उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक – भाग १९
मना सर्वथा सत्य सांडू नको रे|
मना सर्वदा मिथ्य मांडू नको रे|
मना सत्य ते सत्य वाचे वदावे|
मना मिथ्य ते मिथ्य सोडुनि द्यावे |१९|
अर्थ: हे मना, या जगात केवळ भगवंतच एकमेव सत्य आहे. म्हणून त्याला कधी सोडू नकोस. दृश्य जगत मिथ्या आहे, भासमान आहे. त्याचा पसारा मांडू नकोस. नेहमी बोलताना भगवंताबद्दलच बोल आणि मायेच्या प्रभावाने सत्य वाटणाऱ्या ( पण मिथ्या असलेल्या )या भासमान जगाकडे दुर्लक्ष कर.
या जगात सत्य आणि मिथ्य अशा दोनच गोष्टी आहेत. या ठिकाणी सत्य आणि मिथ्य या दोन्ही शब्दांचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. साधारणपणे व्यवहारात बोलताना आपण मिथ्य म्हणजे खोटे या अर्थाने तो शब्द वापरतो. परंतु आपण जेव्हा अध्यात्माच्या संदर्भात काही बोलत असतो तेव्हा जे खरे नसून खऱ्यासारखे भासते त्या गोष्टीला मिथ्या म्हटले जाते. थोडक्यात म्हणजे त्या गोष्टी भासमान असतात. वाळवंटात भर उन्हात प्रवास करणाऱ्याला जेव्हा तहान लागते तेव्हा त्याला समोर पाणी असल्याचा भास होतो. वाळवंट हे सत्य परंतु पाणी हे भासमान ! ते मृगजळ म्हणजेच भास ! हे जगही असेच भासमान आहे. परंतु आपण कायमच या जगात वावरत असल्यामुळे आपल्याला हे दृश्य जग सत्य आहे असेच वाटत असते. त्याचे मिथ्यत्व जाणवत नाही. म्हणूनच ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या असे शंकराचार्य म्हणतात. समर्थ दासबोधत म्हणतात, "प्रकट ते जाणावे असार, अप्रकट ते जाणावे सार." हा देह जो प्रकट दिसतो तो असार,अशाश्वत आहे पण त्याच्यामध्ये जे चैतन्य आहे, ते सत्य आहे त्याचा शोध घेतला पाहिजे.
आता सत्य या शब्दाचा अर्थ समजावून घेऊया. सत्य हे चिरंतन असते. ते शाश्वत आणि अपरिवर्तनशील असते. सत्य या शब्दाचा दुसरा अर्थ असाही घेता येईल की ज्यामुळे व्यक्तीचे किंवा समाजाचे हीत किंवा कल्याण होते ती गोष्ट म्हणजे सत्य.
सध्याचे वर सांगितलेले दोन्ही अर्थ परमेश्वराला लागू होतात. परमेश्वर शाश्वत आहे, चिरंतन आहे आणि अपरिवर्तनशील आहे. परमेश्वराची आराधना केल्यामुळे मानवाचे कल्याण होते म्हणूनच समर्थ आपल्याला सत्य सांडू नको रे असे सांगतात.
आपण या भौतिक जगात वावरत असल्यामुळे तेच आपल्याला खरे वाटते आणि म्हणून त्याचाच पसारा आपण मांडत असतो. मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे असे जे समर्थ सांगतात त्याचा अर्थ हाच आहे. पण आपण आयुष्यभर मिथ्याचाच पसारा मांडण्यात धन्यता मानत असतो. शिक्षण, नोकरी, मुलेबाळे, संसार यातच आपण आयुष्याची इतिकर्तव्यता मानतो. आजच्या सोशल मीडियाच्या युगात तर आपण त्याच्या भ्रमजालात एवढे अडकलो आहोत की लाईक्स, व्ह्यूज, सबस्क्राईबर्स, प्रसिद्धी म्हणजेच सगळे काही असे आपल्याला वाटते . आपल्याला कोणी भगवंताची उपासना करण्यास सांगितले तर आपण म्हणतो की अजून मला वेळ आहे. आत्ताच तर कुठे शिक्षण पूर्ण होत आहे. मग शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी, नंतर लग्न, नंतर मुलेबाळे, संसार... त्यानंतर आपण परमेश्वराकडे लक्ष देऊ असे माणूस मनाशी म्हणत असतो. परंतु असे करता करता संपूर्ण आयुष्य निघून जाते. मिथ्याचा मांडलेला हा पसारा सोडून एक दिवस जावे लागते. लहान मुलगी खेळण्यातली भांडी, चूल बोळकी घेऊन संसाराचा खेळ मांडते. परंतु मोठी झाल्यावर अचानक तो खेळ सोडून तिला जावे लागते तसेच आपलेही होते.
चूल बोळकी इवली इवली, भातुकलीचा खेळ गं
लुटूपुटीच्या संसाराची संपत आली वेळ गं
रेशिम धागे ओढीती मागे, व्याकुळ जीव हा झाला
या गीतात म्हटल्याप्रमाणेच आपली अवस्था होते. लुटुपुटीच्या संसाराची वेळ संपत येते. पण पाय निघत नाही. मायेचे, मोहाचे रेशीम धागे आपल्याला मागे ओढत असतात.
सत्य आणि असत्याची दुसरी एक बाजू आपण या ठिकाणी समजावून घेऊ या. सत्य बोलणे हा आपला धर्म आहे. लहान मुलांना सुद्धा आपण नेहमी खरे बोलावे असे सांगत असतो. महाभारतातील युधिष्ठिर खरे बोलण्यासाठी प्रसिद्ध होता म्हणूनच त्याला धर्मराज असेही म्हटले जात होते. सत्य केवळ बोलायचे नसते तर सत्यस्वरूप व्हायचे असते याचे तो मूर्तिमंत उदाहरण होता. परंतु आता सत्याची दुसरी एक बाजू समजावून घेऊ. एखादी गोष्ट बोलण्यामागे आपला उद्देश कोणता आहे यावरही त्या गोष्टीचे सत्य असत्य किंवा धर्म - अधर्म या गोष्टी ठरतात. दुसऱ्याचे कल्याण व्हावे या हेतूने बोललेले असत्य देखील हितकारक असते. येथे ते पाप न ठरता पुण्य ठरते. दुसऱ्याला दुखावण्याचा, त्रास देण्याचा किंवा त्याच्या वाईटाचा हेतू मनात ठेवून बोललेले सत्य हे देखील पापास कारणीभूत ठरते. महाभारतात श्रीकृष्णाला युक्तीने वागताना काही वेळा असत्याचा आधार घ्यावा लागला आहे. परंतु असे करण्यामागील त्याचा उद्देश अनितीचे आणि अन्यायाचे राज्य संपून न्यायाचे राज्य यावे, नीतीने वागणाऱ्या पांडवांना न्याय मिळावा हा होता.
संत तुकाराम महाराज म्हणतात, "तुम्ही सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियाले नाही बहुमता..." केवळ लोक म्हणतात म्हणून एखादी गोष्ट सत्य आहे किंवा असत्य आहे असे मानण्यापेक्षा त्यांनी आपल्या मनाने दिलेला कौल प्रमाण मानला. मनाचा हा कौल म्हणजेच विवेक. या विवेकाच्या सहाय्यानेच संसार किंवा हे दृश्य जग भासमान आहे हे समजून घ्यावे आणि एकमेव सत्य असलेल्या त्या परमेश्वराची कास धरावी असेच समर्थ आपल्याला सांगत आहेत.
स्वसंवाद
• माझ्या जीवनात मी खरेच काय सत्य मानतो, परमेश्वर की भौतिक यश?
• संसारातील गोष्टींमध्ये गुंतताना त्यांचे क्षणभंगुर स्वरूप मला जाणवते का?
• मी बोलताना सत्य बोलण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो का?
• माझ्या बोलण्यामागील हेतू दुसऱ्याच्या कल्याणाचा असतो का?
• माझ्या आतील विवेकाचा आवाज मी ऐकतो का?
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१२/३/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा