उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक – भाग २०
बहू हिंपुटी होईजे मायपोटी।
नको रे मना यातना तेचि मोठी॥ निरोधें पचे कोंडिले गर्भवासी। अधोमूख रे दु:ख त्या बाळकासीं॥२०॥
अर्थ: आईच्या पोटात असताना बालकाला अतिशय कष्ट भोगावे लागतात. त्या मोठ्या वेदनादायी यातना (हे जीवा )तुला भोगणे नको. मातेच्या गर्भात असताना बालक अधोमूख म्हणजे खाली तोंड करून असते. ते सर्व बाजूंनी कोंडले जाते. गर्भातील उष्णतेमुळे ते उकडून निघते. ही अवस्था अत्यंत वेदनादायी असते.
( हिंपुटी - कष्ट/यातना, मायपोटी - आईच्या उदरात असताना, निरोध प्रतिबंध/अडथळा, पचे - शिजणे/उकडून निघणे, अधोमुख - खाली तोंड करून )
विवेचन :
या श्लोकात समर्थ जीव जन्माला येण्याआधीच्या अवस्थेचे वर्णन करतात. ही अवस्था किती कष्टप्रद असते त्याची जाणीव हा श्लोक वाचला म्हणजे होते. समर्थ स्वतः संसाराच्या बंधनात अडकले नव्हते. परंतु मनुष्य कसा जन्माला येतो ? त्यावेळी त्याची अवस्था कशी असते, आणि त्याला किती यातना होतात याची पुरेपूर कल्पना त्यांना होती. आजचे आधुनिक विज्ञान आणि मोठमोठे डॉक्टर्स सुद्धा ही गोष्ट मान्य करतात की गर्भामध्ये असताना आणि जन्माला येताना ( मातेबरोबरच ) बालकाला सुद्धा यातना सोसाव्या लागतात.
एकदा का या मृत्यू लोकात जन्म घेतला की शैशव, तारुण्य, नाना प्रकारचे आजार, वृद्धत्व आणि शेवटी मृत्यू या गोष्टी अपरिहार्य आहेत. जन्माला येताना तर किती यातना जीवाला सोसाव्या लागतात. आईच्या गर्भामध्ये हा जीव कोंडलेला असतो. त्या वातावरणातील उष्णता त्याला सहन करावी लागते. उष्णतेमुळे त्याची वाढ होते हे जरी खरे असले तरी त्यामुळे तो उकडून निघतो हेही तेवढेच खरे. नऊ महिने तो जीव एवढ्याशा जागेत कोंडलेला असतो. आपण त्याची नुसती कल्पना केली तरी अंगावर काटा येतो. जन्माला येताना बालक अधोमुख असते. त्या अत्यंत अरुंद मार्गातून बाहेर पडताना मातेला आणि बालकाला दोघांनाही भयंकर वेदना सहन कराव्या लागतात.
दिवस जाणे, गर्भारावस्था, बाळंतपण आणि त्यात होणाऱ्या वेदना या सगळ्या अपरिहार्य गोष्टी आहेत म्हणून या अवस्थांमधून जायचेच नाही का ? या नैसर्गिक गोष्टी आहेत. या होणारच. यांचा त्रास नको म्हणून कसे चालेल असे आजचे काही विज्ञानवादी विचारवंत म्हणतात. व्यवहाराच्या दृष्टीने पाहिले तर हे सगळे बरोबर वाटते परंतु जो मुमुक्षु आहे, म्हणजेच साधक आहे, मोक्ष मार्गावर वाटचाल करणारा आहे, त्याला या गोष्टी लक्षात घ्याव्याच लागतील तरच त्याची पुढील वाटचाल सुकर होईल. म्हणूनच समर्थ या गोष्टींची जाणीव आपल्याला करून देतात.
केवळ जन्मच नव्हे तर संपूर्ण मानवी जीवन हे दुःखाने भरलेले आहे. काही लोक याला निराशावादी विचार म्हणतील. परंतु संतांचा ही जाणीव करून देण्याचा उद्देश वेगळा असतो. संत हे अध्यात्म मार्गावरील दीपस्तंभ असतात. त्यांचे अनुसरण करूनच पुढे जायचे असते. म्हणूनच ते आपल्याला ही जाणीव करून देतात. वारंवार जन्माला येणे, यातना सोसणे आणि मृत्यू पावणे या चक्रात सामान्य माणूस अडकत राहतो आणि हे चक्र सुरू राहते. पण कुठेतरी हे चक्र थांबावे असे वाटत असेल तर पुन्हा जन्म नको. जन्म नसला तर या सगळ्या गोष्टी आपोआप टळतील. म्हणूनच समर्थ जन्माला येताना होणाऱ्या कष्टांची जाणीव आपल्याला करून देतात.
हा देह नाशिवंत आहे. मलमूत्र इ. घाणीने भरलेला आहे. आयुष्यात दुःख आहे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वताएवढे असे तुकाराम महाराज सांगतात. या सगळ्या गोष्टींची आपल्याला जाणीव नसते असे नाही. परंतु तरी देखील माणसाला आपल्या देहाचा आणि स्वतःचा केवढा गर्व असतो !
पण एक दिवस हा देह सोडून आपल्याला जायचे आहे."नाशिवंत देह जाणार सकळ "असे तुकाराम महाराज म्हणतात. पण असे असले तरी हा देह ईश्वर प्राप्तीचे साधन आहे. त्याचा वापर करूनच आपल्याला ईश्वरापर्यंत पोहोचायचे आहे. आपल्या देहाबद्दल बोलताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात
मळमुत्राचा बांधा ।
वरी चर्म घातलें रे कर्म कीटकाचा सांदा ॥
रवरव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा ।
स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा ॥
स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा ॥
असा हा आपल्याला लाभलेला मानवी देह आहे. पण म्हणून त्याचा तिरस्कार करता कामा नये. घेता येईल तेवढी त्याची काळजी आपण घेतले पाहिजे कारण हा नरदेह ईश्वरप्राप्तीचे साधन आहे. त्याच्या माध्यमातूनच आपल्याला उत्तम कर्म करून राघवची प्राप्ती करून घ्यायची आहे. मानवी जीवनातील दुःख नको असेल आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्यापासून सुटका करून घ्यायची असेल तर भगवंताला शरण जाण्या वाचून पर्याय नाही.
स्वसंवाद
• हे जीवन, हा संसार दुःखमय आहे याची जाणीव मी ठेवतो का ?
• जीवनातील दुःखांकडे मी तक्रारीने पाहतो की त्यातून काही शिकण्याचा प्रयत्न करतो?
• जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटावे असे मला मनापासून वाटते का ?
• त्यातून सुटण्यासाठी संतांनी सांगितलेल्या मार्गावर मी वाटचाल करतो का ?
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१२/३/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा