उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग २९
पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे |
बळें भक्तरीपूशिरी काम्बि वाजे |
पुरी वाहिली सर्व जेणें विमानीं|
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी|२९|अर्थ :
आपल्या भक्तांचे रक्षण करणारा हे त्या राघवाचे वचन पदोपदी गाजत आहे म्हणजेच त्याचा जयघोष सर्वत्र ऐकू येतो. त्याच्या भक्तांच्या शत्रूवर ( त्यांच्या डोक्यावर ) तो जोराने आपल्या धनुष्य दंडाचा प्रहार करतो. प्रभू रामचंद्रांनी ( आणि श्रीकृष्णांनी सुद्धा ) आपल्या नागरिकांना आपल्या सोबत ( त्यांच्या रक्षणासाठी )विमानात बसवून नेले. असा हा परमेश्वर ( राम ) तुझी कधीही उपेक्षा करणार नाही.
( ब्रीद - प्रतिज्ञा, रिपु - शत्रू, कांबी - धनुष्याची कांबीट/कामठा, पुरी - नगरी)
विवेचन:
मागील श्लोकात समर्थांनी धनुष्य धारण ( कोदंडधारी ) केलेला राम आपल्या भक्तांच्या रक्षणार्थ कसा सज्ज आहे हे सांगितले. या श्लोकामध्ये भक्तांचे रक्षण करणे हे परमेश्वराचे ब्रीदच आहे हे समर्थ परत ठामपणे आपल्या मनावर बिंबवतात.
सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या निर्दालनासाठी भगवंत अवतार धारण करतात. जगामध्ये सामान्य माणसे, संत महंत आणि परमेश्वराचे कार्य करण्यासाठी अवतार धारण केलेली अशी तीन प्रकारची माणसे असतात. सामान्य माणूस आपल्या चांगल्या कर्माच्या सहाय्याने स्वउद्धार करून घेऊ शकतो. संत महंत आपल्या आयुष्यामध्ये धर्माची प्रतिष्ठापना करणे आणि समाजातील भक्ती किंवा सात्विकता वाढवणे असे कार्य करीत असतात. ते लोकांना ईश्वर प्राप्तीच्या मार्गावर आणण्यासाठी मार्गदर्शन करतात. परंतु दृष्टांचे निर्दालन करणे त्यांना शक्य होत नाही. ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा
जे खळांची व्यंकटी सांडो |
तया सत्कर्मी रती वाढो ||
असे म्हटले आहे. म्हणजे दुष्टांचे दुष्टत्व किंवा वाईट भावना नष्ट होवोत आणि सत्कर्म करण्याकडे त्यांची आवड वाढो.
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतम् |
धर्मसंस्थापनार्थामि युगे युगे || हे भगवंताने आपल्या भक्तांना गीतेत दिलेले वचन आहे. जे लोक परमेश्वराची भक्ती करीत नाहीत अशा लोकांना सुद्धा तो कधी शासन करत नाही. तो तर अजातशत्रू आहे. पण पण जर कोणी त्याच्या भक्ताला त्रास देत असेल तर ते मात्र तो सहन करू शकत नाही आणि त्याच्या रक्षणासाठी धावून येतो. परमेश्वर आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी तो अवतार घेतो.
जेव्हा पृथ्वीवर अनाचार माजला होता आणि राक्षसांनी सदाचारी लोकांना आणि भगवंताची भक्ती करणाऱ्या लोकांना त्रास देणे सुरू केले, तेव्हा देवीने देखील अनेक अवतार घेऊन राक्षसांचा नाश केला. श्रीराम आणि श्रीकृष्णांनी देखील अशा अनेक दुराचारी लोकांचा नाश केला.
परमेश्वर आपल्या भक्ताचे रक्षण कसे करतो यासाठी समर्थ एक उदाहरण देतात. ते म्हणतात," आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी म्हणजेच त्यांच्या उद्धारासाठी, मोक्षासाठी श्रीरामांनी अयोध्यानगरीतील नागरिकांना आपल्या सोबत विमानात बसवून नेले होते. श्रीकृष्णांनी देखील शत्रूपासून रक्षण करण्यासाठी आपल्या नगरीतील लोकांना नवीन द्वारकापूरीत नेले होते. असा हा भगवंत भक्तवत्सल आणि सज्जनांचे रक्षण करणारा आहे. एकदा का आपण त्याचे भक्त झालो की आपली सगळी काळजी तोच वाहतो आणि सर्व प्रकारच्या दुःखांमध्ये तोच आपला आधार होतो. आपले रक्षण करतो.
समर्थ म्हणतात भक्तांचे रक्षण करणे हे त्याचे ब्रीदच ( कर्तव्य)आहे. आणि भक्तांचे रक्षण करण्याबद्दलचा त्याचा महिमा पदोपदी म्हणजे सर्वत्र गाजतो आहे. राम अत्यंत उदार आहे. आपले भक्त त्याला प्रिय आहेत. त्यांच्यात तो भेदभाव करत नाही. हा माझा तो तुझा असे त्याच्याजवळ नसते. तो कोणाचीच उपेक्षा करत नाही. आपल्या भक्तांना तो मोक्ष मार्गावर नेण्यासाठी सहाय्य करतो. तेव्हा आपल्या रक्षणासाठी आणि उद्धारासाठी अशा रामाला शरण जावे हेच खरे !
स्वसंवाद
१) मी परमेश्वराची खरोखरच मनापासून भक्ती करतो का ?
२) संकटसमयी मला ‘तो माझ्या पाठीशी आहे’ ही भावना कितपत बळ देते?
३) मी सज्जनांच्या बाजूने उभा राहतो का, की परिस्थितीनुसार भूमिका बदलतो?
४ “भगवंत भक्तांची उपेक्षा करत नाही” या विचारावर माझा किती दृढ विश्वास आहे ? ( क्रमशः)
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
२३/३/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा