मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक ३४

 उगवतीचे रंग

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ३४

उपेक्षा कदा रामरुपी असेना|

जिवा मानवां निश्चयो तो वसेना|

शिरी भार वाहेन बोले पुराणी |

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी|३४|

अर्थ 

( आतापर्यंतच्या उदाहरणांवरून समर्थांनी आपल्याला हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे की ) भगवंत आपल्या भक्ताची कधीही उपेक्षा करीत नाही. परंतु ( आपण असे दुर्दैवी जीव आहोत की ) त्याची भक्ती करण्याचा आपला निश्चयच होत नाही. भक्तांची सारी काळजी मी वाहतो असे पुराणात त्याने वचन दिले आहे. दासाभिमानी असलेला श्रीराम आपल्या दासांची म्हणजेच भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही.

( रामरुपी - भगवंताजवळ, जिवां मानवां - जीवरूपी म्हणजेच सामान्य माणसाला )

विवेचन 

आपल्या भक्ताची भगवंत कधीच उपेक्षा करीत नाही. त्याचा संपूर्ण भार तो वाहतो. हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद हा विष्णूचा भक्त होता. परंतु त्याच्या पित्याला त्याची विष्णूभक्ती मान्य नव्हती. तो देवांना आपले शत्रू मानत असे. विष्णू भक्ती करू नये म्हणून सुरुवातीला त्याने प्रल्हादाला समजावून पाहिले. परंतु तो जेव्हा ऐकत नाही असे दिसले तेव्हा त्याने विविध प्रकारे प्रल्हादाला ठार मारण्याचे प्रयत्न केले. परंतु सर्व प्रसंगांमध्ये भगवान विष्णूंनी त्याचे रक्षण केले. शेवटी नरसिंह रूपात प्रकट होऊन श्रीविष्णूंनी अत्याचारी अशा हिरण्यकश्यपूचा वध केला आणि अशा रीतीने आपल्या भक्ताचे संरक्षण केले. 

आपल्या प्रजेला परमेश्वराचे नाव घेण्यास आणि ऋषीमुनींना यज्ञ करण्यास कंसाने बंदी घातली होती. त्याने ईश्वर भक्तांचा अनन्वित छळ केला. परंतु भगवंताने श्रीकृष्ण अवतारात या अन्यायी आणि दुराचारी कंसाचा वध करून प्रजेला त्याच्या छळातून मुक्त केले. 

अशा विविध प्रकारे भगवंत आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी तत्पर असतो. त्यांचा भार किंवा काळजी तो आपल्या शिरावर घेतो अशी अनेक उदाहरणे पुराणांमध्ये आहेत. 

परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम्।धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥

असे वचन त्याने गीतेत आपल्याला दिले आहेच. असे असले तरी आपल्यासारख्या सामान्य माणसाला भगवंत आपल्याला सहाय्य करीलच याची खात्री वाटत नाही. याची दोन कारणे असू शकतात. पहिले म्हणजे परमेश्वर अस्तित्वात आहे आणि तो सदैव आपल्याजवळ आहे याची खात्री आपल्याला असत नाही. आपल्या हाकेला तो धावून येईलच याबद्दलही आपण साशंक असतो. त्याच्यावर भार टाकून निर्धास्त राहण्याइतकी  निष्ठा किंवा समर्पण आपले नसते.

आपली अशी अपेक्षा असते की भगवंताने आपल्याला प्रपंचात येणाऱ्या अडचणींमध्ये आणि दुःखामध्ये मदत करावी. अशा गोष्टींसाठी आपण भगवंताला गृहीत धरतो. तो प्रसन्न व्हावा म्हणून निरनिराळ्या प्रकारचे नवस करतो, प्रार्थना करतो. भगवंताला निरनिराळ्या प्रकारे लाच देण्याचा प्रयत्न करतो. कधी त्याला कोणी भक्त मोठी देणगी देतो तर कधी कोणी सोन्याचा मुकुट अर्पण करतो. परंतु या गोष्टींची भगवंताला अपेक्षा नसते. त्याला अपेक्षा असते ती शुद्ध आणि निरपेक्ष भक्तीची !  

आपण परमेश्वराची भक्ती करायला सुरुवात केली की आपली अशी अपेक्षा असते की त्याने आपल्यावर कृपा करावी. आपल्या संकटात धावून यावे. परंतु जेव्हा आपल्याला तसे होताना दिसत नाही तेव्हा आपला त्याच्यावरील विश्वास डळमळीत होताना दिसू लागतो. परंतु ही परमेश्वराने पाहिलेली आपली परीक्षा असते असे म्हणावे लागेल. 

जो भगवंत आनंदनिधान आहे, कल्पतरू आहे अशा भगवंताकडे भक्ती, मुक्ती आणि मोक्ष मागण्या ऐवजी त्याच्याकडून आपण पैसा, व्यवहारातील यश, सुखाचा प्रपंच यासारख्या क्षुल्लक गोष्टींची अपेक्षा करत असतो. व्यवहारातील यश, पैसा, सुखसमृद्धी या गोष्टींनाच सामान्य माणसे परमेश्वराची आपल्यावर कृपा आहे असे समजतात. परंतु सदाचार आणि सद्बुद्धी ज्याच्याकडे आहे त्याच्यावर परमेश्वराची कृपा आहे असे समजावे. 

भगवंताने गीतेमध्ये म्हटले आहे की "योगक्षेमं वहम्याहं. " भगवंत आपला भार घेतो. त्याला आपली काळजी आहे. या त्याच्या वचनाचा अर्थ आपण असा घेता कामा नये की आपण आपले जे कर्तव्य आहे ते सोडून केवळ त्याच्यावर भार टाकून निवांत बसावे. अर्जुनाला आपल्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठीच तर त्याने गीता सांगितली. आपल्या पूर्ण क्षमतेने आपले कर्तव्य करावे, स्वधर्म पार पाडावा. परंतु असे करताना त्याचे विस्मरण होऊ देऊ नये. संत जनाबाई म्हणतात 

ळीता कांडीता तुज गाईन अनंता |

 न विसंबे क्षणभरी | तुझे नाम गा मुरारी

असेच आपणही आपले कर्तव्य करत असताना त्याच्या नामात मग्न राहावे.

स्वसंवाद 

१) मी भगवंताची भक्ती करतो तेव्हा माझ्या मनात काय असते – निरपेक्ष प्रेम की एखादी अपेक्षा ?

२) परमेश्वराप्रती असलेली माझी भक्ती खरोखर निरपेक्ष असून ती "लाच" तर नाही ना ?

३) संकटात भगवंताची कृपा दिसली नाही तेव्हा माझी श्रद्धा डळमळीत होते का ?

४) "योगक्षेमं वहाम्यहं" हे वचन मला माहीत आहे – परंतु माझे कर्तव्य करताना मी खरोखर त्याच्यावर भार सोपवतो का की प्रपंचाची काळजी मीच वाहत राहतो ?

(क्रमशः)

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

२८/३/२०२६

प्रतिक्रियेसाठी : ९४०३७४९९३२

(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा)



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...