मुख्य सामग्रीवर वगळा

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक – भाग १०

 उगवतीचे रंग

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक – भाग १०

सदा सर्वदा प्रीती रामी धरावी|

दुःखाची स्वये सांडी जीवी करावी|

देहेदुःख ते सुख मानीत जावे| 

विवेके सदा सस्वरूपी भरावे |१०|

अर्थ:

या श्लोकात समर्थ आपल्याला भगवंतावर प्रेम करायला सांगतात. प्रारब्धामुळे जे दुःख आपल्याला प्राप्त झाले आहे त्याचे वाईट वाटून न घेता त्या जाणिवेचा त्याग करायला शिकावे. देहाच्या दुःखाला सुख मानण्याचा अभ्यास करावा. योग्य आणि अयोग्याचा विवेक करून आपले मन सस्वरुपी स्थिर करावे.

प्रेम करणे हा मनुष्यस्वभाव आहे. प्रत्येकाचे कोणावर तरी किंवा कोणत्यातरी वस्तूवर प्रेम असते.  कंजूष माणसाचे धनावर प्रेम, विषयलंपट माणसाचे विषयावर प्रेम, कोणाला सत्ता प्रिय असते. असे प्रेमाचे विविध विषय असतात. प्रेमातून आनंद मिळतो परंतु हा आनंद चिरकाल टिकणारा नसतो. प्रेमाचा विषय चुकला तर दुःख पदरी पडणारच ! मदिरेच्या प्रेमात धुंद होऊन ( चित्रपटात दाखवल्याप्रमाणे )देवदास बनण्यापेक्षा भगवंताचे प्रेम लागून त्याचे म्हणजे देवाचे दास होणे कधीही चांगले. या प्रेमातून जो आनंद मिळेल तो चिरंतन असेल. म्हणूनच समर्थ म्हणतात 'सदा सर्वदा प्रीती रामी धरावी.'

आपण मनुष्य जन्मात आलो आहोत तेव्हा सुखदुःख हे असणारच. परमेश्वराने जेव्हा मानवी अवतार धारण केला तेव्हा त्याला किंवा संतांना देखील सुखदुःखे चुकली नाहीत. मग आपल्यासारख्या सामान्य माणसाची काय कथा ! आपण सुखाने आनंदतो आणि दुःखाने दुःखी होतो. परंतु या ठिकाणी दुःखाचा त्याग करायला शिका असे समर्थ आपल्याला सांगतात. थोडक्यात असे म्हणता येईल की दुःखाची जाणीवेला आपल्या मनात स्थान देण्यापेक्षा परमेश्वराच्या चिंतनाकडे जर लक्ष दिले तर दुःख हलके होईल.

हा दुःखाचा त्याग करणे म्हणजे मनाला एक प्रकारचे वळण लावणे आहे. ही गोष्ट सहजासहजी होणारी नाही. त्यासाठी समर्थ सांगतात की देहाला जे दुःख होते त्यालाच सुख मानून पुढे चालावे. याचा अर्थ प्रारब्धाने जे दुःख आपल्याला प्राप्त झाले आहे त्याचे वाईट वाटून न घेता त्याचा स्वीकार करावा आणि आपले कर्म करावे. बऱ्याच लोकांना आपल्या आजाराचा आणि दुःखाचा बाऊ करण्याची सवय असते. दुसऱ्यासमोर आपल्या दुःखाचे वारंवार प्रदर्शन करून ते सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यामुळे फारसे काही साध्य होत नाही. सतत अशी तक्रार करणारी माणसे इतरांना नकोशी होतात. प्रारब्धाने जे दुःख आपल्या वाट्याला आले आहे ते स्वीकारण्याची आणि त्यालाच सुख मानण्याची वृत्ती जेव्हा आपली होईल तेव्हा सुखाचा वेगळा शोध घेण्याची आवश्यकता राहणार नाही. असेल त्या परिस्थितीतही आपण आनंदी, सुखी आणि समाधानी राहू. 

आपल्या अवतीभवती जर नजर टाकली तर आपल्याला ज्यांना अनेक प्रकारचे शारीरिक त्रास किंवा व्याधी आहेत असे लोक आपल्या दृष्टीस पडतात. परंतु त्यातील बरेच लोक त्यांचा स्वीकार करून आपले जीवन ध्येय जे आहे त्या मार्गावर वाटचाल करताना दिसतात. प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांना मज्जासंस्थेचा गंभीर आजार झाला तरी देखील त्यांनी आपले संशोधन कार्य सुरूच ठेवले. प्रसिद्ध नृत्यांगना असलेल्या सुधा चंद्रन यांना आपला एक पाय अपघातात गमवावा लागला. परंतु त्यांनी जिद्दीने त्यावर मात केली. अशी कितीतरी उदाहरणे आहेत. थोडक्यात सांगायचे तर: या व्यक्तींनी आपल्या शारीरिक मर्यादांना आपली कमकुवत बाजू न बनवता, त्यांना आपली ताकद बनवले. "शरीराला अपंगत्व असू शकते, पण मनाला नाही," हेच त्यांनी जगाला दाखवून दिले.

म्हणून समर्थ म्हणतात की माणसाने विवेकाची कास धरून स्वस्वरूपाचे चिंतन करावे. मी म्हणजे देह नाही. त्यामुळे देहाला होणाऱ्या दुःखाशी माझा खऱ्या अर्थाने संबंध नसून मी म्हणजे एक आनंदस्वरूप आत्मा आहे अशी भावना मनाशी दृढ करावी. त्यासाठी भोवतालच्या परिस्थितीकडे साक्षी भावाने पाहता यायला हवे. देहबुद्धी समूळ नष्ट झाली की विवेक जागा होतो. तुकाराम महाराज म्हणतात

विवेके अंतरी सुटला |

वैराग्ये प्रपंच तुटला|

अंतर्बाह्य मोकळा झाला|

निःसंग योगी||

साधकाने आत्मस्वरूपाच्या चिंतनातच ( भगवंताच्या नामस्मरणात )इतके रंगून जावे की त्याला त्यामुळे दुःखाची जाणीव सुद्धा होणार नाही.

• माझे प्रेम नेमके कशावर आहे — नश्वर गोष्टींवर की चिरंतन तत्त्वावर?

• एखादे दुःख आले की मी त्याचा बाऊ करतो, की शांतपणे स्वीकारून पुढे चालतो?

• देहाला होणाऱ्या त्रासाकडे, दुःखाकडे मी साक्षीभावाने पाहू शकतो का ?

• विवेकबुद्धी वापरून मी परिस्थिती आणि प्रतिक्रिया यांमध्ये फरक करू शकतो का?

• माझे मन नामस्मरणात किंवा आत्मचिंतनात  रमते का ? ( क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

३/३/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...