मुख्य सामग्रीवर वगळा

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक – भाग ८

 उगवतीचे रंग

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक – भाग ८

देहे त्यागिता कीर्ति मागे उरावी |

मना सज्जना हेची क्रीया धरावी |

मना चंदनाचे परी त्वां झिजावे |

परी अंतरी सज्जना नीववावे |८|

अर्थ : हे मना ( सज्जन माणसा ), तुझी वागणूक अशा प्रकारे असू दे की मृत्यू पावल्यानंतरही तुझी कीर्ती मागे राहील. सुगंध देण्यासाठी चंदन ज्याप्रमाणे स्वतःला झिजवते अशाच प्रकारे तू देखील इतरांसाठी झिजून सज्जनांना संतोष होईल अशा प्रकारे वागावे. 

माणसाचा देह नाशिवंत आहे. जो जन्माला आला त्याला एक दिवस मृत्यू निश्चित आहेच. जीवन आणि मृत्यू यांच्या दरम्यानचा कालावधी म्हणजे आपले आयुष्य. एखादी व्यक्ती किती जगली यापेक्षाही ती कशी जगली हे अधिक महत्त्वाचे. शंभर वर्षांचे दीर्घायुष्य मिळवून आपले आयुष्य मौजमजेत घालवणाऱ्या व्यक्तीपेक्षा अल्पायुष्य लाभलेल्या परंतु इतरांच्या सेवेत आपले जीवन घालवणाऱ्या व्यक्तीचे जीवन कधीही श्रेष्ठ ! स्वामी विवेकानंदांना उणेपुरे चाळीस वर्षांचे आयुष्य लाभले परंतु या आयुष्यात त्यांनी जी मानवतेची सेवा केली ती अनेक जन्म घेऊनही इतरांना करणे कठीण आहे. आपले आयुष्य सत्कारणी लावायचे असेल तर त्यासाठी इतरांसाठी झिजण्याची तयारी हवी.  एक सुंदर मराठी गीत आहे...

आनंद या जीवनाचा, सुगंधापरी दरवळावा

गाण्यातला सूर जैसा ओठांतुनी ओघळावा

झिजूनी स्वतः चंदनाने

दुसर्‍यास मधुगंध द्यावा...

शीतलता आणि सुगंध हे चंदनाचे गुण आहेत. ते इतरांना देण्यासाठी ते स्वतः झिजत असते. चंदन रोज सहाणेवर थोडे थोडे उगाळले जाते. असे करताना त्याची झीज होत असते. परंतु ही झीज सोसून ते इतरांना सुगंध आणि शीतलता प्रदान करते. आपण असेही म्हणतो की जे हात इतरांना सुगंध वाटतात, त्या हातांनाही सुगंध येतो. तो गंध त्यांना आपोआप प्राप्त होतो. 

इतरांसाठी काही करायचे तर फक्त एक दिवस झिजून चालत नाही. ती सवय व्हावी लागते, वृत्तीला तसे वळण लावावे लागते. म्हणूनच समर्थ म्हणतात मना सज्जना हेचि क्रीया धरावी. अशा प्रकारचे सेवेमध्ये सातत्य असावे लागते. अशा प्रकारचे सातत्य जर आपल्या सेवेत आणि वागण्याबोलण्यात असेल तर त्यामुळे सज्जन म्हणजे समाजातील सदाचरणी लोक प्रसन्न होतात, संतुष्ट होतात. 

समाजातील बऱ्याच लोकांकडे सत्ता आणि संपत्ती असते. त्यातील काही लोक आपल्या सत्तेच्या आणि संपत्तीच्या बळावर विविध संस्थांना देणग्या देऊन आपले नाव द्यायला लावतात. विविध प्रकारे प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात. तशी ती त्यांना काही काळ मिळते देखील. इमारतीच्या फलकांवर किंवा दगडांवर त्यांचे नाव कोरले गेलेले असते. तरीदेखील काही काळानंतर अशा व्यक्ती विस्मृतीत जातात. परंतु कोणत्याही प्रकारचा स्वार्थ किंवा प्रसिद्धीची हाव न धरता जे सातत्याने समाजासाठी झिजत असतात, अशा व्यक्तींचे नाव समाज कायम आदराने घेत असतो. अशा व्यक्तींचे नाव समाजाच्या मनात कोरले जाते. त्याला कायमस्वरूपी आदराचे स्थान असते. अहिल्याबाईंनी आपला राज्यकारभार करत असताना समाजासाठी घाट बांधले, अन्नछत्रे पाणपोया उभारल्या. यासारखी विविध प्रकारची कामे केली आणि त्यासाठी पैसा खर्च केला. त्यामुळे आपण आजही त्यांचे नाव आदराने घेतो. इतरांची नावे विसरली जातात. म्हणूनच त्यांची कीर्ती आजही जिवंत आहे.

समर्थांचा संदेश स्पष्ट आहे —

कीर्ती मागे राहावी असे वाटत असेल तर आयुष्य इतरांसाठी झिजवले पाहिजे. आणि हे झिजणे एकदाच नव्हे, तर वृत्ती म्हणून अंगीकारले पाहिजे.

“मना सज्जना हेचि क्रीया धरावी” —

ही कृती, ही वृत्ती, ही सातत्यपूर्ण सेवा — हाच खरा साधनेचा मार्ग आहे.

स्वसंवाद

• मी केवळ स्वतःसाठी जगतो आहे की इतरांसाठी झिजून त्यांनाही आनंद देण्याचा प्रयत्न करतो आहे ?

• माझ्या कृतींमागे प्रसिद्धीची अपेक्षा आहे का, की निखळ सेवाभाव ?

• हा सेवाभाव मी एक वृत्ती म्हणून अंगीकारला आहे का ?

• माझ्या वागण्याने किंवा सेवाभावाने समाजातील सज्जन किंवा सदाचरणी लोक संतुष्ट होतात का ?

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव

२५/०२/२०२६

प्रतिक्रियेसाठी : ९४०३७४९९३२

(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...