मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग ३३

उगवतीचे रंग

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ३३

वसे मेरूमांदार हे सृष्टिलीळा|

शशी सूर्य तारांगणे मेघमाला|

चिरंजीव केले जनी दास दोन्ही |

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी|३३|

अर्थ 

ही सृष्टी म्हणजे भगवंताची लीला आहे. त्यासृष्टीत मेरूमांदार आदी पर्वत आहेत. चंद्र, सूर्य आणि तारांगणे आहेत. मेघमाला आहेत. ही सृष्टी आहे तोपर्यंत हनुमान आणि बिभीषण दोन्ही चिरंजीव आहेत. प्रभू रामचंद्रांनी आपल्या या दोन्ही दासांना चिरंजीव केले आहे. दासाभिमानी असलेला भगवंत आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही.

( मेरू - स्वर्ग, मत्यू, पाताळ यांना आधारभूत असलेला सोन्याचा पर्वत. मांदार - समुद्रमंथनाचे वेळी या पर्वताचा रवी म्हणून वापर केला गेला )

विवेचन 

समर्थांनी आपल्याला मागील श्लोकात भगवंताच्या पराक्रमाचे आणि गुणांचे वर्णन करून सांगितले आहे या श्लोकात ते आपल्याला सांगतात की आपल्याला ही जी सृष्टी दिसते आहे ती म्हणजे केवळ भगवंताची लीला मात्र आहे. मेरू आणि मांदार हे दोन्ही पर्वत, चंद्र, सूर्य, अगणित तारे आणि तारका, असंख्य अशा आकाशमाला, बरसणारे ढग या सगळ्या गोष्टी परमेश्वराने निर्माण केल्या आहेत. 

मेरू पर्वत, ज्याला सुमेरू असेही म्हटले जाते, एक पौराणिक पर्वत असून हिमालयात स्थित आहे असे मानले जाते. हा पर्वत म्हणजे हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मांचे एक पवित्र स्थान समजले जाते. त्याचप्रमाणे हा पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावर स्थित असून पृथ्वीची नाभी समजला जातो. हा पर्वत सुवर्णप्रमाणे चमकतो. 

मांदार पर्वताचा उल्लेख देखील पौराणिक कथांमध्ये येतो. हा पर्वत बिहारच्या बांका जिल्ह्यात असून त्याची उंची सुमारे ७०० फूट आहे. पौराणिक कथेनुसार, समुद्रमंथनादरम्यान देव-दानवांनी अमृत मिळवण्यासाठी वासुकी नागासह या पर्वताला रवीसारखे वापरले होते। हे हिंदू आणि जैन धर्मातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. या अद्भुत पर्वतांसारख्या अनेक अद्भुत आणि आश्चर्यकारक गोष्टी परमेश्वराने निर्माण केल्या आहेत.

थोडक्यात सांगायचे तर आपल्याला दिसणाऱ्या या अवघ्या विश्वाचा निर्माता भगवंत आहे. या सृष्टीमध्ये सजीवांसाठी आवश्यक असलेल्या हवा, पाणी, अन्न यासारख्या गोष्टी त्यानेच निर्माण केल्या आहेत. त्याची निर्मिती असलेले चंद्र आणि सूर्य आपल्याला प्रकाश देतात. नद्या आपली तहान भागवतात. मेघातून बरसणारा पाऊस आपल्यासाठी अन्न निर्माण करतो. या सगळ्या गोष्टी म्हणजे त्या परमेश्वराचीच निर्मिती आहेत.

जोपर्यंत ही सृष्टी अस्तित्वात आहे तोपर्यंत तारे, चंद्र, सूर्य आपल्याला प्रकाश देत राहतील. मेघ जलाचा वर्षाव करत राहतील. ही भूमाता आपल्यासाठी अन्न निर्मिती करील. शतकानुशतके युगानुयुगे या गोष्टी होत आल्या आहेत आणि होत राहतील. परंतु या सृष्टीवर मानवासहित जे सर्व सजीव प्राणी, वनस्पती जन्माला आले आहेत ते सर्व मर्त्य आहेत. त्यांना मृत्यू अटळ आहे. 

जिवासवें जन्मे मृत्यू, जोड जन्मजात

दिसे भासतें तें सारें विश्व नाशवंत

या गीतरामायणातील ओळी मानवी जन्म आणि मृत्यू हे कसे एकमेकांशी निगडित आहेत हे सांगतात. 

या जगात जो जन्माला आला त्याला एक दिवस मृत्यू आहेच हे निश्चित. पण असे असले तरी भगवंताने आपल्या दोन दासांना चिरंजीवित्व प्राप्त करून दिले. या जगामध्ये सात व्यक्ती चिरंजीव आहेत असे मानले जाते. 

अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमानश्च बिभीषणः।

कृपाः परशुरामश्च सप्तैते चिरंजिविनः॥

अश्वत्थामा, बळीराजा, वेद व्यास, हनुमान, बिभीषण , कृपाचार्य आणि परशुराम हे ते सप्त चिरंजीव. यातील हनुमान आणि बिभीषण हे दोघे निस्सीम श्रीरामांचे भक्त आहेत. हनुमंताचा जन्म वानर कुळातील तर बिभीषण राक्षस कुळात जन्मलेला. हनुमंत श्रीरामांचा निष्ठावान सेवक आहे हे आपण जाणतो. बिभीषणाची गोष्ट मात्र जरा वेगळी आहे. त्याचा जन्म राक्षस कुळात झालेला आणि महापराक्रमी रावणाचा तो सख्खा भाऊ. अन्यायी अशा रावणाची साथ सोडून श्रीरामांच्या पक्षात येणे ही गोष्ट त्याच्यासाठी एवढी सोपी नव्हती. परंतु तरी देखील त्याची रामावर असणारी श्रद्धा एवढी प्रचंड होती की तो हा सगळा विरोध सहन करून श्रीरामांना शरण आला. रामाने रावणाचा वध केल्यानंतर श्रीरामांनी लंकेचा राजा व्हावे अशीही इच्छा बिभीषणाने व्यक्त केली होती. एवढा तो रामभक्त होता. 

हनुमंत आणि बिभीषण या दोघांचेही स्वभाव आणि कर्म वेगवेगळे होते. परंतु या दोघांमध्ये एक गोष्ट मात्र समान होती. ती म्हणजे ते दोघेही श्रीरामांचे परमभक्त होते. त्यांच्या अपार भक्तीमुळे श्रीरामांनी त्यांना चिरंजीव केले. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून त्यांची सुटका केली. या मृत्यू लोकात जन्म घेऊनही ते अमर झाले ही फक्त श्रीरामंचीच कृपा !

खरी निष्ठा आणि भक्ती कशी असते आणि अशा भक्तांवर प्रभू श्रीराम कशी कृपा करतात हे या उदाहरणातून समर्थांनी आपल्या निदर्शनास आणून दिली आहे. आणि म्हणून ते पुन्हा आपल्याला सांगत आहेत की श्रीराम हे दासाभिमानी आहेत. आपल्या भक्ताची ते कधीही उपेक्षा करीत नाहीत.

स्वसंवाद 
१)  हनुमान आणि बिभीषण यांच्या इतकी भगवंताची भक्ती कदाचित मला जमणार नाही. परंतु किमान त्या मार्गावर चालावे असे तरी मला वाटते का ?
२) ही सृष्टी भगवंताची लीला आहे असे मी मानतो का ? 
३) निसर्गाच्या विशालतेकडे पाहताना माझ्या मनात परमेश्वराप्रती कृतज्ञता येते का की मी ते गृहीत धरतो ?
४) चिरंजीव होणे म्हणजे जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती. माझ्या भक्तीचे ध्येय केवळ सांसारिक सुखापुरते आहे की मोक्षापर्यंत पोहोचण्याची  माझी खरी इच्छा आहे ? (क्रमशः)
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२७/३/२०२६
प्रतिक्रियेसाठी : ९४०३७४९९३२
(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा)

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...