उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ३८
मना प्रार्थना तुजला एक आहे|
रघुराज थक्कित होऊनि पाहे |
अवज्ञा कदाही येदर्थी न कीजे|
मना सज्जना राघवी वस्ती कीजे|३८|
अर्थ
या श्लोकात समर्थ मनाला प्रार्थना करतात की राघवाला एकवार तू थक्क होऊन पहा ( म्हणजेच त्याला समजून आणि जाणून घे ).मनाने तू कायम भगवंताजवळच वस्ती कर. माझ्या या विनंतीचा अवमान म्हणजे अवज्ञा कधीही करू नकोस.
( थक्कित - आश्चर्ययुक्त/अद्भुत, येदर्थी - या बाबतीत )
विवेचन
आतापर्यंतच्या श्लोकांमध्ये समर्थांनी मनाला उपदेश केला आहे. या श्लोकात मात्र ते मनाला प्रार्थना करतात की हे मना परमेश्वराकडे तू थक्क होऊन पहा. समर्थांचे हे सांगणे सुरुवातीला आपल्याला थोडे विचित्र वाटते. पण त्यात खूप गहन अर्थ भरलेला आहे. एखाद्या गोष्टीकडे आपण थक्क किंवा आश्चर्यचकित होऊन केव्हा पाहतो तर ज्यावेळी त्या गोष्टीचा कार्यकारण भाव आपल्याला समजत नाही. आपल्या समजण्याच्या पलीकडे ती गोष्ट असते तेव्हा आपण त्या गोष्टीकडे एखादी अद्भुत गोष्ट म्हणून पाहतो.
ज्यावेळी पहिल्यांदा वाफेवरचे पहिले रेल्वे इंजिन धावले आणि त्याच्या सहाय्याने रेल्वे धावली, त्यावेळी लोकांनी थक्क होऊन तिच्याकडे पाहिले. ही गोष्ट त्यांच्या दृष्टीने अद्भुत होती. बैल, घोडे किंवा ओढणारे कोणीही नसताना ही गाडी कशी चालते याचे कोडे सर्वसामान्यांना पडले होते. पण जेव्हा ही गोष्ट त्यांना नित्याची झाली आणि त्यामागील कार्यकारण भाव समजला तेव्हा तिचे आश्चर्य त्यांना वाटेनासे झाले. हळूहळू ते तंत्रज्ञान आपण जाणून घेतले, त्याचा अभ्यास केला. त्यात पुढे प्रगती झाली. विजेवर, डिझेलवर धावणाऱ्या रेल्वे इंजिनांची निर्मिती झाली. त्यासाठी त्या तंत्रज्ञानाच्या सानिध्यात आपल्याला जावे लागते.
तशीच ईश्वराने निर्मिलेली ही सृष्टी अद्भुत आहे. चंद्र, सूर्य, तारांगणे, मेघमाला, निरनिराळे प्राणी, पक्षी, वनस्पती आणि सूक्ष्मजीव पाहिले की थक्क व्हायला होते. या गोष्टी एकदा काळजीपूर्वक पाहिल्या की त्याच्या मागील कार्यकारण भाव जाणून घेता येईल. एखादे तंत्रज्ञान जाणून घ्यायचे असेल तर ज्याने ते निर्माण केले आहे त्याच्याजवळ जाऊन आपल्याला ते शिकावे लागते. या सृष्टीचा निर्माता ईश्वर आहे. तिचा कार्यकारणभाव जाणून घेण्यासाठी भगवंताला शरण जावे लागेल.
शरण जाणे म्हणजेच भगवंताच्या जवळ जाणे. त्याशिवाय हे शक्य नाही. म्हणून समर्थ म्हणतात मना सज्जना राघवी वस्ती कीजे. आपल्याला त्याच्याजवळ वस्ती केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळेच भगवंताच्या अस्तित्वाचे ज्ञान आपल्याला प्राप्त होईल आणि या चराचरात तो कसा भरून राहिला आहे त्याचेही ज्ञान होईल. आपले कल्याण कशात आहे हे देखील समजेल आणि मग आपोआपच आपली वाटचाल व्यवहारातून अध्यात्माकडे आणि अध्यात्माकडून मोक्षाकड अशी सुरू होईल. समर्थांचे हे सांगणे आपल्या हिताचे आहे. म्हणूनच ते म्हणतात की याची कधीही अवज्ञा करू नकोस.
स्वसंवाद :
१) मी कधी या सृष्टीकडे खऱ्या अर्थाने थक्क होऊन, आश्चर्याने पाहिले आहे का? की सर्व काही गृहीत धरून जगतो आहे?
२) माझे मन खरोखरच “राघवी वस्ती” करते आहे का, की ते अजूनही बाह्य जगातच भटकत आहे?
३) समर्थांची ही विनंती मी मनापासून स्वीकारली आहे का, की अजूनही दुर्लक्षच करत आहे? (क्रमशः)
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
३०/०३/२०२६
प्रतिक्रियेसाठी : ९४०३७४९९३२
(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा