मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग ४०

 उगवतीचे रंग

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ४०

मना पाविजे सर्वही सुख जेथे ।

अती आदरे ठेविजे लक्ष तेथे ।

विवेके कुडी कल्पना पालटीजे ।

मना सज्जना राघवी वस्ती कीजे ।४०।

अर्थ 

समर्थ आपल्या मनाला सांगतात की हे मना, सर्व सुखे जिथे प्राप्त होतात अशा त्या परमेश्वराकडे अतीव अशा आदराने आपले लक्ष केंद्रित कर. योग्य अयोग्यतेचा विचार करून वाईट विचारांचा/कल्पनांचा त्याग कर आणि राघवाच्या ठिकाणी आपले मन असू दे.

विवेचन 

आधीच्या श्लोकात आपण पाहिले की सुखाची आणि समाधानाची प्रत्येकाची कल्पना वेगवेगळी असते. कोणाला पैसा हवा असतो, कोणाला यश तर कोणाला कीर्ती तर कोणाला आणखी काही... माणूस क्षणिक मोहाला बळी पडतो आणि त्या सुखाच्या मागे धावतो परंतु अंतिमतः सुखाऐवजी दुःखच पदरात पडते. क्षणकाल टिकणाऱ्या सुखासाठी आपण फार मोठी किंमत मोजून दुःख पदरात घेतो. 

काम, क्रोध, लोभ, मोह यासारख्या विकारांनी मन दूषित होते. असे मन आणखी वाईट विचारांना जन्म देते. माणसाची दिवसेंदिवस अधोगती होत जाते. ज्याप्रमाणे गढूळ पाण्यात आपल्याला प्रतिबिंब दिसत नाही तसेच नाना प्रकारच्या विकारांनी दूषित झालेल्या मनात भगवंताचे प्रतिबिंब पडणे शक्य नसते. म्हणूनच अशा वाईट विचारांचा विवेकपूर्वक त्याग करणे आवश्यक असते. कुडी कल्पना म्हणजे वाईट विचार. ज्या गोष्टी किंवा जे विचार भगवंतापासन दूर नेतात, त्या सगळ्या गोष्टी म्हणजे कुडी कल्पना असे म्हणता येईल. म्हणून तर "सदाचार हा थोर सांडू नये तो, जनी तोचि तो मानवी धन्य होतो" हे समर्थांनी सुरुवातीलाच आपल्याला सांगितले आहे.

एखाद्या विद्वत् सभेत जर विद्वानांना एखाद्या विषयावर त्यांचे मत विचारले तर प्रत्येकाची वेगवेगळी मते येतील. तात्पर्य त्यांच्यामध्ये एकाच विषयावर एकवाक्यता नसते. पण जर सर्व खऱ्या संतांचा ( भोंदू बाबा नव्हे) मेळा भरला आणि त्यांना जर अंतिम सुख आणि समाधान कशात आहे हे विचारले तर त्या विषयावर त्यांचे एकमत होईल, एकवाक्यता असेल आणि एका सुरात "भगवंत" असेच उत्तर त्यांच्याकडून येईल. 

संत हे ईश्वराचे प्रतिनिधी असतात नव्हे ईश्वर स्वरूपच असतात. परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग ते आपल्याला दाखवतात. त्यांना लोकांच्या कल्याणाची तळमळ असते. जर अशा सर्व संतांचे अंतिम समाधान हे भगवंताच्या ठायी आहे असे एकमत असेल तर आपण ते का स्वीकारू नये ? 

क्षणिक सुखाच्या मागे लागण्यापेक्षा मग संत सांगतात तो मार्ग का स्वीकारू नये ? पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, प्रत्यक्ष चक्रपाणि उभा असे.. असे संत चोखामेळा आपल्याला सांगतात. तर देवाचिये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्ती चारी साधियेल्या... असे संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. संतांचे हे सांगणे आपण लक्षात घ्यायचे नाही का? थोडा विचार केला म्हणजेच विवेकाने वागायचं ठरवलं तर ही गोष्ट आपल्याला पटेल. म्हणून संतांचे सांगणे शिरोधार्य मानून आपण विवेकाने वाईट विचारांचा त्याग करावा आणि राघवाकडे आपले मन लावावे. 

स्वसंवाद 

१) माझे मन गढूळ आहे की स्वच्छ – आज माझ्या मनात कोणते विचार जास्त असतात, चांगले की वाईट ?

२) विद्वान आणि संत यांच्यात फरक आहे – मी माझ्या जीवनात कोणाचे मार्गदर्शन घेतो, बुद्धीचे की श्रद्धेचे ?

३) "विवेके कुडी कल्पना पालटीजे" – आज मी कोणत्या एका वाईट विचाराचा किंवा सवयीचा विवेकाने त्याग करण्यास तयार आहे ?

४) संत चोखामेळा, ज्ञानेश्वर, तुकाराम सर्वांनी एकमताने भगवंत हेच अंतिम सुख सांगितले – हे माझ्या मनाने खरोखर स्वीकारले आहे का ?

 (क्रमशः)

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

२/४/२०२६

प्रतिक्रियेसाठी : ९४०३७४९९३२

(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा)




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...