उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक – भाग ६
नको रे मना क्रोध हा खेदकारी |
नको रे मना काम नाना विकारी |
नको रे मदा सर्वदा अंगीकारू |
नको रे मना मत्सरू दंभ भारू ||६||
अर्थ :
हे मना, क्रोधाला स्थान देऊ नकोस; तो शेवटी खेद आणि दुःख देणाराच आहे. कामवासना नाना प्रकारचे विकार निर्माण करते. मद (अहंकार), मत्सर आणि दंभ ( ढोंगीपणा ) या विकारांपासून दूर राहा असा समर्थांचा स्पष्ट उपदेश आहे.
मागील श्लोकात समर्थांनी “पापसंकल्प” सोडण्याची सूचना केली. येथे ते त्या पापसंकल्पांचे मूळ असलेल्या विकारांकडे आपले लक्ष वेधतात. मनाच्या अध:पतनाला कारणीभूत ठरणारे हे विकार म्हणजेच षडरिपूंपैकी प्रमुख काम, क्रोध, मद, मत्सर आणि दंभ. त्याबद्दल समर्थ प्रामुख्याने या ठिकाणी सांगतात.
क्रोध हा खरोखरच खेदकारी आहे. रागाच्या भरात उच्चारलेले शब्द आणि केलेली कृती अनेकदा नंतर पश्चातापाला कारणीभूत ठरतात. हातातून सुटलेला बाण जसा परत येत नाही; तसेच रागाच्या भरात बोललेले शब्दही.
क्रोध हा क्षणिक असतो; पण त्याचे परिणाम मात्र दीर्घकाळ मनात जखम करतात. म्हणूनच मोठी माणसे आपल्याला सांगतात की राग आला की थोडा थांबा, एक ते दहा अंक मोजा, श्वास घ्या. कोणतीही प्रतिक्रिया देण्याआधी विचार करा. हा छोटासा विरामच अनेक अनर्थ टाळू शकतो.
कामभावना ही जीवनातील नैसर्गिक शक्ती आहे. ती नाकारण्याची गोष्ट नाही; पण तिचा अतिरेक विकारांना आमंत्रण देतो. काम म्हणजे केवळ लैंगिक वासना नव्हे; कोणत्याही गोष्टीचा अतिरेकी हव्यास हा देखील ‘काम’च.
विवाहमंत्रातील “धर्मेच अर्थेच कामेच नातिचरामि” हे वचन याच संतुलनाची शिकवण देते. धर्माच्या चौकटीत राहून अर्थ आणि कामाचा स्वीकार ही आपली संस्कृती आहे. संयमित काम सृजनशील असतो तर त्याचा अतिरेक विनाशकारी ठरतो.
संत परंपरेत तीन ‘एषणा’ सांगितल्या आहेत. वित्तेषणा (संपत्तीची हाव), दारेषणा (सुंदर स्त्रीची अभिलाषा) आणि लोकेषणा (कीर्तीचा हव्यास). या तिन्ही एषणा किंवा वासना मनाला बाहेर खेचतात. अध्यात्माची वाट मात्र अंतर्मुख करते.म्हणूनच ती श्रेयस्कर !
यश, वैभव किंवा कीर्ती मिळाली की मनात ‘मीच केले’ हा अहंकार उद्भवतो. ' वऱ्हाड निघालं लंडनला ' या लक्ष्मण देशपांडे यांच्या एकपात्री प्रयोगात एक नणंदेचं पात्र आहे. काही चांगलं झालं की ते माझ्यामुळे झाला असं ती सारखं म्हणत असते. हा फुकाचा अहंकार. हा मद म्हणजेच अहंकार साधकाच्या प्रगतीत अडथळा ठरतो.
इतरांची प्रगतीने सज्जनांना आनंद होतो. पण ज्यांना ती पाहवत नाही त्यांना मत्सर निर्माण होतो आणि मत्सरातून द्वेष जन्म घेतो. आणि मग स्वतःला श्रेष्ठ दाखवण्याचा दंभ सुरू होतो. हे असते आभासी मोठेपणाचे प्रदर्शन. जर मनापासून एखादी गोष्ट कोणी करत नसेल तर टिळे, टोपी, गंधमाळा, भगवे कपडे या सगळ्या गोष्टी म्हणजे सोंग आहेत. जो सगळ्या गोष्टी मनापासून करतो त्याला असे प्रदर्शन करण्याची गरज भासत नाही. पांढरे कपडे घालून समाजसेवेचा आव आणणे, वाङ्मयचौर्य करणे हा देखील असाच प्रकार म्हणता येईल.
' जगाच्या पाठीवर ' या चित्रपटात ग दि माडगूळकर यांनी लिहिलेले एक सुंदर गाणे आहे ' थकले रे नंदलाला ' हे गीत आजच्या परिस्थितीचे अतिशय सुंदर वर्णन करते यातील प्रत्येक ओळ आजच्या राजकीय आणि सामाजिक वातावरणाला लागू पडते. या गीतातील ' निलाजरेपण कटीस नेसले, निसुगपणाचा शेला...' यासारखी ओळ असो किंवा ' विषयवासना वाजे वीणा, अतृप्ती दे ताला...' यासारखी ओळ असो त्या आजच्या परिस्थितीचे हुबेहूब वर्णन करतात.
हे विकार सूक्ष्म असतात; पण आत्मविकासाच्या वाटेवर ते खोल दरी निर्माण करतात. राघवाच्या अनंत मार्गावर चालायचे असेल तर बाह्य शत्रूंपेक्षा अंतर्गत शत्रूंवर विजय मिळवावा लागतो. हा मार्ग दुसऱ्यांवर विजय मिळवण्याचा नाही; तर स्वतःवर विजय मिळवण्याचा आहे. साधकाला देहबुद्धी ओलांडून आत्मबुद्धीकडे वाटचाल करायची असते. या प्रवासात विकारांवर सतत लक्ष ठेवावे लागते. कारण ते हळूहळू, नकळत मनावर कब्जा करतात.
त्यासाठी मनावर एकदम नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न न करता सुरुवात छोट्या छोट्या गोष्टींनी करावी. मोठ्या प्रतिज्ञेपेक्षा छोट्या, सातत्यपूर्ण संयमाचे पाऊल अधिक प्रभावी असते.
स्वसंवाद
• रागाच्या क्षणी मी थांबतो का, की तत्काळ प्रतिक्रिया देतो?
• माझ्या इच्छांमध्ये संयम आहे का, की अतिरेक?
• इतरांच्या यशाने मला आनंद होतो की मत्सर?
• माझ्या यशामागे ईश्वरकृपा आणि इतरांचा देखील वाटा आहे याचे भान मी ठेवतो का ?
• बाह्य जग जिंकण्यापेक्षा मी स्वतःवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करतो का?
(क्रमशः)
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
१८/२/२०२६
प्रतिक्रियेसाठी : ९४०३७४९९३२
(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा