उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक – भाग १५
मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी |
जिता बोलती सर्वही जीव मी मी` चिरंजीव हे सर्वही मानिताती |
अकस्मात सांडूनिया सर्व जाती १५|
अर्थ:
आपल्या भोवताली दिसणारे सुंदर जग म्हणजे मृत्यूभूमी आहे ही सत्य गोष्ट आहे. असे असले तरी माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत अहंकारामुळे मी मी करीत असतो. आपण अमर आहोत अशीच सर्वांची भावना असते. परंतु एक दिवस अचानक हे सगळेच सोडून जावे लागते.
आधीच्या श्लोकात समर्थ आपल्याला महाथोर ते मृत्यूपंथेची गेले असे सांगतात. या श्लोकात आपण ज्या पृथ्वीवर म्हणजेच इहलोकांत राहतो तो इहलोक किंवा ही पृथ्वी मृत्यूभूमी कशी आहे हे समजावून सांगतात. हे जग नित्य बदलते आहे किंबहुना बदल हाच या जगाचा स्थायिभाव आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीनही अवस्था पृथ्वीवर आपल्याला बघायला मिळतात. भासमान असणाऱ्या या दृश्य जगात प्रत्येक गोष्ट आपल्याला उत्पत्ती, स्थिती आणि लय या अवस्थातून जाताना दिसते. माणसाला देखील याच अवस्थांमधून जावे लागते. तरीसुद्धा प्रत्येक माणूस स्वतःला चिरंजीव समजतो आणि आपण केलेल्याचा अहंकार मिरवत असतो. हा अहंकार भल्याभल्यांचा घात करतो. ज्यांना साधना मार्गावर चालायचे आहे, त्यांना तर अहंकार विषाप्रमाणे वर्ज्य आहे. संत, सद्गुरू किंवा सद्ग्रंथ यांच्यामध्ये अहंकार दूर करण्याचे सामर्थ्य असते. म्हणून साधकाने त्यांचा आश्रय घ्यावा.
माणूस आयुष्यभर सुखाच्या मागे लागून पैसा कमावतो. घरदार, मुलेबाळे सगळे नाती निर्माण होतात. परंतु या सगळ्या गोष्टी इथेच राहतात. माणूस गेला की पैसा, धन, संपत्ती जागच्या जागीच राहते आणि इतरांची मालमत्ता होते. पत्नी त्याला दारापर्यंत पोहोचविण्यास येते, समाजातील लोक त्याला स्मशानापर्यंत पोहोचवतात. मात्र अगदी अंगावरचा कपडा देखील सोबत येत नाही. सोबत जाते ते फक्त आपले कर्म. परंतु तरीही माणसाचा ताठा किंवा गुर्मी शेवटपर्यंत कायम असते. मी एवढा पैसा कमावला, मी एवढे वैभव मिळवले, मला एवढे यश मिळाले, हे सगळे माझ्या कर्तृत्वामुळे ! माझी मुले, माझी बायको असे सगळे तो मी मी करत असतो.
काही लोक गैरमार्गाने अमाप संपत्ती कमावतात परंतु अंत्यसमयी त्यातील काहीही कामी येत नाही. करोडोंची संपत्ती असते परंतु एखाद्या दुर्धर आजाराने दवाखान्यात दाखल व्हावे लागले की पैसा सुद्धा त्याला बरे करू शकत नाही. आयुष्य वाढवून मिळत नाही की गेलेले क्षण परत येत नाहीत. हे सगळे सोडून कधीही अचानक जावे लागते. 'नाही घडीचा भरवसा, कोण काळ येईल कैसा' हेच खरे. समर्थ म्हणतात
घटका गेली, पळे गेली, तास वाजे ठणाणा,
आयुष्याचा नाश होतो राम कारे म्हणाना"
प्रत्येक क्षण मृत्यूच्या दिशेने जात असताना, संसाराच्या मायेत न अडकता ईश्वराचे (रामाचे) नामस्मरण करावे, कारण तोच कायमचा आधार आहे.म्हणून जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत आपण आपला प्रत्येक क्षण सार्थकी लावला पाहिजे आणि परमेश्वर प्राप्तीच्या दिशेने पाऊल टाकले पाहिजे. तेच मानवी जीवनाचे अंतिम ध्येय आहे.
स्वसंवाद
• माझ्या आयुष्यात मी हे केले किंवा हे सगळे माझ्यामुळे आहे असा अहंकार बाळगतो का ?
• पैसा, पद, प्रतिष्ठा या गोष्टी कायमच्या नाहीत हे मला खरोखर पटते का?
• माझ्या आयुष्यातील सत्कर्मेच माझ्यासोबत येतील यावर माझा विश्वास आहे का ? ( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
६/२/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा