मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग २३

उगवतीचे रंग

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक – भाग २३

न बोले मना राघवेवीण काही ।

जनी वाऊगे बोलता सुख नाही ।

घडीने घडी काळ आयुष्य नेतो ।

देहांती तुला कोण सोडू पाहतो ।।२३।।

अर्थ :

हे मना, एका राघवाशिवाय म्हणजेच भगवंताच्या नामाशिवाय दुसरे काही बोलू नकोस. तू इतर व्यर्थ बडबड केलीस तर तुला जे पारमार्थिक सुख अपेक्षित आहे ते मिळणार नाही. काळ क्षणाक्षणाला आपले आयुष्य कमी करीत असतो. जर या काळात परमेश्वराचे नामस्मरण करणे राहून गेले, तर अंतकाळी तुला कोणीही वाचवू शकणार नाही.

विवेचन :

मागील श्लोकात समर्थांनी आपल्या हितासाठी श्रीरामाचे नाव चित्तामध्ये दृढ धारण करावे असा उपदेश केला. या श्लोकात त्याच विचाराचा विस्तार करत ते आपल्या मनाला बजावतात की हे मना, एका रामाशिवाय तू दुसरे काही बोलू नकोस. कारण इतर गोष्टी बोलण्यात खरे सुख नाही. काळ कोणासाठीही थांबत नाही. तो कोणाचाही अपवाद करत नाही. क्षणाक्षणाला तो आपले आयुष्य कमी करीत असतो आणि एक दिवस असा येतो की अंतिम क्षणी तो आपल्यालाही सोडत नाही.

समर्थांना आपल्या कल्याणाची किती तळमळ आहे हे या श्लोकातून जाणवते. आपले जीवन म्हणजे परमेश्वराकडून मिळालेली एक अमूल्य भेट आहे. पण या जीवनामध्ये ज्याने आपल्याला ही सुंदर देणगी दिली त्या परमेश्वरालाच आपण विसरतो आणि निरर्थक बोलण्यात आपले आयुष्य वाया घालवतो.

बोलण्यात आपली मोठी शक्ती खर्च होत असते. अनेकदा बोलण्यामुळे जेवढा शीण येतो, तेवढा एखादे श्रमाचे काम केल्यामुळेही येत नाही. एखादा वक्ता जर दोन-तीन तास सतत बोलत राहिला तर त्याला किती थकवा येतो हे त्यालाच ठाऊक असते. शाळा-महाविद्यालयांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांना आणि प्राध्यापकांनाही हा अनुभव वारंवार येत असतो.

परंतु समाजात आपण पाहतो की बरीच मंडळी व्यर्थ बोलण्यात वेळ घालवतात. चौकात उभे राहून गप्पा मारणारी तरुणांची टोळकी, कट्ट्यावर बसणारे लोक, कार्यक्रमांच्या निमित्ताने एकत्र जमलेली मंडळी या सगळ्यांच्या चर्चांना कोणताही विषय चालतो. एकदा बोलायला सुरुवात झाली की कोणत्याही विषयावर अखंड बोलत राहणे ही सवय बनते. यात वेळेचा आणि शक्तीचाही अपव्यय होतो.

अति बोलण्याची सवय वृद्धापकाळात त्रासदायक ठरू शकते. अशा वेळी घरातील लोकांनाही ती माणसे नकोशी वाटू लागतात. बोलायला कोणी नसते आणि त्यामुळे मनात निरर्थक दुःख साचत जाते. म्हणून वेळीच सावध होणे आवश्यक आहे. आजच्या काळात टीव्हीवरील चर्चा, भडक बातम्या किंवा निरर्थक वादविवाद यांकडे लक्ष देण्यातही आपला बराच वेळ खर्च होतो. परंतु साधकाच्या दृष्टीने त्यातून फारसे काही निष्पन्न होत नाही.

आपले खरे हीत साधायचे असेल तर भगवंताच्या नामाशिवाय दुसरा मार्ग नाही. त्या नामाला विसरून आपण कितीही इतर गोष्टी बोलत राहिलो, तरी ती व्यर्थ बडबडच ठरते. त्यामुळे खरे सुख मिळत नाही. येथे सुख म्हणजे परमेश्वर प्राप्तीच्या किंवा आत्मसाक्षात्काराच्या दृष्टीने होणारी आपली वाटचाल असे म्हणता येईल. 

नाम घेण्याची सवय जर आयुष्यभर अंगवळणी पडली नाही, तर अंतकाळी ते सहजपणे आपल्या मुखात येणार नाही. संतांना माणसाचे कल्याण व्हावे याची प्रचंड तळमळ असते. म्हणूनच संत गोंदवलेकर महाराज देखील आपल्या प्रवचनांमध्ये वारंवार सांगतात की तुम्ही रामनाम घ्या.

समर्थ रामदासांचाही कळकळीचा हाच संदेश आहे. जीवनाचा एकही क्षण व्यर्थ घालवू नका; भगवंताचे नामस्मरण करा.

स्वसंवाद

• वेळ, शक्ती आणि आयुष्य वाया घालवणाऱ्या व्यर्थ चर्चांपासून मी स्वतःला दूर ठेवू शकतो का?

• माझ्या दैनंदिन जीवनात भगवंताचे नामस्मरण कितपत आहे?

• आयुष्याचा प्रत्येक क्षण अमूल्य आहे याची जाणीव ठेवून मी तो अधिक अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करतो का?

(क्रमशः)

© विश्वास विष्णू देशपांडे, चाळीसगाव.

१५/३/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( हा लेख नावासह अग्रेषित करण्यास हरकत नाही. )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...