्या मनावर एवढी दाटून आली की त्याला आपले जीवन संपवावे एवढा एकच मार्ग दिसला. गळफास घेऊन त्याने आपले जीवन संपवले आणि आपल्या पत्नीसाठी एक चिठ्ठी लिहून ठेवली. ती बिचारी सुद्धा हा धक्का सहन करू शकली नाही आणि तिने गच्चीवरून उडी मारून स्वतःला संपवले. ही घटना वाचून कोणालाही हळहळ वाटणे सहाजिकच आहे. 

कोणी एखाद्या परीक्षेत नापास झाला म्हणून आत्महत्या करतो तर कोणी प्रेमभंग झाला म्हणून आत्महत्येचा टोकाचा मार्ग स्वीकारतो.

नंतर मनात एकच विचार आला की खरंच  असं काही झालं म्हणजे सगळंच संपलं असे समजायचे का ? नाही. कधीही नाही. नोकरी जाणं म्हणजे एक दरवाजा बंद होणं. पण बंद दरवाजासमोर उभे राहून आत डोकावत राहणे म्हणजे मागे उघड्या असलेल्या खिडक्या न पाहणे. नोकरी गेलेल्या त्या तरुणाकडे कौशल्य होते, बुद्धी होती, अनुभव होता. त्याला फ्रीलान्सिंग करता आले असते. स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करता आला असता. सरकारी योजनांचा आधार घेता आला असता. कुटुंबाने, मित्रांनी साथ दिली असती. समाजातून मदतीचे अनेक हात पुढे आले असते. पण... या सगळ्या शक्यतांचे दरवाजे त्याने स्वतःच बंद करून टाकले. खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांनी हे गृहीत धरून चालायला हवे की आपली नोकरी म्हणजे अळवावरचे पाणी आहे. ती कधीही जाऊ शकते यासाठी प्लॅन बी तयार असायला हवा.

त्या तरुणावर आलेले हे संकट खरोखरीच अवघड होते त्यातून पार पडणे  सोपे नाही, हेही मान्य. संकट आले की धीर सुटतो, हेही खरे. पण खरंच अशा प्रसंगी आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग स्वीकारण्याची गरज आहे का ? अशावेळी थोडे शांत राहून विचार केला तर नक्कीच मार्ग सापडतो. 

"'आली जरी कष्ट दशा किती अपार। धैर्य न टाकीती तथापि थोर।
केला जरि पोत बळेचि खाले। ज्वाळा तरी ते वरती उफाळे।।"

थोरांच्या चरित्रातून हेच तर आपल्याला शिकायला मिळते. आजूबाजूचा निसर्गही आपल्याला शिकवत असतो. पानगळ होते परंतु झाडाला नवीन पालवी फुटते. झाडाच्या फांद्या छाटल्या जातात पण त्या ठिकाणी नवीन पालवी फुटते. प्राणी, पक्षी देखील विपरीत परिस्थितीला तोंड देतात आणि प्राप्त परिस्थितीशी जुळवून घेतात. आपण तर माणूस आहोत. परमेश्वराने आपल्याला बुद्धी दिली आहे. आपण संकटांनी असे हाताश होऊन कसे चालेल ?

" घन तमी शुक्र बघ राज्य करी, रे खिन्न मना बघ जरा तरी..."असं एक सुंदर गाणं आहे. सर्वत्र अंधार पसरलेला असताना हा शुक्रतारा आपल्या प्रकाशाने आजूबाजूच परिसर उजळून टाकण्याचा प्रयत्न करत असतो. तो असं म्हणत नाही की माझ्या एकट्याने काय होणार आहे ? स्वतःच्या जीवनाचा दीप विझवून अंधार करण्यापेक्षा इतरांसाठी प्रकाश देणारा दीप बना. जीवन असे सुखासुखी नष्ट करू नका. आज रात्र आहे पण उद्या पहाट होणारच आहे हे निश्चित ! हे जीवन म्हणजे परमेश्वराने आपल्याला दिलेली एक अनमोल भेट आहे हे लक्षात ठेवून वागा.

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

४/४/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...