मुख्य सामग्रीवर वगळा

स्वप्न नवे पाहू...

 उगवतीचे रंग

स्वप्न नवे पाहू...

कॅलेंडरची पाने वाऱ्यावर फडफडतात. पक्षी उडून जावेत तसे दिवस, आठवडे आणि महिने भराभर निघून जातात. भिंतीवरच्या कॅलेंडरची पाने पलटत जातात. मंगेश पाडगावकरांच्या कवितेतील ओळी आठवतात.

 रंगांच्या रानात हरवले ते स्वप्नांचे पक्षी...

खरोखरच पक्षी उडून जावेत तसे भराभर महिने निघून जातात आणि वर्ष संपत येते. या गेलेल्या महिन्यांसोबत उडून जातात ते आठवणींचे पक्षी ! या आठवणींनाही रंग असतात. पक्ष्यांसारखे, फुलपाखरांच्या पंखावरील विविध रंगछटांसारखे ! रंग जसे विविध तशा आठवणी सुद्धा ! आठवणी गोड आणि कडू, सुखद आणि दुःखद. आठवणी मनावर हळुवार फुंकर घालणाऱ्या आणि आठवणी अनामिक भावनांच्या... वेढून टाकणाऱ्या. 

एखादी आठवण नको तेव्हा जखमेवरची खपली उचकटून काढते आणि मग रक्ताळलेल्या, वेदना देणाऱ्या आठवणी जाग्या होतात. पण दुसऱ्याही आठवणी असतातच की त्या मनाला आश्वस्त करतात, जखमेवरती मलमपट्टी करतात आणि सांगतात की असा दु:खी होऊ नकोस कारण हेही दिवस जातील.

तुमच्या आणि माझ्या आयुष्यातील अशी कितीतरी वर्षे फुलपाखरासारखी उडून गेली आहेत, आपल्या कडू गोड आठवणी मागे ठेवून ! पण प्रत्येक वेळी जेव्हा वर्ष संपत येते तेव्हा नव्या वर्षाची स्वप्ने मनात जागी होतात. घरातील प्रिय व्यक्तीच्या दूर जाण्याने जसे डोळ्यात नकळत पाणी येते, तसेही जाणारे वर्ष सुद्धा आपल्या डोळ्यांच्या कडा नकळत पाणावते. आठवत राहते यावर्षी केवढा तो पाऊस ! नद्या नाले दुथडी भरून वाहिलेले, अनेकांचे घर संसार उध्वस्त झाले. अनेकांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. पुन्हा आठवतात कुसुमाग्रजांच्या कणा कवितेतील ओळी....

सर पैसे नकोत

थोडा एकटेपणा वाटला.

मोडून पडला संसार 

 तरी मोडला नाही कणा 

पाठीवर हात ठेवून 

फक्त लढ म्हणा...!

या ओळी आपल्याला परिस्थितीशी सामना करण्याची शक्ती देतात.

हा पाऊस, हे वर्ष बरेच काही देऊन गेले आणि खूप काही घेऊन गेले. अनेकांचे सुहृद त्यांना सोडून गेले आणि नव्याने अनेक व्यक्ती जोडल्याही गेल्या. खरंतर सोडून गेलेल्या व्यक्ती किती आणि जोडल्या गेलेल्या आणि त्यानिमित्ताने आपल्या आयुष्यात नव्याने आलेल्या व्यक्ती किती असा हिशेब करायचा नसतो. करायची असते ती दुःखांची वजाबाकी आणि सुखाचा गुणाकार !

प्रत्येक नवीन वर्ष घेऊन येते नव्या आशा आणि नवी स्वप्ने ! क्षितिजाच्या उंबरठ्यावर सूर्यकिरणांच्या रूपाने स्वप्नांचे सोनेरी दूत उभे असतात. तुमच्या हाकेला ओ द्यायला ते तयारच असतात. फक्त तुम्ही किती मनापासून त्यांना हाक मारता त्यावर त्यांचे येणे अवलंबून असते. तुम्ही आनंदाने बोलवाल तर आनंदाने येतील आणि सोबत घेऊन येतील सुख, समृद्धी आणि आनंद सुद्धा ! अशा वेळी पुन्हा कुसुमाग्रजांच्या कवितेतील ओळी आठवत राहतात...

कशास आई भिजविसी डोळे 

उजळ तुझे भाल

रात्रीच्या गर्भात

 उद्याचा असे उषःकाल

रात्र आहे तर पहाट होणारच !अंधाराला भेदून सूर्यकिरणे येणारच ! हे सोनेरी कवडसे तुमच्या माझ्या दारात, खिडक्यांवर आणि घरात येणार. त्यांना मनातही प्रवेश करू द्या. आतला अंधार संपून जाईल. जाणारे वर्ष आणि येणारे वर्ष यात तुलना करा. मी कुठे आहे ? ये कहाँ आ गये हम, युहीं साथ चलते चलते...? पण तुलना दुसऱ्याशी करायची नाही. ती करायची ती आपल्या स्वतःशीच ! ताडून पाहायचं स्वतःला, जोखून पाहायचं स्वतःला आणि ठरवायचं मनाशी की खरोखरच भूतकाळापेक्षा वर्तमानातला मी अधिक समृद्ध झालो आहे का ? भावनांनी, विचारांनी...? केवळ पैशांनी नव्हे. नसेल तर मला त्यासाठी आणखी काय करायला हवं ? माझं कुठे चुकत आहे का ? हीच ती वेळ आत्मपरीक्षणाची ! म्हणून तर जरा विसावू या वळणावर...! 

जीवनाची गती खूप वाढली आहे. त्याबरोबर आपण वेगाने फरफटत जात आहोत. आपल्याला स्वतःसाठी देखील वेळ नाही. कुटुंबासाठी वेळ नाही. आयुष्याचा आनंद घ्यायचाच आपण विसरून जातो आहोत. जीवनातील छोट्या छोट्या आनंदाच्या क्षणांना पारखे होत आहोत. खरोखर इतकी ऊर फुटेस्तोवर धावपळ करण्याची गरज आहे का याचाही विचार करूया आणि क्षणभर थांबूया.

काल मी स्वप्नं पाहिली होती पण ती पूर्ण नाही झालीत. काही हरकत नाही पण प्रयत्न तर केलेत ना त्यासाठी ! म्हणून निराश व्हायचं नाही, घेतला वसा टाकायचा नाही. पुन्हा मोठी स्वप्नं बघायचीआणि त्यासाठी त्या वाटेवर चालत राहायचं, अविरत...! तुझको चलना होगा...

मला शेतकऱ्याचे उदाहरण फार आवडतं. शेतकरी कधी हताश,निराश होत नाही. यावर्षी निसर्गाने दगा दिला तरी पुढचं वर्ष नक्कीच चांगलं असेल ही त्याच्या मनामध्ये तीव्र आशा असते. तो उद्याची स्वप्न पाहणं थांबवत नाही. भविष्यात पीक चांगलं यावं म्हणून आज तो जमिनीची मशागत करतो, पेरणी करतो, पिकाची काळजी घेतो नको असलेले तण तणकूर काढून टाकतो. आपल्यालाही तसेच करायला हवं ना ! तरच उद्याचं उज्वल भविष्याचं पीक हाती येईल. त्यासाठी वर्तमान आपल्या हातात आहे.

नव्या वर्षाचे स्वागत करताना काही ओळी सुचतात...

स्वप्न नवे पाहू गड्यांनो 

स्वप्न नवे पाहू...

स्वागत करू या नववर्षाचे

पसरूनिया बाहू.


संकल्प नवे, स्वप्न नवे 

प्रयत्नांचे पर्व नवे

स्वतःला अजमावून पाहू

गड्यांनो स्वप्न नवे पाहू.


भूतकाळ तो विशाल दुर्धर

आठवणींनी करतो जर्जर

ओझे त्याचे मनावरचे

फेकुनिया देऊ,

गड्यांनो, स्वप्न नवे पाहू.


जातीपंथ ते विसरुन सारे 

मानवतेचे देऊ नारे

बंधुभावाची हाक चला देऊ

गड्यांनो स्वप्न नवे पाहू.

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

३०/१२/२०२५

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...