मुख्य सामग्रीवर वगळा

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग - ५

 उगवतीचे रंग

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक  भाग - ५

मना पापसंकल्प सोडून द्यावा | 

मना सत्यसंकल्प जीवी धरावा |

मना कल्पना ते नको विषयांची |

विकारी घडे हो जनी सर्व ची ची |५ |

अर्थ : समर्थ मनाला बजावत आहेत की हे मना तू पापसंकल्प ( वाईट विचार )सोडून दे आणि त्या जागी सत्यसंकल्पांना ( सद्विचार किंवा परमात्मास्वरूपाचे ज्ञान ) स्थान दे. हे मना तू विषयांची कल्पना देखील करू नकोस कारण विषयातून नाना प्रकारचे विकार निर्माण होतात. आणि मग तशा प्रकारची कृत्ये हातून घडतात. त्यामुळे लोकांमध्ये छी थू होते.

आधीच्या श्लोकात समर्थ म्हणतात," मना अंतरी सार विचार राहो " मग मनामध्ये हे सार विचार म्हणजेच चांगले विचार कायमस्वरूपी राहावेत म्हणून काय करायला हवे ते समर्थ आपल्याला या श्लोकात सांगतात. त्यासाठी सुरुवातीला पापसंकल्प म्हणजे आपल्या मनातील वाईट विचारांचा त्याग करावा लागेल. प्रत्येकाच्या मनात चांगले वाईट असे विचार येतच असतात. त्यातही वाईट विचार लवकर येतात आणि ते नैसर्गिक असते. मग असे विचार घालवले तर त्या जागी दुसरे काहीतरी हवे कारण रिकामे मन हे सैतानाचे घर असते असे आपण म्हणतो. म्हणून समर्थ म्हणतात की पापसंकल्प म्हणजे वाईट विचारांचा त्याग केल्यानंतर मनामध्ये सत्यसंकल्पांना म्हणजे चांगल्या विचारांना स्थान द्यावे. आपले मन म्हणजे सुपीक जमीन अशी कल्पना केली तर त्यामध्ये जशा विचारांचे बीज आपण पेरू तसे ते उगवतील, अनेक पटींनी उगवतील. म्हणूनच त्यात सद्विचारांची पेरणी करावी आणि वाईट विचारांचे तण उपटून टाकावे.

पापसंकल्प आणि सत्यसंकल्प या दोन्ही शब्दात ' संकल्प 'हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. संकल्प म्हणजे आपल्याला पुढे जे काही करायचे आहे त्याचा विचार आणि उच्चार मनाशी करणे होय. जेव्हा आपण एखादे धार्मिक कार्य करतो तेव्हा सुरुवातीला गुरुजी आपल्या हातून त्याचा संकल्प सोडतात. म्हणजेच ते कार्य निर्विघ्नपणे पार पडावे आणि त्याचे परिणामस्वरूप फळ आपल्याला मिळावे असा त्यामागील हेतू असतो. नवीन वर्षात किंवा आपल्या वाढदिवसाच्या दिवशी देखील आपण संकल्प करत असतो. विद्यार्थी अभ्यासाचा, उत्तम शरीर प्रकृती कमावण्याचा निश्चय करतात. हे संकल्प साधारणपणे चांगलेच असतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा संकल्प सोडला होता आणि मग तशी कृती त्यांच्या हातून घडली आणि त्यांच्या संकल्पास मूर्त रूप आले.आधी मनात विचार येतो, त्याप्रमाणे आपल्या जिभेवर ते शब्द येतात आणि नंतर त्याप्रमाणे कृती घडते. म्हणजे विचार, उच्चार आणि आचार ही संकल्पमागील त्रिसूत्री आहे असे म्हणता येईल. मग लौकिक व्यवहारात जर संकल्प एवढा आवश्यक आणि महत्वाचा असेल तर मग अध्यात्मात तर हवाच हवा. 

पण असे संकल्प करण्यासाठी मनाचा निर्धार लागतो. त्यासाठी वाईट विचारांचा, कुबुद्धीचा त्याग करावा लागतो आणि त्या जागी सद्विचारांना जाणीवपूर्वक स्थान द्यावे लागते. हे करणे सोपे नाही. त्यासाठी  मनावर नियंत्रण ठेवण्याची सवय लावावी लागते. माणसाचे मन हे नेहमी विषयांकडे ओढ घेते. मनाचे विषय, बुद्धीचे विषय आणि इंद्रियांचे विषय माणसाला आकर्षित करत असतात. इथे विषय या शब्दाचा अर्थ वासना ( इच्छा )असा घेता येईल. निरनिराळ्या प्रकारच्या वासना आपल्याला आकर्षित करून त्यांच्याकडे ओढत असतात. आपण त्या वासनांना बळी पडतो. म्हणजे आधी विचार येतो, मग आपल्या मुखात तशा गोष्टी येतात आणि नंतर तशी कृती घडते. तसे होऊ नये म्हणून समर्थ आधीच बजावतात की विषयांची कल्पनाच करू नये. एकदा का विषयांची कल्पना म्हणजे त्या विषयांना मनामध्ये स्थान दिले तर त्यांना बळ मिळत जाते आणि मग माणसाची कृती त्याप्रमाणे होते. काम, क्रोध, लोभ, मोह इ. षडविकार आहेत. माणूस विषयाधीन झाला किंवा वासना आणि विकारांना बळी पडला तर समाजामध्ये त्याची छी थू होते, तो माणूस म्हणवून घेण्याच्या लायकीचा राहत नाही. 

श्रीरामांनी जीवनात संयमाला स्थान दिले आणि मर्यादांचे पालन केले म्हणूनच ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत. रावण विद्वान होता, शूर होता, ज्ञानी होता पण तो विकारांना बळी पडला आणि त्यामुळे त्याचे अध:पतन झाले. आपण संयमाची मूर्ती असलेल्या आणि मर्यादापुरुषोत्तम असलेल्या श्रीरामांचे पूजन करतो, रावणाचे नाही. म्हणूनच विषयांची कल्पना देखील नको असे समर्थ म्हणतात.

 आपल्यासारख्या सामान्य आणि संसारी माणसाच्या मनात साहजिकच प्रश्न येईल की मग विषय भोगायचेच नाहीत का? जीवनाचा आनंद घ्यायचा नाही का ? अशा प्रसंगी श्रीरामांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवावा. श्रीरामांनी जीवनाचा आनंद घेतला परंतु त्यासाठी धर्माने जी मर्यादा आखून दिली आहे, तिचे त्यांनी पालन केले. म्हणून आपल्या धर्मात, संस्कृतीत जे मान्य असेल त्याचा संयमितपणे उपभोग आपण घेऊ शकतो. आणि ते करत असताना सत्यसंकल्पाकडे म्हणजे परमेश्वराच्या प्राप्तीकडे आपली वाटचाल करू शकतो. हल्ली जग जवळ आले आहे. द वर्ल्ड इज अ ग्लोबल व्हिलेज असं आपण म्हणतो. पण प्रत्येक देशाच्या चालीरीती, संस्कृती निराळी असते. ते पाहिल्यानंतर आपल्याकडील नीतिमत्तेच्या कल्पना आपल्याला चुकीच्या वाटू शकतात. परंतु जिथे जसे वागणे योग्य असते तसेच वागायला हवे. इतर ठिकाणी अमुक अमुक गोष्ट मान्य आहे म्हणून आपण इकडेही तसं करायला काय हरकत आहे असा सोयीस्कर विचार आपल्या मनात येऊ शकतो. कारण मनाची धाव विषयांकडेच असते. पण ती गोष्ट आपल्या धर्मात, संस्कृतीत किंवा नीतिमत्तेच्या कल्पनेत बसते का याचा विचार करायला हवा. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय अशी आपली वाटचाल जीवनामध्ये असले पाहिजे. हेच या ठिकाणी समर्थांना सांगायचे आहे.

संकल्प जसा असेल, तसे जीवन घडते. म्हणून समर्थ प्रथम मनाला शुद्ध करण्याचा आग्रह धरतात. मन शुद्ध झाले की मार्ग आपोआप प्रकाशमान होतो; सत्यसंकल्पातूनच श्रेयसाचा प्रवास सुरू होतो.

स्वसंवाद

• माझ्या मनात वारंवार येणारे विचार कोणत्या प्रकारचे असतात ?

• मी जाणीवपूर्वक सत्यसंकल्प करून तो पाळण्याचा प्रयत्न करतो का ?

• माझे विचार, शब्द आणि कृती यांमध्ये सुसंगती आहे का?

• विषयांच्या आकर्षणामुळे मी कधी माझ्या मूल्यांशी तडजोड करतो का?

• माझ्या जीवनसंकल्पाची दिशा केवळ यशाकडे आहे की मानसिक आणि अध्यात्मिक उन्नतीकडेही ?

(क्रमशः)

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव

१८/२/२०२६

प्रतिक्रियेसाठी : ९४०३७४९९३२

(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा)




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...