मुख्य सामग्रीवर वगळा

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक – भाग १६

 उगवतीचे रंग

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक – भाग १६

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे। अकस्मात तोही पुढे जात आहे॥ पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्याते। म्हणोनी जनीं मागुता जन्म घेते॥१६॥

अर्थ : आपली प्रिय किंवा जिव्हाळ्याची व्यक्ती गेली, मरण पावली म्हणजे दुःख होणे स्वाभाविक आहे. परंतु अशा व्यक्तीच्या निधनाचे दुःख करीत बसणारा देखील त्याच रांगेत उभा असतो आणि अकस्मात त्याला देखील हे जग सोडून जावे लागते. शोक हा लोभ किंवा मोहापोटी असतो. त्यातून क्षोभ म्हणजे नाशालाच जन्म मिळतो म्हणून माणूस पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकतो. 


विवेचन 


आधीच्या श्लोकात समर्थ आपल्याला काळ हा आपल्या पाठीशी लागलेला आहे हे अटळ सत्य सांगतात. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे जातस्य हि ध्रुव मृत्यू. जो जन्मला त्याला मृत्यू निश्चित आहे. या श्लोकात ते मृत्यूबद्दलच अधिक सांगून आपल्याला जागृत करण्याचा प्रयत्न करतात. आपली प्रिय व्यक्ती मरण पावली म्हणजे दुःख होणे स्वाभाविक आहे. आपण आपल्या प्रिय व्यक्तीच्या दुःखाचा शोक करत बसतो परंतु हा शोक लोभ किंवा मोहाच्या पोटी असतो असेच समर्थांना सांगायचे आहे. कारण त्यातून क्षोभ निर्माण होतो आणि हा क्षोभ सर्वनाशाला कारणीभूत ठरतो. 


मृत्यू पावलेल्या व्यक्तीबद्दल दुःख करीत बसताना आपल्यालाही एक दिवस त्याच वाटेने जायचे आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर मृत्यूची जाणीव आपल्याला कायमस्वरूपी असली पाहिजे. म्हणजे आज माझी प्रिय व्यक्ती मला सोडून गेली परंतु उद्या मला देखील त्याच मार्गाने जायचे आहे. हे लक्षात घेतले तर आपोआपच जगण्याची आसक्ती आणि इहलोकीचा लोभ कमी होतो. असे झाले म्हणजे व्यक्ती आपल्या कर्तव्यापासून च्युत होत नाही. 


उपकार या हिंदी चित्रपटात अभिनेता प्राणच्या तोंडी जीवनाचं तत्त्वज्ञान सांगणारं एक फार सुंदर गाणं आहे. त्यात कवी म्हणतो," कस्मे वादे प्यार वफा सब बाते है, बातों का क्या ? कोई किसी का नही है, झूठे नाते है नातोंका का क्या ?"


गाडगे बाबा कीर्तन करीत असताना कोणीतरी त्यांना त्यांचा एकुलता एक मुलगा गोविंदा गेल्याची बातमी सांगितली. तेव्हा ते म्हणाले 


किती मेले कोट्यानुकोटी 

काय रडू एकासाठी ? 


लोकमान्य टिळक केसरीचा अग्रलेख लिहित असताना त्यांना देखील आपला मुलगा वारल्याची बातमी कळाली. परंतु त्यांनी आपले दुःख बाजूला ठेवून अग्रलेख पूर्ण केला आणि दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणेच केसरीचा अंक निघाला. ही सगळी मंडळी महान असली तरी त्यांना दुःख झाले नसेल का ? निश्चितच झाले असणार. परंतु त्याचे रूपांतर त्यांनी शोकामध्ये होऊ दिले नाही आणि आपल्या कर्तव्य मार्गावर ते अग्रेसर राहिले. कारण त्यांना देखील पुढे आपणही त्याच मार्गाने कधीतरी जाणार आहोत याची जाणीव होती.


समर्थ असे सांगतात की अति शोक हा मोहातून निर्माण होतो. मोह म्हणजेच लोभ किंवा वासना. असे षडरिपूंचे मायाजाल आपल्याला जगण्यात किंवा ज्या अनंत अशा राघवाच्या मार्गावर आपल्याला चालायचे आहे त्यापासून परावृत्त करते. माणसाने त्यातून बाहेर पडले पाहिजे. 

इच्छेतून वासना निर्माण होतात. वासनेतून काम किंवा षडरिपू निर्माण होतात. त्यात आपण अडकलो की जन्ममरणाच्या चक्रातून आपली सुटका नाही. आपण पुन्हा पुन्हा जन्म घेत राहतो आणि मृत्यू पावत राहतो. माणसाचे अंतिम ध्येय मोक्ष हेच आहे. म्हणूनच मरणाचा अति शोक न करता आपल्यालाही एक दिवस त्याच मार्गाने जायचे आहे हे लक्षात ठेवून आपले कर्तव्य करीत राहणे महत्त्वाचे आहे.

आपल्या संस्कृतीत जे चार आश्रम सांगितले आहेत, त्यातील वानप्रस्थाश्रमाची कल्पना फार सुंदर आहे. ती यासाठी फार उपयोगी पडते. वानप्रस्थाश्रमात संसारातील लक्ष हळूहळू काढून घ्यायचे असते. आजच्या काळात प्राचीन काळाप्रमाणे वानप्रस्थाश्रम शक्य नाही. परंतु काही ठराविक वयानंतर मुलांच्या बरोबर संसारात राहताना आपली आसक्ती हळूहळू कमी करायला हवी. ही आसक्ती जोपर्यंत कमी होत नाही, तोपर्यंत मुलांच्या संसारात अप्रत्यक्षपणे आपली ढवळाढवळ सुरूच राहते आणि त्याचे प्रमाण अति वाढले म्हणजे मुलांना देखील आपण नकोसे होतो. ही आसक्ती सोडता आली तर अंतकाळी जो मोह किंवा लोभ शिल्लक राहतो, तो राहणार नाही आणि त्यामुळे जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून आपली सुटका होऊ शकेल.


स्वसंवाद 

माझ्या प्रिय व्यक्तींबद्दल असलेले माझे प्रेम हे आसक्तीत तर बदलत नाही ना?
• मृत्यू अटळ आहे ही जाणीव मी खरंच मनापासून स्वीकारली आहे का?
• दुःखाच्या प्रसंगी मी खचून जातो की कर्तव्य मार्गावर स्थिर राहण्याचा प्रयत्न करतो?
• संसारातील मोह आणि लोभ कमी करण्यासाठी मी काही प्रयत्न करतो का?
• माझ्या आयुष्याचे अंतिम ध्येय केवळ संसारापुरते मर्यादित आहे की आत्मोन्नतीकडेही माझे लक्ष आहे?
( क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
९/३/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...