मुख्य सामग्रीवर वगळा

ज्ञानतपस्वी...

 उगवतीचे रंग

ज्ञानतपस्वी...

गुरुवर्य आबासाहेब अमृतकार हे आपल्या वयाची ८५ वर्षे पूर्ण करीत आहेत ही आम्हा सर्व शिष्यगणांसाठी आनंदाची गोष्ट आहे. माझ्यापेक्षाही अधिक वय असलेले आणि निवृत्त होऊन अनेक वर्ष झालेले त्यांचे विद्यार्थी आजही त्यांच्याबद्दल आदराने बोलतात. सरांची भेट झाली तर आदराने वाकून नमस्कार करतात. आपण म्हणतो की ज्या पायांवर डोके ठेवावे असे पाय आज दिसत नाहीत. परंतु आमचे गुरुवर्य आबासाहेब अमृतकार सर हे या वाक्याला अपवाद ठरावे असे व्यक्तिमत्व ! त्यांनी असे विद्यार्थी घडवले की ते विद्यार्थी या गुरुसमोर आपोआपच नतमस्तक होतात.

उंच, सडपातळ शरीरयष्टी, अंगावर साधेच पण स्वच्छ कपडे आणि चेहऱ्यावर विद्वत्तेचे तेज असे आमचे आबासाहेब त्यांनी वर्गात प्रवेश केला की वर्गातील मुले आपोआप शांत होत. आज त्यांच्याकडून नवीन काय ऐकायला मिळते किंवा शिकायला मिळते अशी उत्सुकता विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच असायची. विषय कोणताही असो तो विद्यार्थ्यांच्या पातळीवर जाऊन त्यांना समजेल अशा पद्धतीने शिकवणे यात आबासाहेबांचा हातखंडा. वाणी तर अतिशय शुद्ध. त्यांच्या आडनावात असलेल्या अमृत शब्दाप्रमाणेच त्यांची अमृतवाणी विद्यार्थ्यांची ज्ञानतृष्णा भागवत असे.

शाळेच्या आवश्यकतेप्रमाणे आबासाहेबांनी अनेक विषय शिकवले. त्यामध्ये मराठी, इंग्रजी, संस्कृत यासारख्या विषयांचा समावेश होता. कोणताही विषय केवळ पाठ्यपुस्तकापुरता त्यांनी शिकवला नाही. तो शिकवत असताना अवांतर माहिती देणे, ती माहिती देता देता विद्यार्थ्यांच्या मनावर चांगले संस्कार होतील अशा प्रकारची शिकवण देणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते.

शाळेमध्ये विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम नेहमीच साजरे होत. या कार्यक्रमांना आबासाहेबांची व्यासपीठावर आवर्जून उपस्थिती असायची. ते जेव्हा शिक्षक होते आणि नंतर अधिकारी झाले तेव्हाही ते व्यासपीठावर उपस्थित असायचे. अशा प्रसंगी विविध विषयांवर त्यांचे अभ्यासपूर्ण बोलणे ऐकणे ही उपस्थितांसाठी मेजवानीच असायची. त्यांनी बोलत रहावे आणि त्यांचे बोलणे संपू नये असे वाटत असायचे. त्यांच्या आवाजाची फेक लांबवर जात होती. ध्वनिक्षेपक नसला तरी त्यांचा आवाज अगदी शेवटी बसलेल्या विद्यार्थ्यापर्यंत सहज ऐकू जात असे. 

आपल्या सहकारी शिक्षकांचे कौतुक करणे, त्यांना प्रोत्साहन देणे यासारख्या गोष्टी ते सहज करत असत. एखादा नवीन लागलेला शिक्षक व्यासपीठावर एखाद्या विषयावर बोलायला आला तर त्याचे हमखास कौतुक आबासाहेबांकडून व्हायचेच. अशा शिक्षकाच्या बोलण्यात काही चुका असल्यास किंवा त्याला काही मार्गदर्शन करायचे असले तर तेही आबासाहेब आवर्जून करीत. परंतु ते सर्वांसमोर कधीच नाही. तर त्या व्यक्तीला ते आपल्या केबिनमध्ये बोलावून घेत, त्याला प्रेमाने बसायला सांगत बऱ्याचदा त्याच्यासाठी चहा देखील मागवत आणि मग बोलता बोलता सहजपणे त्याला मार्गदर्शन करीत अशी त्यांची समजावून सांगण्याची पद्धत होती. मुख्याध्यापक किंवा अन्य अधिकाऱ्यांनी एखाद्या शिक्षकाला बोलावले असेल तर आपले काही चुकले का अशी भीती त्याला वाटत असे. परंतु आबासाहेबांनी बोलावले असले तर अशी भीती कोणाला कधीच वाटली नाही. एखाद्या शिक्षकाला आपली काही अडचण किंवा समस्या विचारायची असेल, मार्गदर्शन हवे असेल तर त्यासाठी हक्काचे ठिकाण म्हणजे आबासाहेब अमृतकार सर !

शिक्षकांसाठी डीएड आणि बीएड अशी दोन प्रकारची प्रशिक्षणे असतात. परंतु त्यातून खरा शिक्षक घडतोच असे नाही. खरा शिक्षक हा अनुभवातून घडत जातो आणि अशा नवीन शिक्षकांना घडवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका असायची ती आबासाहेबांची ! नवीन शिक्षकांना विविध प्रकारे प्रोत्साहन देऊन, समजावून सांगून, कधी कधी त्यांच्यासमोर स्वतः पाठ घेऊन त्यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले आहे. 

सेवाकाळात शासनाच्या आणि शिक्षणखात्याच्या वतीने शिक्षकांसाठी विविध प्रकारची प्रशिक्षणे आयोजित केली जात असत. अशा प्रशिक्षणांमध्ये आबासाहेब नियमितपणे तज्ञ मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करीत असत. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ विविध अनुभवी, अननुभवी शिक्षक, मुख्याध्यापक आदींना होई. शिक्षणात आलेले नवनवीन विचारप्रवाह, पद्धती यांचा स्वीकार करून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कसे शिकवता येईल याचाच विचार त्यांच्या डोक्यात नेहमी असायचा. 

सुरुवातीला आम्हाला ते मराठी विषय शिकवायचे. पण त्यांचे मराठी शिकवणे केवळ पाठ्यपुस्तक शिकवण्यापुरते मर्यादित कधीच नसायचे. शिकवत असताना विविध प्रकारची माहिती मग ती त्या लेखाबद्दल असेल किंवा लेखकाबद्दल, कवीबद्दल असेल ते ती सांगत असत. त्यांच्या या शिकवण्याच्या पद्धतीमुळेच आम्हाला अवांतर वाचनाची गोडी लागली. त्यांनी शिकवलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कविता, बालकवींच्या कविता, किंवा मंगेश पाडगावकर बा भ  बोरकर, भा रा तांबे यासारख्या कवींच्या कविता आजही लक्षात आहे. त्या कवितांमधील सौंदर्य त्यांनी शिकवताना उलगडून दाखवले. इंग्रजी विषय शिकवण्यात तर सरांचा हातखंडा होता. इंग्रजीच्या तासाला सोप्या इंग्रजीतून ते पाठ किंवा कविता समजावून देत आणि विद्यार्थ्यांची परीक्षेच्या दृष्टीने आपोआप तयारी होत असे. व्याकरण शिकवताना देखील असेच सोप्या पद्धतीने विविध उदाहरणे देऊन ते शिकवत असत.

मी आबासाहेबांचा विद्यार्थीही होतो आणि नंतर त्यांच्या हाताखाली काम करणारा सहकारी शिक्षक देखील. त्यांच्या उपस्थितीत शिक्षक म्हणून काम करणे हीसुद्धा माझ्यासाठी अतिशय आनंदाची आणि समाधानाची बाब होती. 

पुराणांमध्ये देवांसाठी कार्य करणाऱ्या नवीन सुंदर अशा सृष्टीची निर्मिती करणाऱ्या शिल्पकाराला देवशिल्पी विश्वकर्मा असे म्हटले जाते. आमच्यासाठी सर म्हणजे देवशिल्पी विश्वकर्मा ! असंख्य विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आपल्या शिकवणुकीने आकार देणारा हा विश्वकर्मा ! त्यांच्या हातांचा परिस स्पर्श ज्यांना ज्यांना झाला, त्यांचे त्यांचे जीवन घडले. देणाऱ्याने देत जावे या कविवर्य विंदा करंदीकर यांच्या उक्तीप्रमाणे ते विद्यार्थ्यांना भरभरून देत गेले. त्यांनी काही धनदौलत, पैसा दिला का ? त्यांनी वाटला तो ज्ञानाचा प्रकाश आणि संस्कारांची शिदोरी. ही जगातली अत्यंत दुर्मिळ गोष्ट ! विकत घेता येत नाही आणि विकताही येत नाही. ती ज्याच्याजवळ असेल, तोच ती इतरांना भरभरून देऊ शकतो. हा प्रकाश आणि ही शिदोरी आजही अनेक विद्यार्थ्यांना आपल्या आयुष्याच्या वाटेवर मार्गदर्शन करीत आहे. देणाराने देत जावे या उक्तीनुसार ते भरभरून देत गेले आणि आम्ही आमच्या पात्रतेप्रमाणे घेत गेलो. खरं तर हे दान घेण्यासाठी आमची ओंजळ अपुरी पडली. त्यांचा वारसा यथाशक्ती, यथामती पुढे चालवण्याचा प्रयत्न करतो आहे. 

कधी कधी बोलताना आबासाहेब त्यांच्या सुरुवातीच्या दिवसाबद्दल सांगत अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतले सुखदुःखाचे अनेक आघात त्यांना काळाच्या ओघात झेलावे लागले. सुरुवातीला उत्तम असणारी दृष्टी नंतर अधू झाली. त्यांनी त्यासाठी अनेक उपाय केले परंतु काही उपयोग झाला नाही. परंतु आपली जिद्द आणि इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी या अधू-दृष्टीच्या व्यंगावरही मात करून आपल्या विद्यार्थ्यांना डोळसपणे घडवले हे त्यांचे मोठेपण आहे. प्रतिकूल परिस्थिती आणि संकटे यामुळे ते कधी खचून गेले नाहीत किंवा हताश झाले नाहीत. आपले आनंदी मनोवृत्ती आणि सकारात्मक दृष्टिकोन त्यांनी कायमच जागृत ठेवला. त्याची पेरणी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये केली. आबासाहेबांचे अनेक विद्यार्थी आज देशात आणि परदेशात मोठ मोठ्या पदांवर उत्तम प्रकारे कार्यरत आहेत. 

पडद्यावरील हिरो आणि रियल लाईफ हिरो यात फार मोठा फरक आहे. पडद्यावरील नायक फक्त ती भूमिका जगत असतो. परंतु वास्तव जीवनातील हा नायक अनेक अडीअडचणींना तोंड देऊन समाजाला प्रगतीपथावर नेत असतो. अमृतकार सर हे असे रियल लाईफ हिरो आहेत. करोडो रुपयांची संपत्ती असणारा एखादा कारखानदार किंवा नेता समाज मान्यता पावत असेल किंवा प्रतिष्ठा मिळवत असेल परंतु ज्यांचे पाय आवर्जून धरावे असे पाय आज मात्र अभावाने दिसतात. असे पावन पवित्र असे चरण सरांचे आहेत की ज्यांना हजारो विद्यार्थी आदराने वंदन करतात. आजही बाहेरगावचे किंवा परदेशातील विद्यार्थी चाळीसगावी आले की सरांची आवर्जून भेट घेतात. त्यांचे आशीर्वाद घेतात. 

काही कारणामुळे आबासाहेब शाळेचे मुख्याध्यापक जरी होऊ शकले नाहीत तरी ती उणीव त्यांनी आपल्या कर्तृत्वाने भरून काढली आणि आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला. त्यांच्या प्रति समाजामध्ये प्रचंड आदर होता संस्थेची ज्यावेळी निवडणूक झाली, त्यावेळी सभासदांनी भरभरून मते देऊन त्यांना संचालक म्हणून निवडून दिले. हीच त्यांच्या कामाची पावती होती. ते चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे संचालक झाले आणि या संचालक पदावर काम करत असताना देखील विद्यार्थी, शिक्षक पालक आणि संस्थेचे अन्य संचालक यांना आजही वेळोवेळी आवश्यकतेप्रमाणे ते मार्गदर्शन करीत असतात. आज वयाच्या ८७ व्या वर्षी देखील ते कार्यरत आहेत. आपल्या कार्यपूर्तीचे समाधान त्यांच्याजवळ नक्कीच असेल. अशा या ज्ञानतपस्वी असलेल्या गुरुवर्य आबासाहेब अमृतकार सरांना परमेश्वर उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना !

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव

२८/१२/२०२५

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...