मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग २४

उगवतीचे रंग

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग २४

रघूनायकावीण वाया शिणावे ।

जनासारिखे व्यर्थ का वोसणावे ॥

सदा सर्वदा नाम वाचे वसो दे ।

अहंता मनी पापिणी ते नसो दे |२४|

अर्थ: हे मना, एका रामाला सोडून केलेली सगळी कामे व्यर्थ आहेत. भगवंताला विन्मुख झालेल्या सामान्य माणसांप्रमाणे व्यर्थ बडबड ( वोसणावे ) करू नये. त्या बाष्कळ बडबडी ऐवजी भगवंताचे नाव मुखात असू दे. अहंकार हा अध्यात्मामध्ये फार मोठा शत्रू आहे. त्याला मनात थारा देऊ नकोस.

विवेचन:

समर्थांना मानव जातीच्या कल्याणासाठी वाटणारी तळमळ ही एखाद्या मातेसारखी आहे. आपल्या मुलाचे कल्याण व्हावे म्हणून ती त्याला जरी आवडत नसले तरी एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा सांगत असते. त्याचप्रमाणे समर्थ मागील श्लोकातीलच गोष्ट या ठिकाणी पुढे विस्तारून सांगतात. आधीच्या श्लोकात मनाला राघवाशिवाय काही बोलू नकोस कारण व्यर्थ बोलण्यामध्ये सुख नाही असे त्यांनी सांगितले आहे. या श्लोकात हीच गोष्ट ते वेगळ्या शब्दात आपल्याला सांगतात.

भगवंताच्या नामामध्ये अपार सामर्थ्य आहे. शिणलेल्या मनाला शक्ती देण्याचे, उभारी देण्याचे सामर्थ्य त्यात आहे. आपण जर खऱ्या सुखाचा शोध घेत असू तर भगवंताच्या नामाइतके सुख कशातच नाही. अन्य सुखे तात्पुरती आहेत आणि अंतिमतः दुःख देणारीच आहेत हेच समर्थ या श्लोकातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. म्हणून आपल्या जिभेवर नेहमी भगवंताचे नाम असावे असे त्यांचे सांगणे आहे.

शब्द किंवा भाषा बोलणे हे माणसाचे वैशिष्ट्य आहे. भाषेच्या माध्यमातून आपण आपले विचार व्यक्त करतो. शब्दांमध्ये किंवा भाषेमध्ये केवढी शक्ती असते हे जेव्हा आपण अधिकारी व्यक्तींच्या साहित्याचे वाचन करतो किंवा त्यांचे बोल ऐकतो तेव्हा लक्षात येते. बोलण्याला वाचाशक्ती असेही आपण म्हणतो. हे सरस्वतीचे वरदान आहे. पण सर्वसामान्य लोक बऱ्याच वेळा वायफळ बोलण्यात ही शक्ती व्यर्थ घालवत असतात. 

पण ज्यांना साधना मार्गावर वाटचाल करायची आहे, भगवंत जोडायचा आहे, त्यांना अशी बाष्कळ बडबड करून चालणार नाही. आपल्या वाचेने त्यांनी भगवंताचे नाम घ्यायला हवे तशी सवय करायला हवी. उठत बसता, कार्य करता, सदा घेता देता... भगवंताचे नाम मुखात यायला हवे. मी जर साधक आहे आणि भगवंत प्राप्ती हे माझे ध्येय आहे असे जर आपण मनाशी ठरविले असेल तर जनांमध्ये मिसळताना सामान्य माणसांसारखी बडबड करून मला भागणार नाही. तसे केले तर मी माझ्या वाचेची शक्ती व्यर्थ घालवली असा त्याचा अर्थ होईल. 

सुरुवातीला लोक मला नावे ठेवतील. माझी चेष्टा किंवा टिंगलटवाळी करतील पण मला भगवंत प्राप्तीसाठी ती सुद्धा सोसता आली पाहिजे. काही दिवसांनी लोकांना हे लक्षात येईल की ही व्यक्ती आपल्यासारखी नाही. ती साधक आहे. मग ते तुमच्याशी आदराने व्यवहार करतील. समर्थ या सगळ्या परिस्थितीतून गेले आहेत. ही परिस्थिती त्यांनी अनुभवली आहे आणि त्यातूनच त्यांचे हे अनुभवाचे बोल आले आहेत.

समाजात मिसळताना आपल्याला लोकांनी नावे ठेवू नये किंवा आपण कुठे कमी पडू नये म्हणून आपण त्यांच्यासारखे वागण्याचा प्रयत्न करतो. बरेचदा आपण जसे नसतो तसे दाखवण्याचा प्रयत्न करतो. मी विद्वान आहे, ज्ञानी आहे मला फार कळते अशा प्रकारचे मुखवटे धारण करतो. हा मुखवटा लोकांना दाखवण्यासाठी जरी असला तरी त्यातूनच अहंकार जन्म पावतो. अहंकार हे पापाचे मूळ आहे. रावणाला स्वतःच्या शक्तीचा, सामर्थ्याचा केवढा अहंकार झाला होता ! जगामध्ये माझ्यासारखा कोणी नाही, मला कोणी हरवू शकत नाही हा त्याचा अहंकार त्याचे विनाशाला कारणीभूत ठरला. अहंकारातून अनेक नको असलेल्या गोष्टी घडतात. म्हणून समर्थ अहंतेला पापिणी असे म्हणतात.

म्हणून, हे मना, वाणीमध्ये भगवंताचे नाम ठेव आणि मनातून अहंकार दूर ठेव. यातच तुझे खरे कल्याण आहे.

स्वसंवाद

• माझ्या बोलण्यात भगवंताचे नाम कितपत आहे आणि व्यर्थ बडबड किती आहे?

• भगवंताचे नाम घेण्याची सवय मी स्वतःला लावतो आहे का ?

• माझ्या मनात अहंकाराची छटा आहे का? ती ओळखून मी कमी करण्याचा प्रयत्न करतो आहे का?

(क्रमशः)

©विश्वास विष्णू देशपांडे, चाळीसगाव.

१७/३/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...