मुख्य सामग्रीवर वगळा

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ४

 उगवतीचे रंग

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक  भाग - ४

मना वासना दुष्ट कामा नये रे |

मना सर्वथा पापबुद्धि नको रे |

मना धर्मता नीती सोडू नको हो |

मना अंतरी सार विचार राहो ||४||

अर्थ :

हे मना, दुष्ट वासना, अहितकारक इच्छा मनात येऊ देऊ नकोस. पापबुद्धीला स्थान देऊ नकोस. धर्म आणि नीती कधीही सोडू नकोस. अंतर्यामी जे खरे, श्रेष्ठ आणि शाश्वत आहे त्याचाच विचार नांदू दे.

मनाच्या श्लोकांची एक साखळी आहे. मागील श्लोकात समर्थांनी सांगितले—“सदाचार हा थोर सांडू नये तो.”या  श्लोकात ते त्या सदाचाराची अंतर्गत पायाभरणी स्पष्ट करतात. सदाचार बाह्य वर्तनातून दिसतो खरा; पण त्याची सुरुवात मनातून होते. आधीच्या श्लोकात समर्थ म्हणतात, "गमू पंथ अनंत या राघवाचा." एक वेळ भ्रष्टाचार, अनितीने वागणे हे लौकिक व्यवहारात खपून जाईलही पण राघवाच्या पंथावर चालायचे तर मनामध्ये वाईट विचार आणि अनितीची वागणूक कशी बरं चालेल ?

मन अत्यंत चंचल आहे. तेच आपले मित्र आणि तेच आपले शत्रू. म्हणूनच आपण म्हणतो “मन चिंती ते वैरी न चिंती.” कधी कधी मनात येणारे विचार इतके तीव्र, भयंकर आणि नकारात्मक असतात की आपण स्वतःच दचकतो. पण असे विचार येणे ही मानवी प्रवृत्ती आहे; त्या विचारांना आपण पोषक खाद्य पुरवायचे की ते सोडून चांगले विचार जाणीवपूर्वक जोपासायचे हे आपल्या हातात आहे.

वाईट विचार मनात येण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत. ते सहज येतात. दूरदर्शनवरील धारावाहिक, हिंसाचार आणि भडक प्रणयदृश्ये असलेले चित्रपट, समाजमाध्यमे अशा विचारांना हातभारच लावतात. परंतु चांगले, उन्नत, हितकारक विचार जाणीवपूर्वक जोपासावे लागतात. हीच साधना आहे. पूर्वी मोठी माणसे सांगत,"चांगले बोला. आपल्या भोवती देवतांचा वास असतो त्या देवता तथास्तु म्हणत असतात." दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर शब्दांनाही शक्ती असते. आपले विचार, शब्द आणि कृती यांचा परस्पर संबंध असतो. आपण जे वारंवार चिंततो, तेच आपण बोलतो; आणि जे बोलतो, ते आचरणात उतरते. म्हणूनच सद्विचारांचा जागर करणे ही सदाचाराची पहिली पायरी आहे.

आपल्यासमोर दोन वाटा असतात. त्या म्हणजे श्रेयस आणि प्रेयस. श्रेयस म्हणजे दीर्घकालीन हित आणि मूल्याधिष्ठित निवड असे म्हणता येईल. तर प्रेयस म्हणजे तात्कालिक सुख, आकर्षक वाटणारे पण शेवटी अहितकारक ठरणारी निवड.

तात्पुरत्या लाभासाठी अनैतिक मार्ग स्वीकारणे, सहजसोप्या सुखासाठी मूल्यांचा त्याग करणे ही प्रेयसाची उदाहरणे. पण कठीण असले तरी योग्य मार्ग स्वीकारणे, इतरांच्या आनंदात आनंद मानणे, मदतीचा हात पुढे करणे हे श्रेयसाचे लक्षण.

समर्थ म्हणतात,“मना धर्मता नीती सोडू नको हो.” धर्मता म्हणजे धर्माचरण. पण धर्माचरण म्हणजे केवळ धार्मिक आचार नव्हे; तर न्याय, प्रामाणिकपणा, जबाबदारी आणि संवेदनशीलता. नैतिकेने वागण्याची जबाबदारी. परस्त्रीला मातेसमान किंवा बहिणीसमान मानले पाहिजे असं काही कायदा सांगत नाही. परंतु भारतीय संस्कृतीने सांगितलेली नीतीमूल्ये आचरणात आणायची ठरवली तर आपल्याला सुरुवात तिथूनच करावी लागेल. असे झाले तर अनेक अनर्थ टळतील. 

नीती म्हणजे आचरणातील सुसंगती. सज्जनांनी घालून दिलेल्या मार्गावर वाटचाल करणे. आजच्या काळात प्रसारमाध्यमे, सामाजिक वातावरण, स्पर्धेची धडपड या सर्वांचा परिणाम मनावर होत असतो. कधी कधी अनैतिक मार्गाने यश मिळताना दिसते. मग मन म्हणते, “ मीच कशाला चांगले वागू ? माझ्यामुळे असा काय फरक पडणार आहे ?" पण समाजाचा पाया हा प्रत्येकाच्या व्यक्तिगत नीतीवर उभा असतो. आपला छोटा तडजोडीचा निर्णयही मोठ्या अध:पतनाची सुरुवात ठरू शकतो.

या श्लोकात समर्थ पुढे म्हणतात, “मना अंतरी सार विचार राहो.” सार म्हणजे जे खरे, टिकाऊ, मूल्याधिष्ठित आहे ते.

क्षणिक लाभ, राग, द्वेष, मत्सर—हे असार.

प्रेम, करुणा, प्रामाणिकपणा, संयम—हे सार.

आपली वाटचाल प्रेयसकडून श्रेयसकडे व्हावी, हीच समर्थांची अपेक्षा आहे. मोठ्या प्रतिज्ञेपेक्षा छोटा पण सातत्यपूर्ण प्रयत्न अधिक प्रभावी असतो. मनावर कठोर बंधने लादण्यापेक्षा छोट्या, पाळता येतील अशा नियमांनी सुरुवात केली तर संस्कार हळूहळू दृढ होतात. श्रेयसाचा मार्ग हा टप्प्याटप्प्याने चालायचा असतो. मन जसे घडवू, तसे जीवन घडते. म्हणूनच समर्थांचे हे आवाहन केवळ उपदेश नाही; ती अंतःकरण शुद्धीची दिशा आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर स्वतःशी थोडा संवाद साधू या.

स्वसंवाद

१. माझ्या मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांना मी ओळखून त्यांच्यावर संयम ठेवतो का?

२. तात्कालिक फायद्यासाठी मी कधी माझ्या मूल्यांशी तडजोड करतो का?

३. माझ्या निर्णयांत श्रेयस अधिक आहे की प्रेयस?

४. ‘सार विचार’ मनात टिकून राहावेत यासाठी मी रोज काय करतो?

(क्रमशः)

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव

१५/२/२०२६

प्रतिक्रियेसाठी : ९४०३७४९९३२

(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...