उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक – भाग १८
मना राघवेंवीण आशा नको रे |
मना मानवाची नको कीर्ति तू रे|
जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे |
तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे|१८|
अर्थ: हे मना एका रामाशिवाय ( परमेश्वराशिवाय ) तू कशाचीच आशा ठेवू नकोस. माणसाच्या ठिकाणी वासना ठेवून तू त्याची स्तुती (कीर्ति गाऊ नकोस ) करू नकोस. वेद, शास्त्रे आणि पुराणे ज्या ईश्वराचे वर्णन करतात, त्याचेच वर्णन करणे ( स्तुती करणे ) योग्य (म्हणजे श्लाघ्यवाणे)आहे. कारण या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून तोच तुला तारू शकेल.
आधीच्या श्लोकात समर्थ आपल्याला आपण व्यर्थ चिंता करीत बसतो असे सांगतात. कारण होणारी गोष्ट पूर्वसंचितानुसार घडणारच असते. पण मग चिंता करायची नाही तर काय करायचे त्याचे उत्तर या श्लोकात आपल्याला मिळते. आपल्याला कोण मदत करेल ? कोणाची आशा ठेवायची ? कोणाची स्तुती गायची ? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला या श्लोकात मिळतात.
मनुष्याचा जन्मच वासनेच्या पोटी होतो. त्यामुळे वासना पूर्णपणे सोडणे सोपे नाही. परंतु ईश्वरप्राप्ती शिवाय ठेवलेल्या इतर वासना किंवा कामना दुःखाला कारणीभूत होतात. म्हणून समर्थ सांगतात की हे मना ( मानवा )एका भगवंतावाचून तू दुसऱ्या कशाचीही वासना किंवा अपेक्षा ठेवू नकोस.
आपली भारतीय संस्कृती ही मुलत: अध्यात्मप्रधान आहे. ईश्वरप्राप्ती हे मानवी जीवनाचे अंतिम ध्येय आहे असे अध्यात्मात मानले जाते. सारी वेद, शास्त्रे आणि पुराणे परमेश्वराचे वर्णन करतात आणि परमेश्वराचा महिमा गातात.
परंतु माणसाच्या ठायी असलेल्या देहबुद्धीमुळे त्याला मानवी जीवनातच धन्यता वाटते. इतर श्रेष्ठ व्यक्तींकडे पाहून आपले जीवनही तसेच असावे असे त्याला वाटल्यास नवल नाही. समाजामध्ये लोक थोर व्यक्तींची प्रशंसा करतात. पूर्वीच्या काळी राजे लोक तर आपल्या दरबारात आपली कीर्ती गाण्यासाठी भाट ठेवत असत. आजही वरिष्ठांची खुशामत करण्याची मानसिकता समाजामध्ये रूढ झाली आहे. आपला फायदा करून घेण्यासाठी किंवा स्वार्थ साधण्यासाठी लोक वरिष्ठांची स्तुती करताना दिसतात. अशा प्रकारच्या स्तुतीने ऐहिक जीवनात थोडाफार फायदा होतही असेल. पण त्याला स्वाभिमानाने जगणे म्हणता येणार नाही. ही एक प्रकारची लाचारीच आहे. दुसऱ्याची स्तुती जरूर करावी. गुणग्राहकता आपल्याजवळ असावी परंतु ती स्वार्थापोटी नसावी. लोकांची मानसिकता अशी असते की ते स्वार्थापोटी आज आपली स्तुती करतील परंतु उद्या त्यांचा स्वार्थ साधत नाही असे दिसले की ते निंदा करायलाही मागेपुढे पाहत नाहीत.
परंतु संकटकाळी किंवा अंतिम प्रसंगी श्रीमंत माणसे, वरिष्ठ लोक किंवा नातेवाईक यापैकी कोणीही उपयोगी पडत नाही. मोक्षमार्गावर वाटचाल करणे, आत्मदर्शन किंवा परमेश्वराची प्राप्ती करून घेणे हे जे मानवी जीवनाचे अंतिम ध्येय आहे, अशा प्रसंगी केवळ परमेश्वराचेच सहाय्य आपल्याला होत असते. त्याच्याच कृपेने जीवनातील संकटांना आपण धैर्याने तोंड देऊ शकतो.
महाभारतातील द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग आपल्या सगळ्यांना परिचित आहे. या कठीण प्रसंगातून आपल्याला सोडवतील म्हणून द्रौपदीने सुरुवातीला दरबारातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशा पितामह भीष्म, द्रोणाचार्य आदींना विनंती केली. तिचे पती असलेल्या पांडवांची देखील तिला आशा होती. परंतु यापैकी तिच्या मदतीला कोणीच धावून आले नाही. तेव्हा तिने आर्ततेने श्रीकृष्णाचा धावा केला आणि तोच तिच्या मदतीला धावून आला. म्हणून आशा करायची ती परमेश्वराची.
हे मानवा, स्तुती करायचीच असेल तर संत, सद्गुरु किंवा परमेश्वराची कर. त्यांचेच गुणगान गा असे समर्थ आपल्याला सांगत आहेत. वेदांनी, शास्त्रांनी आणि पुराणांनी त्या परमेश्वराची स्तुती गुणांचे वर्णन केले आहेत. समर्थ ज्या राघवाची स्तुती करायला आपल्याला सांगतात, तो राघव म्हणजे परमेश्वर सर्व सृष्टीत विराजमान आहे. राघव हा शब्दच किती सुंदर आहे ! राघव म्हणजे चैतन्य ! हे चैतन्य सर्व चराचरात भरलेले आहे. चैतन्याची अनेक रूपे असतात. त्याला नावेही वेगवेगळी असतात. पण मूळ चैतन्य एकच असते. ते आपल्याला पाहता आले पाहिजे. आपण त्याचेच गुणगान करावे. तोच आपली जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका करील.
स्वसंवाद
• माझ्या आयुष्यात मी खरोखर कोणावर आशा ठेवतो — माणसांवर की परमेश्वरावर?
• स्वार्थ साधण्यासाठी मी कधी कोणाची खुशामत तर करत नाही ना?
• दुसऱ्याच्या गुणांची प्रशंसा करताना माझ्या मनात स्वार्थ तर नसतो ना?
• माझ्या दैनंदिन जीवनात परमेश्वराचे स्मरण किंवा स्तवन याला किती स्थान आहे?
• ऐहिक यशापेक्षा आत्मिक प्रगती अधिक महत्त्वाची आहे हे मला खरोखर पटते का? ( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
११/३/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा