मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक - एक सार्वकालिक 'मनोपनिषद' ( भाग २ )

 उगवतीचे रंग 

मनाचे श्लोक - एक सार्वकालिक 'मनोपनिषद' (प्रास्ताविक भाग २ )

मनाचे श्लोक समर्थ रामदासांनी कसे आणि कोणत्या परिस्थितीत लिहिले त्याची कथा मोठी रंजक आहे. समर्थांनी चाफळला श्रीराम नवमीचा उत्सव सुरू केला होता. या उत्सवा दरम्यान परिसरातील आणि आजूबाजूच्या गावातील शेकडो लोक दर्शनासाठी आणि प्रसादासाठी त्या ठिकाणी एकत्र येत होते. छत्रपती शिवाजी महाराजांना या उत्सवाबद्दल जेव्हा कळले तेव्हा त्यांनी दरवर्षी या उत्सवाला मदत देण्याचे ठरवले. दरवर्षी महाराजाकडून या उत्सवासाठी धान्य, शिधा, पैसे इ. स्वरूपात नियमितपणे मदत येत होती. परंतु एकदा मात्र काही कारणाने ही मदत पोहोचू शकली नाही. कदाचित महाराज मोहिमेत गुंतले असल्यामुळे असे झाले असावे. परंतु हा उत्सव कसा पार पडेल याची शिष्यांना मात्र चिंता लागली होती. त्यांनी समर्थांच्या कानावर हा विषय घातला. समर्थ म्हणाले, " कर्ता करविता राम आहे. हा त्याचाच उत्सव आहे. तोच आपल्याकडून हे कार्य करून घेईल. "

त्याच दिवशी रात्री समर्थांनी रात्री आपला पट्ट शिष्य कल्याणस्वामी यांना बोलावले आणि त्यांना येताना लेखनसामग्री घेऊन येण्यास सांगितले. समर्थांनी कल्याणाला आपल्यासमोर बसवले आणि त्यांच्या मुखातून मनाचे श्लोक बाहेर पडू लागले. ' गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा ' या नमनाच्या श्लोकाने सुरुवात झाली. समर्थ सांगत होते आणि कल्याण लिहून घेत होता. हा घटनाक्रम रात्रभर सुरू होता. ' अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी 'अशातलेच हे होते. लोक कल्याणाच्या तळमळीतून समर्थांच्या चिंतनातूनच उत्स्फूर्ततेने हे श्लोक त्यांच्या मुखातून बाहेर पडले होते.पहाट होईपर्यंत समर्थांनी २०५ श्लोक कल्याणाला सांगितले आणि त्याने ते लिहून घेतले. नंतर समर्थ तपश्चर्येसाठी घळीमध्ये निघून गेले अशी मनाच्या श्लोकांच्या निर्मितीची कथा सांगितली जाते. 

सकाळी कल्याण स्वामींनी समर्थांच्या सर्व शिष्यांना एकत्र करून हे मनाचे श्लोक सांगितले आणि त्यांच्याकडून मनाच्या श्लोकाच्या प्रती तयार करून घेतल्या. या प्रती प्रत्येक शिष्याकडे देऊन त्यांना घरोघरी भिक्षा मागण्यासाठी पाठवण्यात आले. प्रत्येकाने त्यातील एक श्लोक खड्या आवाजात म्हणून त्यानंतर जय जय रघुवीर समर्थ असे म्हणायचे असे सांगितले गेले. सर्व शिष्यांनी पंचक्रोशीत जाऊन भिक्षा मागितली आणि काय आश्चर्य ! गाड्या भरभरून धान्य गोळा झाले आणि रामनवमीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा झाला. समर्थ शिष्यांची भिक्षेची ही परंपरा आजही सुरू आहे. 

समर्थांनी केवळ वनात राहून तपश्चर्या केली नाही तर समर्थ जनात आणि वनात अशा दोन्ही ठिकाणी राहिले ते स्वतः घरोघर हिंडून भिक्षा मागत असत. समाजाशी संपर्क यावा समाजाची परिस्थिती कळावी आणि विविध स्तरातील लोकांची संबंध यावा यासाठी ही भिक्षेची पद्धत त्यांच्या कार्यात फार उपयुक्त ठरली. यादृष्टीने समर्थांनी जे मनाचे श्लोक लिहिले ते फार उपयुक्त ठरले. त्यांच्या कार्यकर्त्यांना समाजाशी संपर्क साधणे, समाजाच्या स्थितीची माहिती घेणे हे त्यामुळे सोपे झाले. समर्थांनी अंगीकारलेल्या कार्यात या गोष्टीची मदत झाली. आपल्या कार्यात त्यांनी अशा रीतीने समाजाला जोडून घेतले. तसेच भिक्षेच्या पद्धतीमुळे कोणावर ओझे बनून राहण्याची परिस्थिती आली नाही. कोणावर भिक्षा द्या म्हणून सक्ती नव्हती त्याचप्रमाणे कोणाचीही उपासमार झाली नाही. त्यांच्यापैकी कोणीही या पद्धतीमुळे समाजाशी फटकून वागले नाही आणि समाजाला देखील त्यांच्याबद्दल एक प्रकारची आत्मीयता आणि आदर निर्माण झाला. यासारख्या गोष्टी अगदी सहजतेने घडत होत्या म्हणूनच मनाचे श्लोक फार उपयुक्त ठरले. त्या काळात सर्वत्र मुस्लिम राजवट होती. लोकांच्या मनावर गुलामगिरीचा पगडा होता. स्वधर्माविषयीचा आदर आणि अभिमान नाहीसा होत चालला होता. अशा परिस्थितीत त्यांच्या या श्लोकाने जनसामान्यांना मार्गदर्शन केले आणि एक प्रकारे समाजात जागृती घडवून आणली.

या मनाच्या श्लोकांमध्ये विवेक, वैराग्य आणि भक्ती ही समर्थांनी सांगितलेली त्रिसूत्री मुख्य आधार आहे. विवेक म्हणजे काय स्वीकारावे आणि काय सोडावे याचे भान. वैराग्य याचा अर्थ अनावश्यक इच्छांपासून मनाला मुक्त करणे. आणि भक्ती म्हणजे एका उच्च ध्येयाशी (राघवाशी) मनाला जोडून घेणे. त्या मार्गावर वाटचाल करणे. 

" केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे " ही समर्थांची शिकवण आहे. ती त्यांच्या अनुभवातून किंवा प्रचितीतून आलेली आहे. साधारण साडेतीनशे वर्षांपूर्वी लिहिलेले हे श्लोक आजही मनाला मार्गदर्शन करण्यासाठी मोलाचे ठरतात. आजच्या तणावग्रस्त परिस्थितीत गीतेप्रमाणेच आपल्याला ते कसे वागावे आणि बंधापासून तर मुक्तीपर्यंत कशाप्रकारे वाटचाल करावी हे अत्यंत सुलभ पद्धतीने सांगतात. 

हे सर्व लिहिण्यामागे एकच शुद्ध हेतू आहे - समर्थांनी दिलेला हा 'बोध' केवळ पाठांतरापुरता मर्यादित न राहता तो आपल्या ' वर्तनाचा ' भाग व्हावा. मनाचे श्लोक हे केवळ ओठांवर न राहता आपल्या अंतर्यामी उतरावे. 

मनाचे श्लोक २०५ आहेत. काही ठिकाणी त्यांची संख्या २१० अशीही दिली आहे. परंतु २०५ श्लोक हे सर्वमान्य आहेत. प्रत्येक धार्मिक ग्रंथाच्या शेवटी त्याची फलश्रुती दिलेली असते किंवा तो ग्रंथ का वाचायचा हे सांगितलेले असते. तशाच प्रकारची फलश्रुती समर्थ रामदासांनी मनाच्या श्लोकांचा समारोप करताना सांगितली आहे. ते म्हणतात 

मनाची शते शते ऐकता दोष जाती 

मतीमंद ते साधना योग्य होती 

चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी 

म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी.

ही मनाची शते ( म्हणजे शतक अर्थात द्विशतक आणि येथे २०५ श्लोक असा अर्थ घ्यावा ) ऐकल्यानंतर दोष निघून जातात. मतिमंद लोक देखील साधन करण्यासाठी पात्र होतात, ज्ञानवैराग्य संपन्न होतात आणि मुक्तीच्या सुखाप्रत पोहोचतात. ही मनाच्या श्लोकांची फलश्रुती होती आहे. भगवद्गीता जशी कोणा एका विशिष्ट धर्मासाठी नाही तर ती सर्व मानवजातीसाठी आहे. तसेच मनाचे श्लोक देखील सर्व मानवजातीला मार्गदर्शन करणारे आहेत.  गोविंद देव गिरी महाराज म्हणतात," मनाचे श्लोक वाचल्यानंतर आणि ते जीवनात उतरवल्यानंतर तुम्हाला चार वेद किंवा भगवद्गीता किंवा महाभारत वाचण्याची आवश्यकता नाही यामध्ये त्यातील सर्व सार आले आहे." मनाचे श्लोक म्हणजे तृषार्ताची तहान भागवणारे मधुर जलाचे सरोवर. आपली जेवढी तहान असेल तेवढे पाणी आपण प्राशन करावे आणि आपली तृषा भागवावी.

मनाच्या श्लोकांचे विश्लेषण करताना आपण केवळ शब्दांचे अर्थ पाहणार नाही, तर त्या श्लोकामागील समर्थांचा मानसशास्त्रीय दृष्टिकोन आणि आधुनिक काळातील त्याचे महत्त्व पाहणार आहोत. 

समर्थ जेव्हा 'मना सज्जना' म्हणतात, तेव्हा ते आपल्याला आपल्यातील सुप्त देवत्वाची जाणीव करून देतात. हा प्रवास आहे - स्वैर मनाकडून स्थिर मनाकडे, आणि स्थिर मनाकडून ईश्वरी साक्षात्काराकडे. या मनोपनिषदाच्या माध्यमातून आपण मनाच्या एका अशा प्रदेशात प्रवेश करणार आहोत, जिथे गोंधळ संपतो आणि स्पष्टता (Clarity) सुरू होते." या मार्गावर वाटचाल करण्याची शक्ती श्रीराम आम्हाला देवो अशी प्रार्थना करून पुढील भागापासून प्रत्यक्ष श्लोकांचा अर्थ समजावून घेऊया. ( क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

४/२/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...