उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ३५
असे हो जया अंतरी भाव जैसा|
वसे हो तयार अंतरी देव तैसा |
अनन्यास रक्षीतसे चापपाणी |
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी|३५|
अर्थ
आपल्या मनात परमेश्वराबद्दलचा जसा भाव असेल त्याप्रमाणे परमेश्वर आपल्या अंतरामध्ये वसतो म्हणजे त्याचे अस्तित्व जाणवते. अनन्यभावाने परमेश्वराला जो शरण जातो त्याचे रक्षण हा धनुर्धारी राम नक्कीच करतो. आपल्या भक्तांची तो कधीही उपेक्षा करत नाही.
( अनन्य - एकनिष्ठ, चापपाणी - हाती धनुष्य धारण केलेला /भगवंत )
विवेचन
आधीच्या श्लोकात समर्थ देव आपल्या भक्तांचे रक्षण करतो असे आपल्याला सांगतात. या श्लोकात ते आपल्याला परमेश्वर कोणत्या भक्तांचे रक्षण करतो ते सांगतात. परमेश्वर सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी वास करतो. परंतु त्याच्याबद्दलची आपली जाणीव किती तीव्र आहे यावर आपल्याला त्याची होणारी अनुभूती ठरते. भगवंताविषयीची भावना जर आपल्या अंतःकरणात तीव्र असेल तर तो प्रकट होण्यास वेळ लागत नाही.
या श्लोकात 'भाव ' हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. जसा भाव तसा देव किंवा देव भावाचा भुकेला असे आपण म्हणतो. कोणी भक्त स्वतःला परमेश्वराचा दास म्हणून घेतात. समर्थ स्वतःला रामाचा दास म्हणून घेत असत. ही दास्यभक्ती. काही भक्त परमेश्वराला आपला पती समजून त्याची पत्नीभावाने आराधना करतात अशा प्रकारच्या भक्तीला मधुरा भक्ती असे म्हटले जाते. काही भक्त परमेश्वराला आपली आई मानून त्याची भक्ती करतात. ही वात्सल्य भक्ती. तर काही परमेश्वराला आपला मित्र किंवा सखा मानून त्याची भक्ती करतात. ही झाली सख्ख्य भक्ती. असे भक्तीचे म्हणजेच भावाचे विविध प्रकार आहेत. आपली भक्ती ज्या प्रकारची असेल तशा स्वरूपात परमेश्वर आपल्याला दर्शन देतो. त्या अनादी अनंत आणि निर्गुण निराकाराला कोणत्याही रूपात प्रकट होण्यासाठी अडचण नाही.
शेगावीचे महान संत श्री गजानन महाराज यांनी आपल्या भक्तांना वेगवेगळ्या स्वरूपात दर्शन दिले होते. कोणाला त्यांनी समर्थ रामदासांच्या रूपात दर्शन दिले तर कोणाला विठ्ठलाच्या रूपात. परमेश्वराने सुद्धा आपल्या भक्तांना त्यांच्या इच्छेप्रमाणे विविध रूपात दर्शन दिले आहे. अर्जुनाला तर त्याने विश्वरूप दर्शन सुद्धा घडवले. अडचण परमेश्वराकडून नाही. अडचण आपल्याकडून असते. आपल्या मनामध्ये तेवढा समर्पण भाव नसतो.
परमेश्वर कोणाचे रक्षण करतो या प्रश्नाचे उत्तर समर्थ श्लोकातील तिसऱ्या ओळीत देतात. ते म्हणतात," अनन्यास रक्षीतसे चापपाणी." अनन्य म्हणजे कोण हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. एका परमेश्वराशिवाय आपल्याला दुसरा कोणताही आधार नाही, आश्रय नाही अशा प्रकारची भावना ज्याच्या मनामध्ये असते तो अनन्य भक्त ! अशा भक्तांचे तो धनुर्धारी राम रक्षण करतो.
आपली भक्ती ही सकाम भक्ती असते. आपण देवाची भक्ती केली म्हणजे देवाने आपले रक्षण करावे, आपल्याला सुख, समाधान, यश आणि ऐश्वर्य प्रदान करावे अशी आपली इच्छा असते. अर्थात त्यात फार काही चुकीचे आहे अशातला भाग नाही. परमेश्वर आपल्या संकटात जर धावून आला नाही तर आपली त्याच्यावरील श्रद्धा डळमळीत होते. मी एवढे देवाचे करतो परंतु काही उपयोग होत नाही असे आपण म्हणतो. परंतु याला परमेश्वराची अनन्यभावाने भक्ती म्हणता येणार नाही. मला इतर गोष्टी नाही मिळाल्यात तरी चालतील. मला फक्त परमेश्वर हवा आहे, त्याचे दर्शन हवे आहे अशा प्रकारची भावना जेव्हा आपल्या मनामध्ये तीव्रतेने निर्माण होईल तेव्हाच परमेश्वराचे दर्शन आपल्याला घडू शकेल. श्रीकृष्णाचा भक्त सुदामा आणि त्याची पत्नी श्रीकृष्णाचे अनन्य भक्त होते. त्यांच्यावर प्रपंचामध्ये अनेक संकटे आली, प्रचंड दारिद्र्य पाचवीला पुजले होते. मुलांना प्रसंगी उपाशी झोपावे लागत होते. परंतु परमेश्वरावरील त्यांची श्रद्धा कधीच डळमळीत झाली नाही. आपल्याला जे काही अन्न प्राप्त झाले असेल त्याच्यातीलच काही भाग बाजूला काढून ते परमेश्वराला अर्पण करत असत. आणि मगच स्वतः भोजन करीत. ही झाली अनन्यभक्ती. परमेश्वराने भलेही त्यांची परीक्षा पाहिली असेल परंतु अशा अनन्यभक्तांचे परमेश्वराने रक्षण केले आहे.
स्वसंवाद
१) माझी भक्ती कोणत्या प्रकारची आहे ? दास्य, सख्य, वात्सल्य की मधुरा ? माझ्या भक्तीचा नैसर्गिक भाव कोणता हे मी ओळखले आहे का ?
२) "जसा भाव तसा देव." माझ्या मनात परमेश्वराविषयी खरोखर कोणता भाव आहे ? दृढ श्रद्धा की केवळ भीती ?
३) सुदाम्याने दारिद्र्यातही आधी परमेश्वराचा वाटा काढला. तसे माझ्या जीवनात मी करतो का ?
४) "अनन्य" म्हणजे एकच आधार. माझ्या संकटात परमेश्वर हाच माझा खरा आधार आहे असे मला मनापासून वाटते का ? (क्रमशः)
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२९/३/२०२६
प्रतिक्रियेसाठी : ९४०३७४९९३२
(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा