मुख्य सामग्रीवर वगळा

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक – भाग १२

  उगवतीचे रंग

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक – भाग १२

मना मानसी दुःख आणू नको रे|

मना सर्वथा शोक चिंता नको रे|

विवेके देहेबुद्धी सोडूनि द्यावी|

विदेहीपणे मुक्ति भोगीत जावी |१२|

अर्थ : हे मना ( मानवा ) तू आपल्या अंतर्यामी दुःखाला थारा देऊ नकोस. व्यर्थ शोक आणि चिंता करू नकोस. विवेकाच्या सहाय्याने देहबुद्धीवर विजय प्राप्त कर. विदेही म्हणजे देहात असूनही देहापासून अलिप्त राहणे. तसे राहून मुक्तीचा ( आनंदाचा ) भोग घे.

आधीच्या श्लोकात समर्थ आपल्याला जे सुखदुःख प्राप्त झाले आहे ते आपल्या पूर्वसंचितानुसार प्राप्त झाले आहे असे सांगतात. या श्लोकात आपल्याला ते सुखदुःखापासून अलिप्त कसे राहावे त्याचे साधन सांगतात. प्रपंचामध्ये माणसाला अनेक प्रकारची संकटे आणि दुःखे प्राप्त होतात. मनुष्य माझ्याच वाट्याला हे दुःख का असे म्हणून शोक करत बसतो आणि स्वतःला दुःखी करून घेतो. समर्थ म्हणतात आपल्या अंतर्यामी दुःखाला थारा देऊ नकोस. बऱ्याच वेळा माणूस भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचा विचार करून दुःख करत बसतो. परंतु 'गतं न शोच्यम्' म्हणजे जे घडून गेले त्याचा विचार करण्यात अर्थ नाही. बीत गयी सो बात गयी. त्याचप्रमाणे उद्या काय होईल याची चिंता करत बसण्यात देखील अर्थ नाही. वर्तमानकाळ आपल्या हातात असतो आणि त्याचा वापर कसा करायचा तेही आपल्या हातात असते. म्हणून जे क्षण आपल्या हातात आहेत. ते व्यर्थ दवडू नका, व्यर्थ शोक करत बसू नका असेच समर्थांचे सांगणे आहे. 

देहदुःख ते सुख मानीत जावे असे समर्थ आपल्याला सांगतात.आपल्याला कुठले तरी आजार होतात. ताप येतो, संधीवातामुळे हात पाय दुखतात. मग हे आजार किंवा दुखणे देहाला आहे असे समजून त्याकडे दुर्लक्ष करायचे का ? असा  समर्थांच्या सांगण्याचा उद्देश नाही. त्याकडे जरूर लक्ष द्यावे त्यावर उपचारही करावेत परंतु अंतर्यामी त्याचेच दुःख धरून शोक करीत बसू नये. आपल्या आजूबाजूला नजर टाकली तर काही माणसे मोठ्या आजारांना देखील धैर्याने तोंड देताना आपल्याला दिसतात आणि काही माणसे थोड्याशा दुखण्याचा देखील बाऊ करताना दिसतात. अशी माणसे स्वतःचा त्रास तर वाढवून घेतातच परंतु त्यांच्याबरोबरच इतरांना देखील त्रास होतो.

जगात जी महान माणसे होऊन गेली, त्यांनी संकटाचे रूपांतर संधीमध्ये केले. ते शोक करीत बसले नाहीत. तुकाराम महाराजांच्या आयुष्यात तर किती संकटे आणि दुःखाचे प्रसंग आले, दुष्काळ पडला, दिवाळे निघाले, पोरेबाळे दुष्काळात मृत्युमुखी पडली. त्यांना दुःख निश्चितच झाले असणार. परंतु त्याचा शोक न करत बसता त्यांनी आपल्याला परमेश्वर साधनेची मिळालेली ही संधी आहे असे समजून उपयोग केला. म्हणून ते 'बरे झाले देवा, निघाले दिवाळे...' असे म्हणू शकले.

समर्थ या श्लोकात आपल्याला ' विवेके देहेबुद्धी सोडून द्यावी' असे सांगतात. आपली देहबुद्धी फार प्रबळ असते. आपल्याला दुःख होते ते या देहबुद्धीमुळेच. जन्मल्यापासून आपण आपल्या देहाचे लाड पुरवत असतो. खायला प्यायला चांगले हवे असते ते देहाला, बसायला उत्तम गाद्या गिरद्या हव्या असतात तेही देहालाच. उंची पोशाख, सौंदर्यप्रसाधने, आरामदायक गाडी इ सर्व गोष्टी देहासाठीच आपल्याला हव्या असतात. देहबुद्धीमुळेच माझा मुलगा, माझी पत्नी, माझे नातेवाईक इत्यादी सर्वांबद्दल ममत्व निर्माण होते. माझे घर, माझे संपत्ती, माझी गाडी हे सगळे सुद्धा देहबुद्धीमुळेच ! या देहबुद्धीचा जर आपल्याला त्याग करता आला तर आपल्या बऱ्याच समस्या दूर होतील. मग हा त्या करायचा तरी कसा तर समर्थ म्हणतात विवेकाच्या सहाय्याने.  आपण स्वतःला देह समजतो हीच मोठी चूक आहे. आपण म्हणजे देह नाही हे जेव्हा आपल्याला लक्षात येईल तेव्हा देहात असूनही आपण देहापासून अलिप्त राहू शकू. हा बौद्धिक निष्कर्ष नसून अनुभवातून दृढ होणारी जाणीव आहे. देहाच्या सुखदुःखात न अडकणे म्हणजेच विदेहीपण असेही म्हणता येईल. हे जमले तर आपण मुक्तीचा आनंद भोगू शकू. त्यासाठी मनाला सातत्याने भगवद्‌चिंतनात ठेवण्याची सवय लावावी.

स्वसंवाद

• मी भूतकाळातील घटनांवर अनावश्यक शोक करत बसतो का?

• भविष्याच्या चिंतेमुळे माझा वर्तमानकाळ व्यर्थ जात आहे का?

• देहाला झालेले दुःख आणि ‘मी’ यांमध्ये फरक करण्याचा प्रयत्न मी करतो का?

• विवेकाच्या साहाय्याने मी साक्षीभावाने जगण्याचा प्रयत्न करतो का?

• माझे मन नियमितपणे भगवद्‌चिंतनात स्थिर राहते का?

( क्रमशः )

© विश्वास विष्णू देशपांडे, चाळीसगाव

दि. ०४/०३/२०२६

प्रतिक्रियेसाठी : ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...