मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक - एक सार्वकालिक 'मनोपनिषद' ( भाग १ )

उगवतीचे रंग

मनाचे श्लोक - एक सार्वकालिक 'मनोपनिषद' (प्रास्ताविक भाग १ )

​अनेक दिवसांपासून मनाच्या श्लोकांवर काहीतरी लिहावे अशी माझी इच्छा होती. परंतु समर्थांच्या प्रचितीतून आणि अनुभवातून आलेले हे दिव्य श्लोक ! त्यावर खरोखरीच मी काही लिहू शकेन किंवा तसे लिहिण्याची माझी पात्रता आहे का हाही प्रश्न माझ्या मनात होता. तो अजूनही आहे. परंतु तरीसुद्धा मला जसे सुचेल आणि आकलन होईल तसे त्यावर लेखन करावे असा कौल माझ्या मनाने मला दिला. जसे समर्थ म्हणतात ' कर्ता करविता राम आहे.' तसेच मी सुद्धा म्हणतो की हे माझ्याकडून लिहून घेणारे समर्थ आहेत त्यांच्या कृपेनेच मी काही थोडे बहुत लिहिण्याची हिंमत करतो आहे. काही चुकले तर ते मला सांभाळून घेतील आणि आपणही सुज्ञ वाचक मला सांभाळून घ्याल.

समर्थ रामदासांनी विपुल साहित्य रचना केली आहे. त्यामध्ये दासबोध, करुणाष्टके, आत्माराम, मनाचे श्लोक,  एकवीस समासी, मानपंचक, मानसपूजा अनेक देवी-देवतांची स्तोत्रे आणि आरत्या असे समृद्ध साहित्य आहे. या त्यांच्या साहित्यामध्ये प्रामुख्याने अध्यात्म विषयाचे प्रतिपादन केलेले असले तरी नानाविध विषय समर्थांनी हाताळले आहेत. त्यात प्रपंच, राजकारण, समाजकारण, व्यवस्थापन, कुटुंब नियोजन, अर्थकारण, निसर्ग आणि वनस्पती विज्ञान, संगीत यासारख्या अनेक विषयांवर साधकांना मार्गदर्शन केले आहे. या सर्व वाङ्मयातून समर्थांचा विविध विषयांचा प्रचंड व्यासंग दिसून येतो. 

त्यांच्या या सर्व वाङ्मयात मनाचे श्लोक हा एक अत्यंत लघु परंतु प्रभावी असा ग्रंथ आहे. तो एक अनमोल असा हिरा आहे जो आपल्या विलक्षण तेजाने झळाळून उठतो. साधी सोपी भाषा हे त्याचे वैशिष्ट्य आहे. ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तीयोग, सदाचार, सत्संग, सगुण निर्गुण, सुखदुःख, नाम आणि ध्यान यासारख्या अनेक विषयांना समर्थांनी या छोटेखानी ग्रंथात स्पर्श केला आहे. मनाच्या श्लोकांना मनोबोध असेही म्हटले जाते. विनोबा भावेंनी तर त्याला मनोपनिषद असे सार्थ नाव दिले आहे.

मनाचे श्लोकात समर्थांनी प्रत्येक विषयाचे तर्कशुद्ध थोडक्यात विश्लेषण केले आहे. व्याकरणदृष्ट्या सुद्धा हा ग्रंथ परिपूर्ण आहे. यातील श्लोक भुजंगप्रयात या वृत्तात लिहिले गेले असून ते सुरेख असे चालीवर म्हणता येतात हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. मनाच्या श्लोकांचा अनेक भाषांमध्ये अनुवाद देखील झाला आहे. 

समर्थांचे दासबोध हे महाकाव्य तर प्रसिद्धच आहे परंतु सर्वांनीच दासबोध वाचला असेल असे काही सांगता येत नाही. परंतु ज्याला ज्याला मराठी येते त्याला लहानपणापासूनच मनाच्या श्लोकांचा परिचय असतो. कोणत्या ना कोणत्या मार्गाने मनाचे श्लोक लहानपणापासून  सतत त्याच्या कानावर पडत असतात. अशाच प्रकारचा मनाच्या श्लोकांचा प्रभाव लहानपणापासून माझ्यावरही आहे. लहानपणी मी ते पाठ केले आणि आजपर्यंत ते वेगवेगळ्या प्रसंगी ऐकत आलो. लहानपणी ते पाठ करायचे म्हणून केले होते परंतु त्यांचा अर्थ फारसा कळत नव्हता. आताही तो फार कळतो आहे अशातला भाग नाही. परंतु जीवन जगण्यासाठी या मनाच्या श्लोकांची फार मोठी मदत आपल्याला होऊ शकते एवढी गोष्ट मात्र माझ्या लक्षात आली आणि त्याच उद्देशाने हा मनाच्या श्लोकांवर लिहिण्याच्या लेखमालेचा प्रपंच आरंभला आहे.

मनाचे श्लोकांचे वैशिष्ट्य म्हणजे कोणताही उपवास किंवा जपजाप्य यात सांगितले नाही. कोणत्याही कठोर नियमांचे पालन करायचे नाही.  हा आपल्या स्वतःच्या मनाला केलेला उपदेश आहे. आपले मनच आपला मित्र किंवा शत्रू असते. प्रपंच असो किंवा परमार्थ तो करण्यासाठी आपले मन आपल्याला अनुकूल असावे लागते. बहिणाबाई म्हणतात,' मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर.' मन हे अतिशय चंचल आहे म्हणूनच अशा या मनाला समर्थांनी उपदेश केला आहे. मनाला आजार झाला असेल तर औषध मनालाच द्यावे लागते. म्हणूनच समर्थांनी जनसामान्यांच्या कल्याणासाठी हा मनाच्या श्लोकांचा प्रपंच केला असे म्हणता येईल.

मराठी साहित्यातील आणि संतकाव्यातील 'मनाचे श्लोक' हे केवळ आध्यात्मिक काव्य नसून, ते मानवी मनाला उन्नत करणारे एक प्रगत ' मानसशास्त्र ' आहे. १७ व्या शतकात समर्थ रामदास स्वामींनी रचलेले हे २०५ श्लोक आजही तितकेच प्रस्तुत वाटतात, याचे मुख्य कारण म्हणजे यात केवळ परमार्थाची चर्चा नसून हे ' मनावर ' विजय मिळवण्याचे प्रयोगात्मक शास्त्र आहे.

​मला नेहमी प्रश्न पडतो की, समर्थांनी मनाला उद्देशून बोलताना ' मना सज्जना ' अशी साद का घातली असावी ? पण आपण मनाचे श्लोक जेव्हा वाचतो किंवा अभ्यासतो तेव्हा लक्षात येते की समर्थ रामदासांचा मानवी मनाचा अभ्यास खूप मोठा आहे. आपले मन हे अत्यंत चंचल आहे. ते जसे अधोगतीला नेऊ शकते, तसेच ते मोक्षाचा मार्गही प्रशस्त करू शकते. म्हणूनच समर्थांनी मनाला ' सज्जन ' संबोधून प्रथम त्याच्यातील सात्विकतेला जागृत केले आहे. आपल्याकडे घरात आई-वडील जेव्हा मुलांना समजून सांगतात तेव्हा शहाणी मुले असं करत नाहीत असं म्हणतात म्हणजेच ते शहाणा म्हणून आपल्यातील चांगुलपणाला आवाहन करतात. समर्थांनी देखील आपल्या मनाला तशाच प्रकारचे आवाहन केले आहे.

​समर्थांच्या या रचनेला मला या ' मनोपनिषद ' म्हणणे अधिक योग्य वाटते, कारण उपनिषदांचा गाभा असलेल्या 'ब्रह्मविद्येला' समर्थांनी अत्यंत सोप्या भाषेत जनसामान्यांच्या उंबरठ्यापर्यंत आणले आहे. जिथे उपनिषदे 'तत्वमसि' (ते तूच आहेस) असा गहन संदेश देतात, तिथे समर्थ 'मना सज्जना राघवी वस्ति कीजे' असे सांगून त्या तत्त्वाची अनुभूती घेण्याचे साधन आपल्याला देतात. मनाला शिस्त लावणे, षडरिपूंवर विजय मिळवणे आणि विवेकाच्या साह्याने जगणे, ही या मनोपनिषदाची प्रमुख सूत्रे आहेत.

​या लेखमालेत आपण समर्थांच्या मनाचे श्लोक - मनोपनिषद या अजरामर कृतीचा धांडोळा घेणार आहोत. त्यातून आपल्या मनाचे नियमन कसे करावे, सात्विकतेचा ध्यास कशा प्रकारे घेता येईल आणि अध्यात्मिक उन्नतीचा मार्ग कसा प्रशस्त होईल हे समजण्यासाठी मदत होईल.

यात समर्थांनी केवळ भक्ती नाही, तर 'विवेक' (योग्य-अयोग्य निवडण्याची शक्ती) वाढवण्यावर भर दिला आहे. मनात चालणाऱ्या सुख-दुःख, आशा-निराशा यासारख्या द्वंद्वांवर कशी मात करावी हे यातून सांगितले आहे. तसेच परमेश्वर प्राप्तीचा किंवा साधनेचा सोपा मार्ग समर्थ या श्लोकातून आपल्याला सांगतात. कठीण योगाभ्यासापेक्षा 'नामस्मरण' आणि 'सदाचार' यातून मन शुद्ध होते यावर त्यांचा भर आहे. आजच्या काळात जेव्हा समाज स्वत्व विसरला आहे, नैतिक मूल्यांचा पाया डळमळीत झाला आहे अशा परिस्थितीत समाजाला नैतिक अधिष्ठान प्राप्त करून देण्यासाठी मनाच्या श्लोकांची फार मोठी मदत होऊ शकेल. ज्याप्रमाणे शरीर शुद्धीसाठी व्यायामाची गरज असते, तशी चित्तशुद्धीसाठी या श्लोकांची गरज आहे असे मला वाटते.  मनाच्या श्लोकातील प्रत्येक श्लोकाला सुभाषिताचे मोल आहे. आपण ठरवले तर प्रत्येक श्लोक हा एक  अमीट मानसिक संस्कार (Psychological Impression) होऊ शकतो. ( क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

१/२/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...