मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग २६

उगवतीचे रंग

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक – भाग २६

देहे रक्षणाकारणे येत्न केला ।

परी सेवटी काळ घेऊनि गेला ।

करी रे मना भक्ती या राघवाची ।

पुढे अंतरी सोडी चिंता भवाची ।।२६।।

अर्थ :

मनुष्य आपल्या देहाचे रक्षण व्हावे म्हणून खूप प्रयत्न करतो, त्याची काळजी घेतो. परंतु शेवटी काळ (मृत्यू) त्याला घेऊन जातोच. म्हणून हे मना, तू राघवाची भक्ती कर आणि मनातील संसाराची ( भवाची )चिंता सोडून दे.

विवेचन :

मागील श्लोकात समर्थांनी सुख-दुःखाच्या चक्राचे वास्तव आपल्यासमोर ठेवले. या श्लोकात त्याच विचाराला पुढे नेत ते देहाभिमानाचे वास्तव आपल्यासमोर मांडतात.

आपण आयुष्यभर देहाच्या रक्षणासाठी झटत असतो. देहबुद्धी इतकी प्रबळ असते की देहसुखालाच आपण खरे सुख मानतो. शरीराला आनंद मिळावा म्हणून माणूस विविध भोग-विलासात रमतो. काही जण तर केवळ खाणे-पिणे आणि मौजमजा हाच जीवनाचा उद्देश समजतात.

पूर्वी चार्वाकांनीही “यावत् जीवेत् सुखं जीवेत्” असा भोगवाद मांडला होता. आज अनेकजण नकळत त्याच विचारसरणीचा स्वीकार करताना दिसतात.

पण येथे समर्थांचा हेतू देहरक्षणाला नाकारण्याचा नाही. देहाची काळजी घेऊ नये असे ते म्हणत नाहीत. उलट, देह ही एक मौल्यवान देणगी आहे.

“शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्”. शरीर हेच धर्मसाधनेचे पहिले साधन आहे.

म्हणून देहाची योग्य काळजी घेणे आवश्यकच आहे. निरोगी आयुष्य जगणे, जीवनाचा आनंद घेणे हेही चुकीचे नाही. परंतु याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते की हा देह नश्वर आहे आणि एक दिवस तो सोडून जावेच लागणार आहे.

वेदकाळातील ऋषींनीही आपल्या निरोगी दीर्घायुष्याची कामना केली, पण मिळालेल्या त्या आयुष्याचा उपयोग त्यांनी ईश्वरप्राप्तीसाठी आम्ही करणार आहोत असे स्पष्ट सांगितले.

आपल्या जीवनात आपले काहीतरी ध्येय असते. आस्तिक व्यक्ती परमेश्वर प्राप्तीसाठी झटते तर नास्तिक किंवा बुद्धिवादी मंडळी मानवसेवा, समाजसेवा, वैज्ञानिक प्रगती यासारख्या गोष्टींना आपल्या आयुष्याचे ध्येय मानतात. परंतु बरेचदा आपण मात्र ध्येय बाजूला ठेवून देहासाठीच अधिक वेळ खर्च करतो.

माणूस स्वतःच्या देहाबरोबरच संसाराची, घरदाराची, मुलाबाळांची चिंता करीत राहतो. पण प्रारब्धानुसार जे घडायचे ते घडणारच असते. म्हणून समर्थ सांगतात

“करी रे मना भक्ती या राघवाची”

श्रीरामाबद्दल बोलताना समर्थ नेहमी  “या राघवाची” भक्ती करावी असे म्हणतात. त्यांचे आराध्य दैवत असलेला श्रीराम जणू त्यांच्यासमोर उभा आहे.  त्या राघवाची असे ते कधीही म्हणत नाहीत. समर्थांसाठी श्रीराम हे केवळ तत्त्व नाही, तर सजीव अनुभव आहे. जणू समोर उभा असलेला ईश्वर! 

म्हणूनच ते आपल्याला सांगतात की बाबारे, संसाराची चिंता करण्याऐवजी मनाला राघवाच्या स्मरणात गुंतव. एकदा का मन त्याच्याकडे लागले, की मग संसाराची चिंता आपोआप कमी होत जाते. आणि हळूहळू अशी भावना दृढ होते की राम कर्ता आहे, सर्व काही त्याच्याच कृपेने घडते आहे.

अशी श्रद्धा निर्माण झाली की मन हलके होते, चिंता निवळते आणि जीवन अधिक शांत, समाधानी बनते.

स्वसंवाद

• मी माझ्या देहाची काळजी घेताना त्यालाच अंतिम सत्य मानून चालतो का ?

• जीवनाचे खरे ध्येय लक्षात ठेवून मी देहाचा उपयोग करतो आहे का?

• संसाराच्या चिंतेत मी इतका गुंततो का की परमेश्वराचे स्मरण विसरतो?

• माझ्या मनाला राघवाच्या नामस्मरणाची सवय लागली आहे का?

(क्रमशः)

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

१९/३/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासह अग्रेषित करावा.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...