मुख्य सामग्रीवर वगळा

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक – भाग १७

उगवतीचे रंग

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक – भाग १७

मनी मानव व्यर्थ चिंता वाहाते ।

अकस्मात होणार होऊनि जाते ।

घडे भोगणे सर्वही कर्मयोगे ।

मतीमंद ते खेद मानी वियोगे ॥१७॥

अर्थ :

संसारात माणूस अनेक व्यर्थ चिंता करत बसतो. परंतु जे घडायचे असते ते अकस्मात घडूनच जाते. कारण प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार सुखदुःख भोगावे लागते. हे सत्य काही लोकांच्या लक्षात येत नाही आणि ते मात्र त्याबद्दल सतत दुःख करत राहतात.

विवेचन 

आधीच्या श्लोकात आपण गेलेल्या व्यक्तीचा जो शोक करतो, तो शोक मोह किंवा लोभातून निर्माण होतो असे समर्थ सांगतात. या श्लोकात ते पुढे एक वेगळाच पैलू उलगडतात. माणूस आपल्या आयुष्यात अनेक प्रकारच्या चिंतांनी त्रस्त असतो. परंतु चिंता करून फारसा उपयोग नसतो, कारण जे घडायचे आहे ते कर्मानुसार घडणारच असते.

माणसाचे आयुष्य चिंतांनी भरलेले असते. चिंता नाही असा दिवस फार क्वचितच येतो. विद्यार्थ्याला परीक्षेत उत्तीर्ण होऊ की नाही याची चिंता असते. परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर नोकरी मिळेल की नाही याची काळजी वाटते. पुढे लग्न होईल की नाही, संसार कसा होईल, मुलं चांगली निघतील का, म्हातारपणी आपली काळजी कोण घेईल ?अशा अनेक चिंता माणसाला जन्मापासून मृत्यूपर्यंत सतावत असतात. या चिंतेच्या ओझ्याखाली तो आयुष्य जगत राहतो.

परंतु समर्थ सांगतात की अशा प्रकारची व्यर्थ चिंता करण्याचा काही उपयोग नाही. कारण आपल्या आयुष्यात जे काही घडते ते आपल्या कर्मानुसारच घडत असते. आपले कर्म चांगले असेल तर त्याचे चांगले फळ मिळते, आणि दुष्कर्म केले असेल तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. बाभळीचे झाड लावून आंब्यांची अपेक्षा करणे जसे व्यर्थ आहे, तसेच दुष्कर्म करून चांगल्या परिणामांची अपेक्षा करणेही व्यर्थ आहे.

महाभारतातील दुर्योधन आणि दुःशासन यांनी नीतीने वागणाऱ्या पांडवांविरुद्ध अनेक कटकारस्थाने रचली. त्या दुष्कृत्यांचे परिणाम त्यांना भोगावे लागले आणि अखेर महाभारताच्या युद्धात संपूर्ण कौरववंश नष्ट झाला. कर्माच्या नियमानुसार फळ मिळते याचे हे ठळक उदाहरण आहे.

आपले जीवन म्हणजे परमेश्वराने दिलेली एक सुंदर आणि अनमोल भेट आहे. या भेटीचा आपण सदुपयोग करायचा की दुरुपयोग करायचा हे आपल्यावर अवलंबून आहे. अंधाराकडून प्रकाशाकडे, वाईटकडून चांगल्याकडे अशी आपली वाटचाल व्हायला हवी.

जीवनाला अनेकदा रंगमंचाची उपमा दिली जाते. त्या रंगमंचावर प्रत्येकाला एक भूमिका मिळालेली असते. त्या भूमिकेचे प्रामाणिकपणे आणि उत्तम प्रकारे सादरीकरण करणे हेच आपले कर्तव्य आहे. एखादा शिक्षक असेल तर त्याने आदर्श शिक्षक होण्याचा प्रयत्न करावा. डॉक्टर, इंजिनियर किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात असलेली व्यक्ती आपल्या कर्तव्याचे प्रामाणिकपणे पालन करत असेल तर तेच तिचे खरे साधन आहे.

आपल्या वाट्याला आलेले कर्म म्हणजेच आपला स्वधर्म आहे. संत ज्ञानेश्वर म्हणतात —

“स्वये आचरिता स्वकर्म ।

ते स्वकर्म स्वयं होई ब्रह्म ॥”

म्हणूनच माणसाने आपले कर्म उत्तम करणे आवश्यक आहे. जीवनात येणारी सुखदुःखे ही आपल्या प्रारब्धानुसारच येतात हे ज्यांच्या लक्षात येते, ते शहाणे लोक त्यांचा शांतपणे स्वीकार करतात. ते व्यर्थ चिंता करत बसत नाहीत.

परंतु जे या तत्त्वाला समजून घेत नाहीत, ते मात्र दुःख आणि खेद यांच्या गर्तेत अडकून पडतात. स्वधर्म विसरला की माणूस विकारांच्या आहारी जातो, आसक्ती वाढते आणि त्यातून निर्माण होणारी कर्मे त्याला अधिकाधिक बंधनात अडकवतात. परिणामी तो जन्ममृत्यूच्या चक्रात गुरफटत राहतो.

जर आपण खरोखरच हे मानत असू की जीवन ही परमेश्वराने दिलेली अनमोल भेट आहे, तर आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आपण सुंदर उपयोग करायला हवा. आपल्या कर्तृत्वाने जीवनपथ उजळून टाकायला हवा. कर्तव्य करताना फळाची अपेक्षा न ठेवता निरपेक्ष भावनेने कर्म करणे आणि ते परमेश्वराला अर्पण करणे हीच जगण्याची खरी रीत आहे. अन्यथा तेच कर्म बंधनकारक ठरून दुःखाला कारणीभूत होते.

स्वसंवाद

• मी माझ्या आयुष्यातील घडणाऱ्या घटनांबद्दल खूप चिंता करतो का?

• जे काही घडते ते माझ्या संचिताचे फळ आहे हे मी मान्य करतो का ?

• माझ्या हातातील वर्तमानकाळ मी चांगल्या कर्मासाठी वापरतो आहे का ?

• स्वधर्माचे पालन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो का?

• कर्तव्य करताना मी फळाची अपेक्षा ठेवतो का, की निरपेक्ष भावनेने कर्म करण्याचा प्रयत्न करतो? ( क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

१०/३/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...