मुख्य सामग्रीवर वगळा

आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक

 उगवतीचे रंग

आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक

छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची प्रेरणा ज्यांच्या रक्तात होती आणि जेजुरीच्या खंडेरायाचा भंडारा ज्यांच्या भाळी होता, अशा एका शूरवीराचा आज स्मृतिदिन आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजी सत्तेला सळो की पळो करून सोडणारी पहिली ठिणगी ज्यांनी पेटवली, त्या आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचा आज बलिदानस्मरणाचा दिवस.

१७९१ साली पुरंदरच्या पायथ्याशी वसलेल्या जांभूळवाडी गावात उमाजी नाईकांचा जन्म झाला. आईने त्यांच्या जीवनात शक्ती आणि भक्ती या दोन दीपांची ज्योत अखंड पेटती ठेवली. वडील दादोजी नाईक यांनी त्यांना शस्त्र चालवण्याचे शिक्षण दिले. त्यामुळेच उमाजी शस्त्रविद्येत पारंगत झाले, अंगी धैर्य आले आणि मनात स्वाभिमान रुजला. उमाजी उंचपुरे आणि धडधाकट होते.

 ज्या रामोशी- बेरड समाजातून ते आले होते त्यांच्यातील काही लोकांवर पुरंदरच्या किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी परंपरागत होती. या लोकांचे शौर्य आणि धैर्य ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा आपल्या सैन्यात या समाजातील काही लोकांचा समावेश केला होता. उमाजींचे वडीलही या किल्ल्यावर संरक्षणाचे काम करीत होते त्यांच्या या कामामुळेच त्यांना नाईक ही पदवी मिळाली होती. परंतु दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांच्या सल्ल्यानुसार त्यांच्याकडून ही जबाबदारी काढून घेतली आणि आपल्या  मर्जीतील लोकांना ही जबाबदारी दिली. त्यामुळे रामोशी समाजातील बरेच लोक बेकार झाले त्यांना कामधंदा उरला नाही आणि उपाशी राहण्याची वेळ आली. साहजिकच त्यांच्या मनात इंग्रजांविरुद्ध चीड निर्माण झाली. इंग्रज जनतेवर करत असलेले अत्याचार आणि त्या अत्याचारांची जनतेला आणि विशेषतः रामोशी समाजाला मोजावी लागणारी किंमत ते लहानपणापासून पाहत होते. त्यामुळेच इंग्रजी सत्ते विरुद्ध त्यांच्या मनात चीड निर्माण झाली.

उमाजींची जेजुरीच्या खंडेरायावर निस्सीम भक्ती होती. पहाटे कऱ्हा नदीवर स्नान करून ओल्या अंगाने खंडेरायाला अभिषेक करणे हा त्यांचा नित्यक्रम होता. लोककथेनुसार, एका दिवशी खंडेरायानेच वृद्धाच्या रूपात त्यांना दर्शन दिले, पाठीवर आशीर्वादाचा हात ठेवला आणि त्यांच्या दंडावर रक्षण करणारा ताईत बांधला. तो ताईत केवळ श्रद्धेचे प्रतीक नव्हता; तो परकीय सत्तेविरुद्ध लढण्याचा ईश्वरी आदेश असल्याची उमाजींची ठाम धारणा होती. हा आदेश उमाजींनी शिरोधार्य मानला. या श्रद्धेतूनच त्यांना जणू हजार हत्तींचे बळ मिळाले. त्यांनी तीन-चारशे रामोशी तरुणांची एक अभेद्य फळी उभी केली आणि इंग्रजांविरुद्ध संघर्षाचा शुभारंभ केला. सामान्य जनतेला त्रास न देता, अन्यायाविरुद्ध उभे राहणे हा त्यांचा मूलमंत्र होता. त्यामुळेच लोक त्यांच्याकडे आशेने पाहू लागले.

इंग्रजांची सत्ता देशभर पसरत असताना अनेक संस्थानिक मांडलिकत्व स्वीकारत होते. अशा बिकट काळात उमाजी नाईकांनी ४ फेब्रुवारी १८३१ रोजी इंग्रजांविरुद्ध ऐतिहासिक जाहीरनामा प्रसिद्ध केला. हा जाहीरनामा केवळ कागदाचा तुकडा नव्हता; तो स्वराज्याच्या पुनरुज्जीवनाची गर्जना होता.

त्यात त्यांनी स्पष्ट शब्दांत आवाहन केले होते—

इंग्रज अधिकारी जिथे दिसतील तिथे ठार मारा.

कंपनी सरकारला दिला जाणारा कर तात्काळ बंद करा.

युरोपियन मालमत्तांची होळी करा.

हिंदू असो वा मुसलमान—सर्वांनी एकत्र येऊन इंग्रजांना देशाबाहेर हाकलून द्या.

उमाजींना दोन वेळा इंग्रज सरकारने पकडले आणि तुरुंगात डांबले. एकदा त्यांना एक वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा झाली आणि दुसऱ्यांदा सात वर्षाची. परंतु या काळाचा त्यांनी शिकण्यासाठी वापर करून घेतला. या काळात ते लिहिणे वाचणे शिकले आणि तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांचा इंग्रजांविरुद्धचा संघर्ष अधिकच धारदार झाला.

आपल्या शक्तीचा उमाजींनी कधीही गैरवापर केला नाही. सामान्य जनतेला त्रास देणे तर दूरच; उलट ते गरिबांचे कैवारी बनले. त्यामुळेच इंग्रज अधिकाऱ्यांची झोप उडाली. उमाजींना पकडण्यासाठी इंग्रज सरकारने जंग पछाडले; परंतु ते त्यांच्या हाती लागत नव्हते.

अखेर इंग्रजांनी फितुरीचा मार्ग स्वीकारला. काही लोकांना पैशाचे आमिष दाखवून फितवण्यात आले. या गद्दारीमुळे उमाजी नाईकांना पकडून इंग्रजांच्या स्वाधीन करण्यात आले.

त्यानंतर इंग्रजांनी उमाजींवर लूटमारी, खंडणी व इंग्रजी सत्तेविरुद्ध बंड अशा अनेक आरोपांचा खटला चालवला. अखेर पुणे येथे ३ फेब्रुवारी १८३४ रोजी त्यांना फाशी देण्यात आली.

फासावर चढवताना इतिहास थरारला—फाशीचा दोर एकदा नाही, तर दोनदा तुटला. खंडेरायाचा भंडारा ताईत रूपाने त्यांच्या दंडावर असेपर्यंत मृत्यूही त्यांना स्पर्श करू शकत नव्हता. अखेर तो ताईत तोडण्यात आला आणि उमाजी नाईक हसतमुखाने भारतमातेच्या चरणी अर्पण झाले.

एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रातील इंग्रज सत्तेविरुद्ध तळागाळातील लोकांकडून घडून आलेला हा पहिला संघटित क्रांतिकारी प्रयत्न होता.

उमाजी नाईक हे केवळ बंडखोर नव्हते; ते स्वराज्य आणि स्वधर्माच्या रक्षणासाठी पेटलेली एक धगधगती मशाल होते.

“माझा देश आणि माझा धर्म” यासाठी बलिदान देण्याची त्यांची वृत्ती आजही आपल्याला राष्ट्रभक्तीचा खरा अर्थ शिकवते.

आज त्यांच्या बलिदानदिनी—माघ शुद्ध द्वितीयेला—

या आद्य क्रांतिवीराच्या स्मृतीस त्रिवार वंदन.

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव

३/२/२०२६

प्रतिक्रियेसाठी : ९४०३७४९९३२

(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...