उगवतीचे रंग
दारावरची विद्यापीठे
चाळीसगावसारख्या छोट्या शहरात राहण्याचे एक विशेष सुख आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत दार उघडे ठेवले तरी मस्त मनोरंजन होत राहते. टीव्हीची गरज नाही, OTT ची गरज नाही. फक्त कान उघडे ठेवा आणि बसा एन्जॉय करत. बॅकग्राऊंडला मोकाट कुत्र्यांच्या ओरडण्याचे संगीत असतेच !
माझ्या घरासमोरून रोज जे विक्रेते जातात, त्यांनी मला गेल्या काही वर्षांत असे काही शिकवले आहे, जे कोणत्याही विद्यापीठाने शिकवले नसते.
सकाळचे नऊ वाजले की पहिला भंगारवाला हजर. तो ओरडतो
"वह्या... पोस्तके... रद्दी... भंगार..."
आता "पोस्तके" हा शब्द ऐकला की माझ्या मनात एक प्रश्न येतो की पोस्तके म्हणजे नक्की काय? पोस्टाने आलेली पत्रे? की पुस्तकांचे कुठले नवे अपभ्रंशित कुळ? मला तर एकदा त्याला थांबवून विचारावेसे वाटले, "अरे बाबा, पुस्तके म्हण की — पोस्तके काय प्रकार आहे?" पण मग विचार केला जाऊ द्या. उगाच त्याच्या व्यवसायात भाषेचा हस्तक्षेप नको.
दुसरा भंगारवाला प्लॅस्टिकची मोडतोड करणारा. तो ओरडतो —
"पलॅस्टिक भंगार... पलॅस्टिक..."
"प्लास्टिक" या शब्दातील "प्ला" चा उच्चार त्याने "पलॅ" असा कसा शोधला, हे एक संशोधनाचा विषय आहे. पुण्याच्या भाषाशास्त्र विभागाने याची दखल घ्यायला हवी होती.
पण या दोघांचा बादशाह म्हणजे तिसरा — जुना लोखंड घेणारा. त्याचे मूळ वाक्य असावे "जुना पुराणा लोखंड." पण ते ऐकू येते असे
"जपूरान... लोखंड... भंगार..."
"जपूरान" हा शब्द मी पहिल्यांदा ऐकला तेव्हा मला वाटले एखाद्या जपानी कंपनीचा एजंट आला आहे. नंतर कळले. तो "जुना पुराणा" म्हणतोय, फक्त शब्द रस्त्यातच कुठेतरी हरवले आणि "जपूरान" उरले. त्याची ती एकच आरोळी ऐकून माझी आई म्हणाली होती, "हा काय म्हणतोय रे दादा ?" मी म्हणालो," अगं आई, तो फिलॉसॉफी सांगतोय. एक दिवस सगळं जुनं पुराणं होतं, भंगारच होतं!" गमतीनं असंही वाटून गेलं की पर्यावरणाचा खूप ऱ्हास होतो आहे. रान, जंगले नष्ट होत आहेत. त्याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही म्हणून हा जपूरान असे म्हणत असावा. आपले ओरडून झाले की तो शेवटी जोराने "हा" असे म्हणतो. जणू काही आपण आधी काय म्हणालो त्यावर शिक्कामोर्तब करतो !
दुपारी बारा वाजले की भाजीवाल्यांची स्वारी सुरू होते आणि इथे तर एकाहून एक सरस नमुने आहेत.
पहिला भाजीवाला म्हणजे मला एक चालता बोलता कवी वाटतो. तो येतो आणि सुरू होतो —
"मेथी... पालक... कोथिंबीर... टोमॅटो... कांदा... बटाटा..."
हे सगळे तो एका विशिष्ट चालीत म्हणतो. जणू काही एखाद्या कीर्तनात अभंग म्हणावा तसे. श्रोते नसले तरी चालेल, पण चाल सुटत नाही. मेथी ते बटाट्यापर्यंतचा हा प्रवास ऐकताना मला नेहमी वाटते याने एखाद्या साहित्य संमेलनात हे सादर केले असते तर टाळ्या मिळाल्या असत्या.
आणि मग कळस म्हणजे शेवटची हाक
"चलाsssss... मावशीsssss...!"
हे "मावशी" इतक्या जोराने आणि इतक्या लांब ओढून येते की जवळच्या दूरच्या सगळ्या घरांमधील मावश्या बाहेर आल्याच पाहिजेत. एकदा चुकून माझेही लक्ष गेले. मी खिडकीत डोकावलो. तो भाजीवाला खाली उभा होता. त्यादिवशी ही घरात नव्हती मी त्याला गमतीने म्हटलं," मावशीच्या ऐवजी मी आलो तर चालेल का रे ?" त्याने वर पाहिले आणि हसला. मी त्या दिवशी जास्त भाज्या घेतल्या नाहीत फक्त कोथिंबीर घेतली. पण "मावशी" या हाकेचा परिणाम माझ्यावरही झालाच.
दुसरा भाजीवाला म्हणजे जणू माझ्या गल्लीचा दादा. तो येतो तेव्हा आवाजावरून वाटते कुणाशी तरी भांडण झाले आहे. तो ओरडतो,
"काकडी घ्या... टोमॅटो घ्या... अशी सगळी यादी तो वाचतो पण बोलताना असं बोलतो की जणू खूप रागात बोलतो आहे. आणि शेवटी ओरडतो "माल अच्छा खाओ." जणू त्याच्याकडीलच भाज्या सर्वात चांगल्या असतात. एकदा माझ्या शेजारच्या काकूंनी त्याला विचारले, " वांगी काय भाव रे ?" तो उत्तरला, "एकच भाव. वीस रुपये पाव. घ्यायचे असतील तर घ्या, नाहीतर राहू द्या." हे ऐकून काकूंनी वांगी घेतली. करणार तरी काय बिचाऱ्या ! दमदाटीलाही काहीवेळा यश येते असे म्हणायचे !
पण या सगळ्यांमध्ये एक भाजीवाला असा आहे की ज्याच्याबद्दल लिहिले नाही तर हा लेख अपूर्णच राहील.
आमच्या गावात कचऱ्याची गाडी येते तेव्हा एक गाणे लागते, "गाडीवाला आया, चल कचरा निकाल." हे गाणे ऐकले की घरातले लोक डस्टबिन घेऊन बाहेर पडतात. हे गाणे इतके परिचित झाले आहे की ते ऐकले की पाय आपोआप दाराकडे वळतात.
याच गाण्याची "प्रेरणा" घेऊन एक भाजीवाला येतो. तो त्याच चालीवर, त्याच तालावर ओरडतो
"भाजीवाला आया... चल पैसे निकाल...!"
पहिल्यांदा हे ऐकले तेव्हा मला वाटले कचऱ्याची गाडी आली. मी डस्टबिन उचलली, दार उघडले पाहतो तर खाली भाजीवाला उभा ! त्याने हसून विचारले, "काय पाहिजे भाऊ ?" — मी हातातली डस्टबिन खाली ठेवली. म्हणालो, "काही नाही बाबा, जरा हवा खायला आलो."
पण खरे सांगतो त्या माणसाची प्रतिभा पाहून मला मनापासून कौतुक वाटले. कचऱ्याच्या गाण्याची जाहिरात आधीच झालेली होती. तिचाच फायदा उचलायचा आणि माल खपवायचा. हे जे मार्केटिंग तंत्र आहे, ते कोणत्याही MBA च्या पुस्तकात नसेल. त्याला कुणी शिकवले नाही. त्याने स्वतः शोधले. माझ्या मनात आले, याला " प्रायोगिक उद्योजकता" पुरस्कार द्यायला काही हरकत नाही.
आता मात्र एक गोंधळ होतो. कचऱ्याची गाडी आली की भाजी आठवते, आणि भाजीवाला आला की कचरा काढायची इच्छा होते. दोन्ही गोष्टी एकमेकांत इतक्या मिसळल्या आहेत की आता घरात कोण येणार हे गाणे ऐकेपर्यंत कळत नाही!
काही आवाज मोठे मजेशीर असतात ते आवाज आले की काही सांगावे लागत नाही. घरातून कप बश्यांचा आवाज आला की चहा झाला असे समजावे. भांडी खाली पडण्याचा किंवा आदळण्याचा आवाज आला की काहीतरी बिघडले आहे असे समजावे.
उन्हाळ्यात एक आइस्क्रीमवाला येतो. एक छोटी लोटगाडी घेऊन येतो. त्या गाडीला एक छोटी घंटी असते. टिण्ण टिण्ण टिण्ण. तो काही ओरडत नाही. फक्त घंटी वाजवतो. पण त्या घंटीचा आवाज ऐकला की घरातील लहान मुले "आईस्क्रीम आईस्क्रीम" असे स्वतःच ओरडायला लागतात. तंत्रज्ञान वेगळे पण परिणाम तोच.
एक चाकू धारदार करणारा माणूस येतो. त्याच्याजवळ एक विशिष्ट यंत्र असते. सायकलला जोडलेले. तो ओरडतो,"चाकू... सुऱ्या... कात्री... धार लावा..." अमिताभच्या जंजीर चित्रपटातील "चक्कु छुरिया तेज करालो हे गाणं आठवतं"... हे ऐकले की घरातील सुना आणि बायका आपापल्या चाकू-कात्र्या घेऊन बाहेर जातात आणि नवरे बघत राहतात. धार फक्त चाकू, कात्रीलाच लागते असे नाही, बायकांच्या जिभेलाही ती लागत असावी ! कारण नंतर चाकू सुऱ्याबरोबर तीही धार अनुभवायला मिळते !
काही फेरीवाले असतात जे एक वेगळीच परंपरा पाळतात. ते काहीतरी ओरडत येतात. पण नक्की काय, ते कळत नाही. आवाज येतो, शब्द येतात, पण अर्थ हरवलेला असतो. जसे एखादे रेडिओ स्टेशन लागले आहे, पण सिग्नल नीट नसल्यामुळे नुसता आवाज ! काय बोलत आहेत ते कळतच नाही !
अशा वेळी घरातून बाहेर जाऊन बघावे लागते — हा काय विकतो? एकदा असाच एक माणूस आला. मी उठलो, चपला घातल्या, जिना उतरलो, दार उघडले पण तो दिसला नाही. तो इतक्या वेगाने जात होता की माझ्या बाहेर पडण्याच्या क्रियेपेक्षा त्याचा जाण्याचा वेग जास्त होता. मी रस्त्यावर उभे राहून दोन्ही बाजूंना बघितले. तर माणूस गायब ! कशी विक्री होत असेल या लोकांची ! त्याने काय विकले ? काय ओरडला? हे एक न सुटलेले कोडे आहे. रहस्यमय चित्रपटात किंवा गुप्तहेर मालिकांमध्ये अशा माणसांचा समावेश करायला हरकत नाही. मी त्या दिवशी काही विकत घेतले नाही, पण एक अनुभव मात्र मिळाला. छान व्यायाम झाला, जिना दोनदा चढ-उतर झाला.
आणखी एक प्रकार म्हणजे जे "काय विकतो हे न सांगता" फक्त एक विचित्र आवाज करत येतात. खणखण, किंवा एखादी शिट्टी, किंवा धातूवर धातू आपटल्याचा आवाज. हा सांकेतिक भाषेचा प्रकार असावा. जुन्या गिऱ्हाईकांना माहीत असेल. पण नवीन माणसाला हे कळायला वर्षभर त्याचा अभ्यास करावा लागतो.
माझ्या शेजारच्या काकू मात्र या सगळ्यात तरबेज आहेत. त्या खिडकीतूनच ओळखतात, "हा भाजीवाला", "हा भंगारवाला", "हा चाकूवाला." मी एकदा विचारले, "काकू, तुम्ही एवढे चटकन कसे काय ओळखता?" त्या म्हणाल्या, "अरे बाबा, तीस वर्षे झाली. आता ओळखता येतो की!" बापरे! तीस वर्षे! म्हणजे हेही एक शास्त्र आहे तर ! आणि त्याला तीस वर्षांचा अभ्यास लागतो. सोपं नाही बाबा काही.
काही बेडशीटवाले, चादरवाले सुद्धा दारावर येतात. ते मोठे हुशार ! ते म्हणतात," गाडीजवळ या बघा. पाहायचे पैसे नाही लागत." मग काय भगिनी वर्ग ते बघायला जातोच आणि बघता बघता काहीतरी त्यांना पसंत पडते आणि त्याची खरेदी होतेच !
या सगळ्या विक्रेत्यांचे आवाज ऐकताना माझ्या मनात एक गमतीदार विचार वारंवार येत असे. मी शिक्षक म्हणून काम केलेले. त्यामुळे स्वभावातच एक "सुधरवण्याची" खाज असते. शहाणे करून सोडावे सकळ जन ! मला गमतीने वाटून जायचे — या सगळ्यांना एकदा बोलवावे, एक छोटासा क्लास घ्यावा. फळ्यावर मोठ्या अक्षरात लिहावे "पुस्तके", "प्लास्टिक", "जुना पुराणा आणि म्हणावे, "चला, आता नीट म्हणून दाखवा बरं. उच्चार स्पष्ट हवे. चुकीचे बोलायचे नाही !"
हा विचार मनात आला की स्वतःलाच हसू यायचे. शिक्षकाचे मन ! ते कुठेही गेले तरी "वर्ग" शोधतेच!
पण एक दिवस खरोखरच विचार केला आणि लक्षात आले की हे चुकीचे "पोस्तके" म्हणणारे, हे "जपूरान" ओरडणारे, हे "पलॅस्टिक" सांगणारे, यांना खरोखर शिकवण्याची गरज नाही. कारण हेच त्यांचे वेगळेपण आहे. हीच त्यांची ओळख आहे. हीच त्यांची एक प्रकारची सिग्नेचर! स्टाईल !
"पोस्तके" नीट "पुस्तके" झाले, तर तो भंगारवाला इतरांसारखाच होऊन जाईल. "जपूरान" सुधारले तर त्या माणसाचा तो खास रंग निघून जाईल. त्यांचे ते चुकलेले, वाकडे, मजेशीर उच्चार म्हणजे एक प्रकारचा त्यांचा ब्रँड आहे, जो त्यांनी जाणूनबुजून नाही, तर आयुष्याने घडवला आहे.
हे सगळे विक्रेते रोज सकाळी उठतात, उन्हातान्हात फिरतात, घरोघरी जातात, कुणी हाक मारली तर थांबतात, नाही मारली तरी पुढे जातात. त्यांच्या आवाजात थकवा नसतो, नाराजी नसते. उद्याही तेच गाणे, तीच आरोळी, तोच उत्साह. जीवन कसे जगावे हे जणू ते शिकवतात !
मला लक्षात आले की प्रत्येकाची बोलण्याची पद्धत वेगळी असते, प्रत्येकाचा आवाज वेगळा असतो. उच्चार, शब्द भलेही चुकत असतील पण त्या प्रत्येकाचे एक वेगळेपण आहे आणि त्या वेगळेपणातच त्यांच्या जीवन जगण्याची मजा आहे.
त्यामुळे आता ठरवले आहे यांना "नीट बोला" असे सांगायचे नाही. ते "पोस्तके" म्हणत राहिले तर माझे रोजचे मनोरंजन होत राहील आणि ते विनामूल्य आहे. "सखी शेजारीणी तू हसत रहा " या चालीवर "फेरीवाल्या, तू येत रहा, बोलत रहा असेच म्हणावेसे वाटते !"
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२१/३/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा