उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक – भाग ११
जनी सर्वसुखी असा कोण आहे ?
विचारे मना तूचि शोधूनि पाहे|
मना त्वां चि रे पूर्वसंचित केले|
तयासारिखे भोगणे प्राप्त झाले |११|
अर्थ : हे मना तू बारकाईने निरीक्षण कर आणि हे शोधण्याचा प्रयत्न करू की जगामध्ये संपूर्णतः सुखी अशी कोणी व्यक्ती आहे का ? प्रत्येक माणूस आपल्या मागील जन्मांमध्ये चांगली वाईट कृत्ये करतो. त्यांचे पूर्वसंचित त्याच्याजवळ जमा झालेले असते आणि त्यानुसारच त्याला या जन्मात सुखदुःखे भोगावी लागतात.
आधीच्या श्लोकात समर्थ म्हणतात देहेदुःख ते सुख मानीत जावे. परंतु हे एकदम होत नाही. त्यासाठी मनोभूमिका तयार करावी लागते. ती मनोभूमिका तयार करण्याचे काम समर्थ या श्लोकात करतात. जो जन्माला आला, त्याला सुखदुःख भोगणे क्रमप्राप्त आहे. कोणाचीच त्यापासून सुटका नाही. कदाचित सुखदुःखाचे प्रमाण कमी जास्त असेल परंतु प्रत्येकाला ते भोगावेच लागतात. असे म्हणून चालत नाही की माझ्याच वाट्याला एवढे दुःख का ?
म्हणून समर्थ मनाला ( म्हणजे आपल्याला )उपदेश करताना म्हणतात," जरा आजूबाजूला पहा. उघड्या डोळ्यांनी शोध घे. म्हणजे तुझ्या लक्षात येईल की जगात सर्व सुखी म्हणजे सुखाने परिपूर्ण अशी कोणीही व्यक्ती नाही." लग्न करणाराही दुःखी असतो आणि लग्न न करणारा देखील ! ज्याला संतती नाही तो तर दुःखी असतोच परंतु ज्याला संतती आहे आणि ती संतती जर कुलक्षणी निघाली तर तो त्यापेक्षाही जास्त दुःखी असतो. एखाद्या श्रीमंताला सगळे वैभव असते परंतु संतती नसते. एखाद्याकडे अमाप पैसा असतो परंतु आरोग्याची देणगी नसते. परंतु माणसाला नेहमी दुसऱ्याचे चांगले दिसते आणि माझ्या वाटेला आलेले तेवढे वाईट असे वाटते. आपण परदुःख शीतल असे म्हणतो त्याचा अर्थ हाच !
परंतु समर्थ तिसऱ्या ओळीत सांगतात की बाबा रे मागील जन्मांमध्ये तू जी काही बरी वाईट कर्मे केलीस, त्यांचे संचित जमा झाले आणि त्यानुसार या जन्मात तुला सुखदुःख भोगावे लागत आहे. या जन्मातील हे सुखदुःख अचानक किंवा अपघाताने आलेले नाही. हा भारतीय संस्कृतीमध्ये ऋषीमुनींच्या चिंतनातून आलेला कर्मविपाकाचा सिद्धांत आहे. ईश्वरी सत्तेचे नियम माणसासाठी अनाकलनीय असतात. परंतु हा कर्मविपाकाचा सिद्धांत या जन्मातील सुखदुःखांच्या कारणांची मीमांसा करतो. हा सिद्धांत विज्ञानाच्या कसोटीवर पारखून घेता येत नाही म्हणून बुद्धिवादी माणसे हा सिद्धांत नाकारतात. परंतु आपण तर्कशुद्ध विचार केला तर हा सिद्धांत आपल्याला पटतो कारण कोणतीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही. आधुनिक विज्ञानाने लावलेले शोध जेवढे महत्त्वाचे आहेत तेवढाच आपल्या पूर्वसुरींनी शोधून काढलेला हा सिद्धांत महत्त्वाचा आहे असे मला वाटते.
गीतरामायणात देखील भरताची समजूत काढताना राम त्याला सांगतो,' खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.' साक्षात परमेश्वराचे अवतार असलेल्या राम, कृष्ण यांना देखील दुःख, संकटे यांना तोंड द्यावेच लागले. संत ज्ञानेश्वरांना समाजाचा छळ सहन करावा लागला तर तुकारामांना लोकनिंदा सहन करावी लागली. अनेक संतांच्या नशिबी अशा प्रकारचे प्राक्तन आले. पण ते त्याचा शोक करीत बसले नाहीत. अग्नीतच सोने उजळून निघते. तसेच संकट समयीच माणसाची परीक्षा होते. आलेल्या दुःखातून आणि संकटातून तावून सुलाखून निघालेल्या माणसांचे जीवन उजळते आणि इतरांसाठी दीपस्तंभ बनते.
संचित, क्रियमाण आणि प्रारब्ध असे आपल्या कर्माचे तीन भाग होतात. आपण जे प्रत्यक्ष करीत असतो ते क्रियमाण, जे प्रत्यक्ष भोगत असतो ते प्रारब्ध आणि जे निर्माण झाले आहे आणि भोगावयाचे राहिले आहे ते संचित. पूर्वजन्म आणि पुनर्जन्म हे देखील या कर्मांचाच एक भाग असतात असे म्हणता येईल. इच्छेतून वासना निर्माण होते. वासनेच्या अधीन राहून आपल्या हातून कर्म घडतात आणि त्या कर्मातून बरे वाईट असे संचित निर्माण होते. ते आपल्याला भोगावेच लागते.
हा सिद्धांत जेव्हा आपण समजून घेतो तेव्हा आपल्या असे लक्षात येते की मागील जन्मात जे काही घडले, त्याबद्दल मला आता काही करता येणार नाही. त्यानुसार जी सुखदुःखे येतील ती तर भोगावी लागतीलच. परंतु या जन्मात मी जर चांगली कर्मे केली तर माझा भविष्यकाळ हा चांगला असेल. अशा प्रकारे आपल्या कर्मावर, प्रयत्नांवर आत्मविश्वास दृढ करणारा हा सिद्धांत आहे.
म्हणूनच जगामध्ये संपूर्ण सुखी असा कोणी नाही. सुखदुःखे ही प्रत्येकाला येणारच. ही गोष्ट स्वीकारू या आणि आपल्या हातात आज जे आहे ते कर्म उत्तम प्रकारे करण्याचा प्रयत्न करूया असेच या ठिकाणी समर्थ आपल्याला सांगत आहेत.
स्वसंवाद
• जगात खरोखरच कोणीही पूर्णपणे सुखी नाही ही गोष्ट मला पटते का?
• पूर्वसंचिताचा सिद्धांत लक्षात घेऊन माझ्या वाट्याला आलेली सुखदुःखे मी सहजपणे स्वीकारतो का?
• वर्तमानात माझ्या हातून अधिकाधिक चांगली कर्मे घडली तर माझा भविष्यकाळ उज्वल होईल या गोष्टीवर माझा विश्वास आहे का?
• माझ्या जीवनातील परिस्थितीबद्दल मी तक्रार करतो की जबाबदारी स्वीकारून पुढे जातो ? ( क्रमशः )
© विश्वास विष्णू देशपांडे, चाळीसगाव
दि. ०३/०३/२०२६
प्रतिक्रियेसाठी : ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा