मुख्य सामग्रीवर वगळा

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक – भाग ७

 उगवतीचे रंग

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक – भाग ७

मना श्रेष्ठ धारिष्ट्य जीवी धरावे |

 मना बोलणे नीच सोशीत जावे |

स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे |

मना सर्व लोकांसि रे निववावे |७ |

अर्थ : हे मना तू धीराचा अंगीकार कर म्हणजेच तुझ्या ठायी धैर्य असू दे. लोकांनी निंदा किंवा टीका केली तरी ती सहन कर. बोलताना नेहमी नम्रतेनेच बोल आणि आपल्या बोलण्याने आणि वागण्याने लोक संतुष्ट होतील असे वाग.

या श्लोकात समर्थांनी मनाला फार सुंदर उपदेश केला आहे. तो लक्षात घेण्याआधी मागील श्लोकाचा संदर्भ घेऊया. मागील श्लोकात समर्थ म्हणतात," साधकाने काम क्रोध मोह इत्यादी विकारांपासून दूर राहिले पाहिजे." अर्थात हे दूर राहणे सोपे नाही. त्यासाठी काय करायला हवे ते समर्थ या श्लोकात आपल्याला सांगतात. समर्थ म्हणतात, "आपण धैर्याचा अंगीकार करायला हवा. जीवनामध्ये अनेक संकटे येतात, मोहाचे प्रसंग येतात, आपली परीक्षा पाहणारे प्रसंग येतात. या सगळ्या प्रसंगामध्ये आपले मानसिक धैर्य टिकवून ठेवणे आवश्यक असते. ही एक प्रकारची साधना आहे जी सरावाने जमू शकते. 

ज्याला प्रवाहविरुद्ध पोहायचे आहे आणि काही विशेष कर्तृत्व करून दाखवायचे आहे, त्याच्या अंगी धैर्य तर हवेच ! छत्रपती शिवाजी महाराजांना लढाईमध्ये काही वेळा माघारही घ्यावी लागली. प्रत्यक्ष श्रीकृष्णाला देखील रणांगणातून पळ काढावा लागला. स्वामी विवेकानंदांना देखील अनेक समस्यांचा, टीकेचा, नींदेचा सामना करावा लागला. परंतु या सगळ्या महापुरुषांनी कठीण परिस्थितीतही आपले धैर्य टिकवून ठेवले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यासारख्या संतांना तर केवढी लोकनिंदा सहन करावी लागली परंतु  आपण अंगीकारलेले समाजप्रबोधनाचे कार्य ते करीतच राहिले. 

अशा महापुरुषांना निंदा आणि स्तुती, सुख आणि दुःख समान असतात. त्यामुळे ते विचलित होत नाहीत. रामाला राज्याभिषेक होणार होता. तो त्याच्या जीवनातील अत्यंत आनंदाचा प्रसंग होता. परंतु दशरथाने कैकयीला दिलेल्या वरामुळे त्याला वल्कले धारण करून वनवासात जावे लागले. परंतु याही परिस्थितीत त्याने आपले धैर्य आणि आनंदी वृत्ती सोडली नाही. आणि अशाही परिस्थितीत भरताला माता कैकयीकडे दुर्लक्ष करू नकोस असे सांगण्यास तो विसरला नाही. म्हणूनच महापुरुषांचे जीवन म्हणजे दीपस्तंभ असतात. कोणत्या परिस्थितीत कसे वागावे याचा वस्तूपाठ ते आपल्याला घालून देतात. म्हणूनच ते गुण अगदी धारण करण्यासाठी समर्थ आपल्याला तोच उपदेश करतात.

माणसाला स्तुती आवडते परंतु जेवढ्या सहजतेने आपण स्तुतीचा स्वीकार करतो तेवढ्याच सहजतेने निंदेचा करू शकत नाही. त्यासाठी धैर्य लागते. म्हणूनच समर्थ म्हणतात मना बोलणे नीच सोशीत जावे. या ठिकाणी धैर्याचा आणि टीका सहन करण्याचा दुसराही एक अर्थ घेता येईल. तो म्हणजे मनावर संयम राखणे, प्रतीक्षा करणे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही एक काळ असा येतो की त्या प्रसंगामध्ये त्याला मनावर संयम ठेवून कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागते. आजच्या पिढीत हा संयम, हे धैर्य कमी होताना दिसते आहे. तरुण अपयशाचा स्वीकार आणि अपमानाचा सामना सहजपणे करू शकत नाहीत. जी गोष्ट आपल्याला हवी आहे ती मिळायलाच हवी ती नाही मिळाली तर ते एक तर खचून जातात किंवा हिंसक बनतात. अशी अनेक उदाहरणे आपण व्यवहारात पाहतो. म्हणूनच धैर्य अंगीकारणे, अपमान सहन करणे याचे प्रशिक्षण मनाला देणे आवश्यक आहे. ती वृत्ती अंगी बाणवावी लागते. मुलांना सुद्धा आई-वडिलांनी कठीण परिस्थितीचा सामना करणे, संकटात खचून न जाणे आणि अपयश आले तरी त्यातून पुन्हा उभे राहण्याची हिंमत ठेवणे या गोष्टी शिकवायला हव्यात. क्रिकेटसारख्या किंवा अन्य खेळांमधूनही अशा प्रकारची वृत्ती आपल्याला शिकायला मिळते. एखादा सामना हरला तरी निराश न होता, खेळाडू पुढचा सामना कसा जिंकता येईल त्या तयारीला लागतात. या सगळ्या गोष्टींमध्ये यश आणि अपयश सहजपणे कसे स्वीकारायचे याचे सुंदर शिक्षण आपल्याला मिळते.

जीवनामध्ये वागताना नम्रतेने बोलणे आवश्यक आहे. तसे संस्कार लहानपणापासून व्हायला हवेत ओल्या मातीच्या गोळ्याला हवा तसा आकार देता येतो म्हणूनच पालकांनी तसे आपल्या मुलांना संस्कार द्यायला हवेत. ही नम्रता आतून घ्यायला हवी. ती मनाची वृत्ती व्हायला हवी. बऱ्याच वेळा आजच्या कार्पोरेट जगामध्ये काही लोक कृत्रिम नम्रता किंवा विनय धारण करताना दिसतात. परंतु त्या गोष्टी मनापासून नसतील तर त्या गोष्टी म्हणजे एक प्रकारचे ढोंगच !

 श्रीकृष्ण, श्रीराम यांचे सर्वांशी वागणे-बोलणे कसे होते हे पालकांनी गोष्टीतून मुलांना शिकवायला हवे. त्यांच्याजवळ ज्ञान होते, सामर्थ्य होते. परंतु तरी देखील त्यांनी आपली नम्रता सोडली नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात," नम्र झाला भुता, त्याने कोंडीले अनंता." त्याचे तात्पर्य हेच आहे. आपल्या बोलण्याने दुसऱ्याचे समाधान झाले पाहिजे, दुसरी व्यक्ती संतुष्ट झाली पाहिजे अशा पद्धतीने बोलता आले पाहिजे. आपले म्हणणे दुसऱ्याला न दुखवता देखील उत्तम पद्धतीने सांगता येते. या गोष्टी वरील महापुरुषांच्या उदाहरणांकडे पाहिले तर आपल्या सहज लक्षात येतात.

या श्लोकात समर्थांनी धैर्य, संयम, नम्रता आणि गोड बोलणे ही आपल्या जीवनाला दिशा देणारी चतु:सूत्री दिली आहे. ती आपण लक्षात घ्यायला हवी.

स्वसंवाद

• संकटसमयी माझे मन स्थिर राहते का, की लगेच खचते ?

• टीका झाली तर मी संतुलित राहू शकतो का ?

• माझ्या वागण्या, बोलण्यात नम्रता आणि सौजन्य आहे का ?

• माझ्या बोलण्याने लोक संतुष्ट होतात का ?

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

२३/२/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...