मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग ४२

उगवतीचे रंग

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ४२

बहुतांपरी हेचि आता धरावे |

रघुनायका आपुलेसे करावे|

दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे|

मना सज्जना राघवी वस्ती कीजे|४२|

अर्थ: हे मना, तुला वेगवेगळ्या प्रकारे सांगून झाले. आता ही एकच गोष्ट लक्षात ठेव की रघुनायकाला म्हणजे रामाला तू आपलेसे कर. तो अनाथांचा नाथ आहे असा त्याचा लौकिक सर्वत्र गाजतो आहे. तेव्हा तू मनाने भगवंतपाशीच कायमचा निवास कर.

( बहुतांपरी - वेगवेगळ्या प्रकारे, धरावे - लक्षात ठेव, तोडर - पायातील किंवा हातातील एक अलंकार/तोडा/तोरड्या )

विवेचन 

सगळ्या गोष्टींचा ( आपल्या कर्तव्याचा किंवा स्वधर्माचा नव्हे ) म्हणजे माया, मोह इत्यादींचा त्याग करून भगवंताला शरण जावे हे वेगवेगळ्या प्रकारे सांगून झाले असे समर्थ आपल्याला सांगतात. इथे बहुतांपरी या शब्दाचे दोन अर्थ घेता येतात. पहिला अर्थ म्हणजे नाना परीने, निरनिराळ्या प्रकारे. जी लहान मुले ऐकत नाहीत त्यांना आपण निरनिराळ्या प्रकारे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो तसेच समर्थ देखील आपल्याला हे वेगवेगळ्या शब्दात समजावून सांगतात. चांगल्या गोष्टी या परोपरीने पुन्हा पुन्हा सांगून मनावर ठसवाव्या लागतात. तसेच समर्थ या ठिकाणी करतात परंतु अशा गोष्टींनाही एक मर्यादा असते. म्हणून ते निर्वाणीचे सांगतात की आता तू रघुनायकाला म्हणजे भगवंताला आपलेसे कर. 

बहुतांपरी या शब्दाचा दुसराही अर्थ असा घेता येतो की परमेश्वराचे जे अनेक भक्त झाले, त्यांच्याप्रमाणे तू वाग आणि परमेश्वराला आपलेसे करून घे. रामायणातील कैकयी, रावण यासारखी काही मोजकी पात्रे वगळली तर बहुतेक इतरांनी श्रीरामांना भक्तीने आपलेसे करून घेतले आहे. हनुमान, बिभीषण, शबरी, गुहक असे अनेक जण त्यांचे भक्त होते. सुदामा, कुंती, द्रौपदी, पांडव, विदुर यासारखी अनेक मंडळी श्रीकृष्णाची भक्त होती. त्यांनी श्रीकृष्णाला आपलेसे करून घेतले होते. श्रीकृष्ण त्यांना आपला सखा, मित्र, बंधू, मार्गदर्शक, तारणहार असे सगळे काही वाटत होता. 

रावणाला श्रीरामांबद्दल सर्वांनी सांगितले. परंतु त्याला ते कधी आपलेसे वाटले नाहीत. त्याला स्वसामर्थ्याचा अहंकार होता. पांडवांना श्रीकृष्ण जसा आपला वाटला, तसा दूर्योधन आणि अन्य कौरवांना कधी वाटला नाही. ज्यांना ज्यांना भगवंत आपला वाटला नाही, त्यांचा मार्ग चुकला. ते नको त्या मार्गाने गेले आणि शेवटी त्यांचा विनाश झाला. 

जसा अहंकारी माणूस व्यवहारातही कोणाला आवडत नाही. तसा तो भगवंताला सुद्धा आवडत नाही. अहंकार हा अध्यात्मात फार मोठा शत्रू आहे. म्हणून आपण आपला सर्व अहंकार टाकून भगवंताला शरण जावे आपल्याला तो आपलासा वाटला पाहिजे. 

तो ' दीनानाथ ' आहे, हे त्याचे ब्रीद सर्वत्र गाजते आहे. इथे आपण 'दीनानाथ 'या शब्दाचा अर्थ केवळ दीनदुबळ्यांचा नाथ असा न घेता शरणागताला आश्रय देणारा असा घ्यायचा आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर भगवंताशिवाय ज्यांना आपले दुसरे कोणी नाही असे वाटते अशांचा तो नाथ आहे. संत मीराबाई म्हणतात," मेरे तो गिरीधर गोपाल दूसरो न कोई." तेव्हा हे मना तू केवळ एका राघवाचा म्हणजेच भगवंताचा आश्रय घे.

भक्ती म्हणजे केवळ पूजा नाही, तर भगवंताशी जोडलेले एक जिव्हाळ्याचे, आत्मीय असे नाते आहे. ज्याला भगवंत “आपला” वाटतो, त्याचा जीवनप्रवास सुकर होतो. आणि ज्याने भगवंताला “आपलेसे” केले, त्याला दुसऱ्या कोणत्याही आधाराची गरज उरत नाही.

स्वसंवाद :

१) माझे भगवंताशी नाते कसे आहे ? त्यात प्रेम, समर्पण भाव आहे का? की ते गरजेपोटी आहे ?

२) माझ्या स्वभावातील अहंकार मला जाणवतो का ? तसे असेल तर तो कमी करण्यासाठी मी काय करतो?

३) संकटाच्या वेळी खरोखर एकमात्र भगवंतच मला तारील असा त्याच्यावर विश्वास ठेवतो का? (क्रमशः)

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव

३/४/२०२६

प्रतिक्रियेसाठी : ९४०३७४९९३२

(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...