उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक – भाग १३
मना सांग पां रावणा काय जाले।
अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले॥
म्हणोनी कुडी वासना सांडी वेगीं।
बळे लागला काळ हा पाठिलागी॥१३॥
अर्थ:
हे मना, महापराक्रमी अशा रावणाचा अंत कसा झाला या गोष्टीचा विचार कर. त्याला कल्पनाही नसताना त्याच्या राज्याचा संपूर्णपणे नाश झाला. म्हणून वाईट वासना सोडून दे. कारण सर्व शक्तिमान असा काळ सर्वांच्याच पाठीमागे लागलेला आहे.
आधीच्या श्लोकात समर्थ आपल्याला "विवेके देहेबुद्धी सोडूनि द्यावी" असे सांगतात. विवेक हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. माणसाजवळ ज्ञान, संपत्ती, सत्ता, ऐश्वर्य सर्व काही असेल परंतु विवेकाची उणीव असेल तर त्याचे जीवन व्यर्थ जाते. जीवनात सारासार बुद्धीचा म्हणजेच विवेकाचा वापर करून वागले पाहिजे. रावण शक्तिमान होता. देवांनाही त्याने बंदी बनवले होते. तो वेदांचा जाणकार होता परंतु त्याच्या मनातील दुष्ट वासनांनी त्याचा घात केला. परस्त्रीच्या मोहाने त्याने सीतेसरख्या पतिव्रतेला पळवून आणले. त्याचे हे दुष्कृत्य त्याची पत्नी मंदोदरी, त्याचा भाऊ बिभीषण आणि दरबारातील गुरुजनांना आवडले नाही. त्यांनी त्याला वेळोवेळी सीतेला सन्मानाने परत पाठव असे सांगितले. परंतु मदांध आणि वासनांध रावणाला ते पटले नाही. त्यामुळे फक्त त्याचाच नाही तर त्याच्या संपूर्ण राज्याचा विनाश झाला.
पुत्रमोह आणि सत्तेचा लोभ यामुळे अंध झालेल्या धृतराष्ट्राने आपला पुत्र दुर्योधन, दुःशासन इ. च्या दुष्कृत्यांचा विरोध न करता त्यांना मूक संमतीच दिली. दुर्योधनाने सुद्धा पांडवांची पत्नी असलेल्या द्रौपदीची अभिलाषा धरली होती. त्यामुळे कौरवांचा संपूर्णपणे नि:पात झाला. महाभारतात एका प्रसंगी दुर्योधन बोलताना असे म्हणतो की चांगले काय आणि वाईट काय हे मला कळते. परंतु मला चांगले वागण्याची बुद्धीच होत नाही. याचाच अर्थ दुर्योधन आपल्या मनातील वाईट विचारांचा, वासनांचा त्याग करू शकला नाही विवेकाने वागू शकला नाही. "म्हणोनी कुडी वासना सांडी वेगी" असे समर्थ म्हणूनच म्हणतात.
या रामायण महाभारतातील उदाहरणाव्यतिरिक्त इतिहासात आणि वर्तमानात देखील वाईट वासना मनात ठेवून वागल्यामुळे व्यक्तीच्या आयुष्याचा विनाश झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. अनेक राजे आणि राज्यांचा नाश झाला आहे. अनितीने वागल्यामुळेच अनेक व्यक्तींनी स्वतःचा विनाश ओढवून घेतला आहे. काळ हा सर्वशक्तिमान आहे. त्याची सर्वांवर सत्ता चालते. जन्मलेल्या व्यक्तीला मृत्यू निश्चित असतो परंतु तो केव्हा येईल हे सांगता येत नाही. म्हणून वेळीच सावध होणे गरजेचे. तीच जाणीव आपल्याला समर्थ या ठिकाणी करून देतात. " पापाची वासना नको दावू डोळा "असे संत तुकाराम महाराज देखील आपल्याला सांगतात ते यामुळेच.
महाभारतात यक्ष आणि युधिष्ठिर यांचा एक संवाद याबाबतीत अतिशय समर्पक असा आहे. " या जगातील सगळ्यात मोठे आश्चर्य कोणते ?"असा प्रश्न यक्ष युधिष्ठिराला विचारतो. त्यावर युधिष्ठिराने दिलेले उत्तर मोठे छान आहे. तो म्हणतो, " जन्मलेल्याला मृत्यू निश्चित आहे परंतु तरीही त्याचे भान व्यक्तीला नसते. आपण अमर आहोत असेच सगळे वागत असतात. हेच या जगातील सगळ्यात मोठे आश्चर्य आहे."
या सगळ्या इतिहासातील उदाहरणांवरून आपण काहीतरी बोध घ्यायचा असतो. इतिहास हा केवळ वाचण्यासाठी नव्हे तर त्यापासून शिकण्यासाठी असतो. पुढच्या ठेच मागचा शहाणा असे आपण म्हणतो ते याच अर्थाने ! आपले आयुष्य मर्यादित असते. म्हणून मृत्यूचे भान ठेवून प्रत्येकाने वाईट वासनांचा त्याग केला पाहिजे आणि आपल्या आयुष्यात सत्कर्मांना स्थान दिले पाहिजे असेच समर्थांचे सांगणे आहे. आणि हे जेवढ्या लवकर लक्षात येईल तेवढे चांगले !
स्वसंवाद :
• माझ्या मनात अजूनही कोणत्या वाईट वासनांचे बीज दडलेले आहे का?
• रावण किंवा दुर्योधन यांच्या कथांमधून मी खरोखर काही बोध घेतो का?
• सत्ता, अहंकार किंवा मोह यामुळे माझ्या विवेकावर पडदा तर पडत नाही ना?
• जीवन क्षणभंगुर आहे ही जाणीव ठेवून मी माझा वर्तमान अधिक सजगपणे जगतो का?
• माझ्या आयुष्यात सत्कर्मांची वाढ आणि दुष्प्रवृत्तींचा त्याग करण्यासाठी मी सजग प्रयत्न करतो का?
( क्रमशः )
© विश्वास विष्णू देशपांडे, चाळीसगाव
दि. ०५/०३/२०२६
प्रतिक्रियेसाठी : ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा