उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक – भाग ९
नको रे मना द्रव्य ते पुढीलंचे |
अति स्वार्थबुद्धी न रे पाप साचे|
घडे भोगणे पाप ते कर्म खोटे |
न होता मनासारिखे दुःख मोठे |९|
अर्थ :
समर्थ मनाला उपदेश करताना म्हणतात की पुढीलांचे म्हणजे दुसऱ्याचे द्रव्य किंवा पैसा त्याज्य समजावा. पैशाची हाव सुटली की माणूस फक्त स्वार्थाचा विचार करतो आणि त्यातून पापाचाच संचय होतो. आणि ज्यामुळे पापकर्माची फळे भोगावे लागतात असे कर्म खोटे म्हणजे त्याज्य आहे. स्वार्थाची इच्छा धरणारा माणूस त्याच्या मनासारखे झाले नाही की दुःखी होतो.
मागील श्लोकात समर्थांनी आपला देह चंदनाप्रमाणे झिजवून सज्जनांना संतुष्ट करावे असे सांगितले आहे. या श्लोकात समर्थ आपल्याला दुसऱ्याच्या पैशाचा किंवा संपत्तीचा लोभ ठेवू नये असे सांगत आहेत. पुढीलांचे या शब्दाचे अनेक अर्थ होतात. पुढीलांचे म्हणजे पूर्वजांचे असाही अर्थ घेता येतो आणि दुसऱ्यांचे हाही अर्थ या ठिकाणी लागू होतो. त्याचप्रमाणे दुसरा अर्थ म्हणजे पुढच्या पिढीसाठीचे. आपल्या पूर्वजांनी कमावलेले धन आयतेच आपल्याला मिळावे असे प्रत्येकाला वाटते. परंतु अशा प्रकारची अभिलाषा धरली तर आपल्या कर्तृत्वाला फारसा वाव मिळत नाही. माणूस आळशी बनतो आणि अनेक दुर्गुण त्याच्या अंगात प्रवेश करतात. पूर्वजांच्या संपत्तीसाठी ( वारसा हक्कासाठी )होणारी भांडणे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या भानगडी, कोर्टकचेऱ्या आपणा सर्वांना परिचित आहेत.
स्वार्थ कोणाला चुकला आहे ? लहान मुलाला सुद्धा आपला स्वार्थ कळतो. त्यामुळे आपली गरज भागेल एवढे जरूर मिळवावे. परंतु गोंधळ होतो तो अती स्वार्थ बुद्धीमुळे. आपल्या चरितार्थासाठी आवश्यक तेवढा पैसा जरूर मिळवावा. पण पुढील पिढ्यांसाठी त्याचा संचय करू नये असेही समर्थ आपल्याला सुचवत आहेत. गोंदवलेकर महाराज म्हणत, "घरात तीन दिवसांचे अन्न असले म्हणजे चौथ्या दिवसाची चिंता करू नये." परंतु प्रत्यक्षामध्ये आपण असे पाहतो की साधारणतः तीन पिढ्यांना पुरून उरेल एवढी संपत्ती असतानाही लोकांना अधिकाधिक संपत्तीची हाव असते.
पुढीलांचे म्हणजे दुसऱ्याचे द्रव्य किंवा पैसा नको. ते कोणत्याही प्रकारे घेणे म्हणजे एक प्रकारची चोरीच आहे. मग पैसा मिळवायचाच नाही का ? प्रापंचिक माणसाला तर पैसा आवश्यकच असतो. अगदी साधू संन्यासी यांना देखील अन्न, वस्त्र, निवारा यांची आवश्यकता असतेच. मग पैसा कसा मिळवावा ? याचे उत्तर संत तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे ' जोडोनिया धन उत्तम व्यवहारे हे आहे. अशा पद्धतीने पैसा मिळवला तर तो धर्माला मान्य आहे. सरळमार्गी राहून पैसा मिळवता येत नाही अशा प्रकारची साधारण समजूत आहे. परंतु कष्टाने आणि सरळ मार्गाने पैसा मिळवून श्रीमंत झालेल्यांची अनेक उदाहरणे समाजात आहेत. परंतु त्याकडे आपले फारसे लक्ष जात नाही. पण अशी उदाहरणे आदर्श म्हणून समाजासमोर ठेवली गेली पाहिजेत.
असे म्हणतात की माणसाच्या गरजा पूर्ण करता येतात परंतु हाव पूर्ण करता येत नाही. म्हणून गरजेपुरते असले की माणसाने समाधानी असावे. परंतु तसे होत नाही. म्हणून आपल्यापेक्षा खालच्या स्तरावर असलेल्या व्यक्तीकडे पहावे असे म्हटले जाते. कारमध्ये फिरणाऱ्या माणसाने मोटरसायकलवर फिरणाऱ्या माणसाकडे पाहून आपण त्यापेक्षा भाग्यवान आहोत असे समजून समाधान मानावे. मोटरसायकलवाल्याने सायकल चालवणाऱ्याकडे, सायकलवर असणाऱ्याने पायी चालणाऱ्याकडे लक्ष द्यावे म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत हे लक्षात येईल. परंतु असे होत नाही. आपण नेहमी उलटच करत असतो. श्रीमंत अतिश्रीमंताकडे पाहत असतो आणि स्वतःला दुःखी करून घेत असतो.
अतिस्वार्थ बुद्धीमुळे आपल्याला अधिक हवे असे वाटत असते आणि मग ते कोणत्याही मार्गाने मिळवण्यात काही गैर वाटत नाही. परंतु असे करत असताना आपण पापकर्मांचाच संचय करत जातो. गैरमार्गाने पैसा कमावणारे लोक समाजात सुखाने जगताना दिसतात. ते पाहून आपणही तसे करावे असे वाटणे साहजिक असते. परंतु कर्माच्या सिद्धांतानुसार अशा लोकांना देखील आपल्या पापाचा हिशेब द्यावाच लागतो. ज्यांच्यावर अनेक घोटाळ्यांचे आरोप आहेत असे भ्रष्ट नेते एखाद्यावेळी न्यायालयातून निर्दोष सुटतीलाही परंतु नियती हे असे न्यायालय आहे की जिथे आपल्या कर्मांचा योग्य तो हिशेब होतोच. तिथे कोणाचीही सुटका नाही. अधिकाधिक पैसा कमावण्याचा हव्यास लागतो तेव्हा अनेक प्रकारच्या चिंता, दडपण, स्पर्धा यासारख्या गोष्टींना सामोरे जावे लागते. त्यातूनच मग दडपण, निद्रानाश, अपचन, रक्तदाब, हृदयविकार यासारख्या अनेक विकारांना निमंत्रण मिळते. त्यामानाने सरळ मार्गाने वागणारा माणूस खाऊन पिऊन सुखी आणि समाधानी असतो. पैशाची, संपत्तीची आणि सत्तेची हाव सुटलेल्या माणसाला जेव्हा त्याच्या मनासारखे होत नाही तेव्हा मोठ्या दुःखाला सामोरे जावे लागते. धनवृद्धीसोबत जर चिंतावृद्धी होत असेल तर काय उपयोग ?समर्थांचा इशारा स्पष्ट आहे —
द्रव्य मिळव, पण द्रव्याचा दास होऊ नकोस.
संपत्ती कमव, पण स्वार्थाचा संचय करू नकोस.
स्वसंवाद
• माझ्या मनात दुसऱ्याच्या संपत्तीबद्दल आकर्षण किंवा हेवा आहे का?
• मी गरज आणि हाव यातील फरक ओळखतो का?
• पैसा कमावताना माझा मार्ग प्रामाणिक आणि नीतिमान आहे का?
• अधिकाधिक मिळवण्याच्या धडपडीत माझे समाधान हरवत तर नाही ना?
• धनवृद्धीबरोबर माझी चिंताही वाढते आहे का?
© विश्वास विष्णू देशपांडे, चाळीसगाव
दि. ०२/०३/२०२६
प्रतिक्रियेसाठी : ९४०३७४९९३२
(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा