उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ३७
सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा |
उडी घालितो संकटी स्वामी तैसा |
हरिभक्तीचा घाव गाजे निशाणी |
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी|३७|
अर्थ
चक्रवाक पक्षांना ज्याप्रमाणे सूर्य अंधारापासून मुक्ती देतो किंवा दिशा दाखवतो त्याचप्रमाणे त्याप्रमाणेच परमेश्वर सुद्धा भक्ताच्या संकटात त्वरित धावून जातो आणि त्याची संकटातून मुक्तता करतो. हरीभक्तीचा महिमा पावलो पावली ऐकू येतो. त्याची निशाणी गर्जते आहे. दासाभिमानी असलेला राम आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही.
( मार्तंड - सूर्य, निशाण - एक रणवाद्य/डंका, घाव - त्या वाद्यावरील प्रहार )
विवेचन
भगवंत आपल्या भक्ताला संकटात सहाय्य करण्यासाठी कशाप्रकारे धावून जातो हे सांगण्यासाठी समर्थ आपल्याला या श्लोकात चक्रवाक पक्षाचे उदाहरण देतात.
चक्रवाक पक्षातील नर आणि मादी एकमेकांवर खूप प्रेम करतात. परंतु अंधारामध्ये या पक्षांची एकमेकांपासून ताटातूट होते. अंधारात त्यांना काहीही दिसत नाही. फक्त ते एकमेकांना साद घालतात. त्यांचा आर्त आवाज फक्त एकमेकांना ऐकू येतो. सूर्योदयाची ते वाट पाहत असतात. एकदा का सूर्योदय झाला की त्यांना दिसू लागते आणि विरहाच्या दुःखातून त्यांची मुक्ती होते. अशा रीतीने चक्रवाक पक्षी आणि सूर्य एकमेकांवर अवलंबून असतात.
या चक्रवाक पक्षांसाठी सूर्य ज्याप्रमाणे विरहातून मुक्तीचे कारण ठरतो, त्याप्रमाणेच भगवंत देखील आपल्या भक्तांसाठी धावून जातो आणि त्यांची संकटातून मुक्तता करतो. आपल्या संकटात जर भगवंत धावून यावा असे आपल्याला वाटत असेल तर आपल्याला त्याच्या भक्तीची ओढ लागली पाहिजे. आधीच्या श्लोकात समर्थांनी सांगितल्याप्रमाणे आपण त्याची अनन्यभवाने भक्ती करायला हवी म्हणजे तो संकटप्रसंगी धावून आपली त्यातून सुटका करतो.
श्रीहरी हा भक्तवत्सल आहे. जसे भक्ताला भगवंताशिवाय होत नाही तसेच श्रीहरीला देखील आपल्या भक्ताची काळजी केल्याशिवाय चैन पडत नाही. जेव्हा भक्त एक पाऊल पुढे टाकतो तेव्हा परमेश्वर त्याच्यासाठी स्वतःहून चार पावले पुढे येतो. हरिभक्तीचा महिमा फार मोठा आहे आणि हा महिमा आपल्याला पावलोपावली म्हणजे सर्वत्र ऐकू येतो. त्याची निशाणी म्हणजे त्याचा डंका सर्वत्र वाजतो आहे. वेद, शास्त्र, पुराणे देखील त्याचीच महती गात आहेत.
ज्याप्रमाणे चक्रवाक पक्षातील नर आणि मादी हे दोन जीव एकमेकांसाठी आसुसलेले असतात. त्याचप्रमाणे भक्त आणि भगवंत म्हणजे जीव आणि शिव. जीव शिवापासून म्हणजे आपल्या मूळ रूपापासून दूर गेला आहे.भगवंताची भेट म्हणजे जीवाचे शिवाशी मिलन. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर जन्म मरणाच्या फेऱ्यापासून मुक्ती. ईश्वराला मनापासून आवाहन केले तर तो आपल्या हाकेला धावून येतो. ईश्वर म्हणजे या विश्वातील सूक्ष्म आणि सर्वव्यापी अदृश्य शक्ती. ही शक्ती आपल्याला मदत करण्यासाठी तत्पर असते. फक्त आपले आवाहन तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी खरी तळमळ हवी. २७ व्या श्लोकापासून तर या ३७ व्या श्लोकापर्यंतच्या एकूण अकरा श्लोकांमध्ये परमेश्वर आपल्या भक्ताची कधीही उपेक्षा करीत नाही ही गोष्ट समर्थ आपल्या मनावर ठसवतात.
स्वसंवाद
१) चक्रवाक पक्षाला जशी सूर्याची ओढ असते तशी माझ्या मनात परमेश्वराची आर्त ओढ कधी निर्माण झाली आहे का ?
२) "जीवाचे शिवाशी मिलन" हेच जीवनाचे अंतिम ध्येय आहे. माझ्या दैनंदिन जगण्यात हे ध्येय मला दिसते का ?
३) हरिभक्तीचा डंका सर्वत्र वाजतो आहे. मला तो खरंच ऐकू येतो का की सांसारिक गोंगाटात तो माझ्यापर्यंत पोहोचतच नाही ? (क्रमशः)
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
३०/३/२०२६
प्रतिक्रियेसाठी : ९४०३७४९९३२
(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा