उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १
गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा |
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा |
नमू शारदा मूळ चत्वार वाचा |
गमू पंथ अनंत या राघवाचा |१|
अर्थ :
जो गणांचा अधिपती आहे, जो सर्व गुणांचा स्वामी आहे आणि निर्गुण परब्रह्माचा मुळारंभ आहे, अशा श्रीगणेशाला वंदन. तसेच परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या चारही वाणींचे मूलस्रोत असलेल्या देवी शारदेला नमस्कार करून आपण राघवाच्या अर्थात ईश्वराच्या अनंत मार्गावर वाटचाल सुरू करूया.
मनाच्या श्लोकांतील पहिला श्लोक मंगलाचरणाचा आहे. कोणतेही कार्य सिद्धीस जाण्यासाठी ईश्वरकृपेची आवश्यकता असते. म्हणून कोणत्याही चांगल्या कार्याचा प्रारंभ मंगलभावनेने अर्थात ईश्वर प्रार्थनेने आपण करतो. समर्थ रामदासांनीही मनाच्या या महाग्रंथाची सुरुवात गणेश व शारदा यांच्या वंदनाने केली आहे. सर्वात आधी आपण श्रीगणेशाचे स्मरण करतो. समर्थांनीही मनाच्या श्लोकांचा प्रारंभ श्रीगणेशाच्या नमनाने केला आहे. श्रीगणेश हा विघ्नहर्ता आहे. आपल्या कार्यातील अडथळे तो दूर करतो, मार्ग सुकर करतो आणि साधकाचे रक्षण करतो.
समर्थ श्रीगणेशाला “सर्वा गुणांचा ईश” म्हणतात. येथे केवळ सत्त्व, रज, तम हे त्रिगुण अभिप्रेत नाहीत, तर चांगले–वाईट, त्याज्य–ग्राह्य असे सर्व गुण येतात. मुळात सृष्टीत कोणतीही गोष्ट स्वतःहून चांगली किंवा वाईट नसते; तिचा उपयोग आपण कसा करतो, यावर तिचे स्वरूप ठरते. अग्नी स्वयंपाकासाठीही उपयोगी पडतो आणि जाळण्यासाठीही. शस्त्र एखाद्याला जखमी करू शकते, तसेच शस्त्रक्रियेतून प्राण वाचवूही शकते. दैनंदिन व्यवहारात त्याज्य मानले जाणारे विष अनेक रोगांमध्ये औषध ठरते. सृष्टीत शुद्ध तत्त्वच विराजमान आहे आणि त्या तत्त्वांचा अधिपती गणपती आहे.
गणेशवंदनेनंतर समर्थ विद्येची देवता असलेल्या शारदेचे म्हणजेच माता सरस्वतीचे स्मरण करतात. “नमू” हा शब्द गणेश आणि शारदा या दोघांनाही उद्देशून आहे. दैनंदिन जीवनात असो वा अध्यात्ममार्गावर, प्रगतीसाठी ज्ञान अत्यावश्यक आहे; आणि ज्ञानाची अधिष्ठात्री देवता म्हणजे शारदा. तिच्या कृपेअभावी कोणतेही ज्ञान संपादन शक्य नाही. म्हणूनच तिलाही वंदन.
शब्दाचे मूळ स्फुरण परा, त्याचा भावार्थ पश्यंती, त्याचा नाद मध्यमा आणि प्रत्यक्ष उच्चार वैखरी या चारही वाणींचे मूलस्थान शारदा आहे. कोणत्याही वाङ्मयाची, विचारांची किंवा अभिव्यक्तीची निर्मिती तिच्याशिवाय शक्य नाही. म्हणूनच समर्थांनी या मनोपनिषदाच्या प्रारंभी शारदेला वंदन केले आहे. शारदाच आदिमाया, आदिशक्ती आहे.
या वंदनाचा हेतू स्पष्ट आहे. आपली ही वाटचाल निर्विघ्नपणे पार पडावी. आपल्याला ज्या मार्गावर चालायचे आहे, तो मार्ग म्हणजे श्रीरामांचा मार्ग. येथे श्रीराम म्हणजे केवळ दशरथपुत्र नव्हे, तर परमात्मस्वरूप. हा मार्ग अनंत आहे, न संपणारा आहे. या मार्गावर स्वयं भगवान शंकरही चालत आहेत; तेही अखंड रामनामाचा जप करत आहेत.
समर्थांचे दैवतच श्रीराम आहे. ते स्वतःला रामदास म्हणतात म्हणजे श्रीरामाचे दास. श्रीराम जणू त्यांना प्रत्यक्ष समोर उभे दिसतात. म्हणूनच ते म्हणतात, “गमू पंथ अनंत या राघवाचा.” या अनंत मार्गावर चालण्यासाठी समर्थ श्रीगणेश आणि शारदेचे आशीर्वाद मागतात आणि ते आशीर्वाद आपल्यासाठीही आहेत. कारण आपल्यालाही समर्थांनी सांगितलेल्या या अनंत पंथावर वाटचाल करायची आहे. आपणही भक्तिभावाने त्यांना वंदन करून, या राघवाच्या अनंत मार्गावर चालण्यासाठी सज्ज होऊ या.
स्वसंवाद
१. कोणत्याही कार्याची सुरुवात करताना माझ्या मनात मंगलभाव आहे का, की केवळ घाई?
२. माझ्यातील गुणांचा उपयोग मी साधनेसाठी करतो की बंधनांसाठी?
३. शब्दांच्या पलीकडे जाऊन त्यामागील भाव आणि अर्थ समजून घेण्याचा मी प्रयत्न करतो का?
४. श्रीरामांचा “अनंत मार्ग” हा माझ्यासाठी बाहेरचा आहे की अंतर्मनातून सुरू होणारा?
(क्रमशः)
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
४/२/२०२६
प्रतिक्रियेसाठी : ९४०३७४९९३२
(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा