मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग ३९

 उगवतीचे रंग

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ३९

जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे |

जयाचेनि योगे समाधान बाणे|

तयालागी हे सर्व चांचल्य दीजे |

मना सज्जना राघवी वस्ती कीजे|३९|

अर्थ 

ज्या परमेश्वराचे वर्णन वेद, शास्त्रे आणि पुराणे करतात, ज्याच्या जवळ गेल्याने आपल्याला अक्षय समाधान लाभते, अशा परमेश्वराला आपल्या मनातील सर्व प्रकारची चंचलता अर्पण करावी. मनाने त्याचेच होऊन राहावे.

विवेचन

माणूस आयुष्यभर सुखाच्या पाठी धावत असतो परंतु एवढी धावपळ करूनही आयुष्याच्या अखेरीपर्यंत त्याला ते गवसत नाही. आपल्या पूर्वजांनी ऋषीमुनींनी देखील समाधानाचा शोध घेतला अखेरीस त्यांना ते भगवंताच्या ठिकाणीच आहे असे आढळून आले. त्याचेच वर्णन आपले वेद, शास्त्रे आणि पुराणे करतात. म्हणून समर्थ देखील आपल्याला सांगतात की जयाचेनि योगे समाधान बाणे. त्याचा योग म्हणजे संबंध आला की अंगी समाधान बाणते म्हणजे त्याची प्रचिती येते. 

संत तुकाराम महाराज म्हणतात, "ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान." हे आपल्याला कळते पण वळत नाही आणि आपला सुखाचा आणि समाधानाचा शोध सुरूच राहतो. प्रत्येक परिस्थितीत आपली सुखाची आणि समाधानाची व्याख्या बदलत जाते. मला नोकरी लागली म्हणजे मी सुखी होईल, माझ्या पगारात वाढ झाली म्हणजे मी सुखी होईल, माझ्याकडे आज चार चाकी आहे, उद्या त्यापेक्षा आणखी चांगल्या प्रकारचे वाहन आले म्हणजे मला समाधान लाभेल. आणखी जमीन, आणखी घरे, बंगले यासारख्या गोष्टी माणूस मिळवण्यासाठी माणूस धडपड करतो आणि त्यासाठी आयुष्यभर धाव धाव धावतो. परंतु त्याची हाव संपत नाही. कुठे थांबायचे हे त्याला कळत नाही. 

एका शेतकऱ्याची गोष्ट फार सुंदर आहे. तो आपल्या शेताच्या बांधावर आरामात झोपला होता. त्याची एका मोक्याच्या ठिकाणी शेतजमीन होती. शहरातून आलेला एक कारखानदार ती जमीन विकत घेऊन तिथे कारखाना काढण्याच्या तयारीत होता. तो त्या शेतकऱ्याला म्हणाला ,"तू मला ही जमीन दिलीस तर मी तुला भरपूर पैसे देईन. तू श्रीमंत होशील." शेतकऱ्यांनी विचारले," भरपूर पैसे मिळाल्यावर आणि श्रीमंत झाल्यावर काय होईल ?" जमीनदार म्हणाला," वेडा आहेस का ?अरे तू अत्यंत समाधानात राहशील." शेतकरी म्हणायला," मग त्यासाठी जमीन विकायची काय गरज आहे ? मी आत्ता देखील समाधानीच आहे." एका सामान्य शेतकऱ्याला जी गोष्ट कळली ती आपल्याला कळत नाही. 

परमेश्वर प्राप्तीच्या आड जर काही येत असेल तर ते म्हणजे आपले मन ! आपले मन अतिशय चंचल आहे आणि ही गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणून तर एका गाण्यात म्हटले आहे, " माझिया मना जरा जरा थांब ना, तुझे धावणे अन् मला वेदना !" म्हणून समर्थ म्हणतात की आपले हे चांचल्य म्हणजे चंचलता भगवंताला अर्पण करून आपली चित्त त्याच्याकडे केंद्रित करावे. त्याचे ध्यान लागावे.

 गीतेत भगवंत म्हणतात " सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज " सर्वधर्म म्हणजे आपली सुखदुःखे, कर्म, वासना आदी सगळे भगवंताला अर्पण करून त्याला शरण जावे. तो आनंदनिधान आहे. अक्षय सुख आणि समाधान त्याच्याच ठायी आहे.

स्वसंवाद 

स्वसंवाद :

१) मी ज्या सुखाच्या शोधात धावत आहे, ते खरोखरच मला समाधान देणारे आहे का? की ही केवळ अंतहीन धावपळ आहे?

२) माझ्या मनातील चंचलता, अपेक्षा आणि असंतोष मी कधी परमेश्वराला अर्पण करण्याचा प्रयत्न केला आहे का?

३) “समाधान” ही बाह्य गोष्टींमध्ये नसून अंतर्मनात आहे हे मला खरेच पटले आहे का? (क्रमशः)

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

२/४/२०२६

प्रतिक्रियेसाठी : ९४०३७४९९३२

(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा)



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...