मुख्य सामग्रीवर वगळा

कोचिंग क्लासेस आणि पालकांची हतबलता

 उगवतीचे रंग 

कोचिंग क्लासेस आणि पालकांची हतबलता

​आजकाल कोणत्याही शहरात गेले की कोचिंग क्लासेसचे बोर्ड बघायला मिळतात. टॉपर्स आणि रँकर्सचे फोटो. त्यांचे स्पर्धा परीक्षेतील सुयश म्हणजे टक्केवारी ! यालाच तुम्ही आम्ही शिक्षण म्हणतो. परंतु हे शिक्षण नव्हे किंवा संस्कारही नव्हेत. हे फक्त प्रमाणित करणे आहे. एखादा विद्यार्थी एवढं एवढं शिकला आहे किंवा हे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला आहे हेच त्यातून सिद्ध होतं. पण त्याने ज्ञानार्जन किती केले आहे किंवा त्याच्यावर संस्कार किती झाले आहेत, एक माणूस म्हणून जगण्यासाठी ज्या ज्या काही उपयुक्त गोष्टी आहेत त्या तो शिकला आहे का या प्रश्नांचे उत्तर दुर्दैवाने नकारार्थी येते. 

परंतु आजकाल वातावरणच असे निर्माण झाले आहे. या सगळ्या कोचिंग क्लासेसच्या जाहिराती पाहून पालकांना सुद्धा आपल्या मुलांना अशा प्रकारच्या कोचिंग क्लासेस मध्ये घालावे असे वाटते. त्यातही ज्या चांगल्या संस्था असतात त्यांची फी भरमसाठ असते. अनेक पालकांना ती परवडत नाही. प्रसंगी कर्ज काढून पालक आपल्या मुलाला अशा कोचिंग क्लासेसमध्ये दाखल करतात. उद्देश एकच असतो की त्याने परीक्षेमध्ये किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तम प्रकारे यश मिळवून चांगली शाखा किंवा चांगली नोकरी मिळवावी. हे क्लासेस विद्यार्थ्यांना परीक्षार्थी बनवतात. इंग्रजांच्या काळात इंग्रजांना जसे इंग्रजी मानसिकता तयार झालेले भारतीय कारकून हवे होते तशाच प्रकारचे परीक्षार्थी नोकरीच्या दृष्टिकोनातून हे क्लासेस घडवतात. 

शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होत चालली आहे आणि कोचिंग क्लासेस भरभरून वाहत आहेत. एखाद्या शिक्षकाने विद्यार्थ्यांना कितीही चांगल्या पद्धतीने शाळेत किंवा महाविद्यालयात शिकवण्याचा प्रयत्न केला तरी मुलांचे तिकडे लक्ष नसते. त्यांची एकाग्रता होत नाही याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे. तर अभ्यासक्रमातील काही भाग शिकवत असताना हे आमच्या क्लासमध्ये शिकवले गेले आहे म्हणून मुले लक्ष देत नाहीत अशी दुर्दैवी परिस्थिती आहे. काही शिक्षण संस्था आणि कोचिंग क्लासेस यांच्या संगनमताने हे कोचिंग क्लासेस सुरू असतात. त्यातून काही संस्थाचालक आपले उखळ पांढरे करून घेतात.

सकाळचे सहा वाजले की गाढ झोपलेल्या मुलाला आईचा आवाज ऐकू येतो. " उठ रे बाळा, आज टेस्ट आहे ना ?" बिचारा मुलगा डोळे चोळत विचार करतो, ‘शाळेची टेस्ट की क्लासची?’ आता शाळा आणि क्लास या एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत. फरक फक्त इतकाच की, शाळा ' संस्कार ' द्यायचा प्रयत्न करते आणि क्लासेस देतात ' रँक ' आणि घेतात पैसे मोजून ! अशा रीतीने आपला लाडका बाळ रँक होल्डर होतो !

पूर्वी मुलं शाळेतून आली की दप्तर एका कोपऱ्यात फेकून मैदानाकडे धावायची  आणि पालकांना त्यांना घरी बोलावून आणावे लागायचे. खेळण्यामुळे त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहायचे. पण आता सगळेच बदलले आहे. शाळेतून किंवा महाविद्यालयातून घरी आल्याबरोबर त्यांना कोचिंग क्लासेसला जावे लागते. या सगळ्या धावपळीत आपल्या मुलाचे बालपण किंवा तारुण्य कोमेजून जात आहे याची जाणीव पालकांना अभावानेच होते. सकाळी शाळा किंवा कॉलेज आणि नंतर कोचिंग क्लासेस यातच त्याचे बालपण, ऊर्जा आणि आनंद हरवून जातो. खरं म्हणजे नवीन ज्ञान शिकण्याचा जो आनंद असतो तो अशा या वातावरणामध्ये कसा मिळणार ?

स्पर्धा परीक्षांच्या वाढत्या स्पर्धेत कोचिंग क्लासेसची मदत घेणे इथपर्यंत ठीक आहे. एखादा कठीण विषय समजून घेण्यासाठी किंवा परीक्षेचे तंत्र आत्मसात करण्यासाठी क्लासेस नक्कीच उपयुक्त ठरतात. पण अडचण तेव्हा येते जेव्हा कोचिंग क्लासेस हे शाळा-कॉलेजांना 'पर्याय' ठरू लागतात. शाळेची जागा कोचिंग क्लासेस घेऊ शकत नाहीत. शाळा हे ते ठिकाण आहे जिथे आपण जगायला शिकतो, मित्र जोडतो आणि संघभावना शिकतो. जेव्हा क्लाससाठी शाळा बुडवली जाते किंवा शाळा केवळ नावापुरती उरते, तेव्हा शिक्षणाचा मूळ हेतूच हरवतो. क्लासेसने केवळ अभ्यासातील उणिवा भरून काढण्याचे काम करावे, ते शिक्षणाचे 'मुख्य केंद्र' बनू नयेत. क्लासेसने त्यांना पूर्णपणे परीक्षार्थी बनवले आहे. ही मुलं विज्ञानाचे नियम तोंडपाठ करतात, पण पावसाचा आनंद घ्यायला त्यांना वेळ नसतो. त्यांना गणितातले 'प्रॉब्लेम्स' सोडवता येतात पण आयुष्यातला एखादा प्रॉब्लेम आला की मात्र ते गोंधळून जातात.

पालकांनी हे लक्षात घ्यायला हवे की, मुलाला 'स्पर्धक' बनवण्याआधी त्याला एक समृद्ध 'विद्यार्थी' म्हणून शाळेत घडू देणे जास्त गरजेचे आहे. शाळा हेच मुख्य व्यासपीठ असायला हवे आणि कोचिंग हे केवळ त्याला दिलेले एक पूरक पाठबळ असावे. पालकांनी मुलांच्या निकालाच्या टक्केवारीपेक्षा त्यांच्या आनंदाची टक्केवारी मोजायला शिकावे. क्लासेस लावण्यापूर्वी त्यांच्या आवडीची 'क्लास' ओळखा.

​आयुष्याची खरी परीक्षा वर्गाच्या बाहेर असते, तिथे कोणताही क्लास कामाला येत नाही, तिथे फक्त तुमची जिद्द आणि शाळेत शिकलेले मूलभूत संस्कारच कामी येतात. शेवटी, शाळा आपल्याला 'आयुष्य' नावाच्या मोठ्या परीक्षेसाठी तयार करत असते! शिक्षण संस्थांनी देखील या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्या शाळा महाविद्यालयातून उत्तम प्रकारचे शिक्षण, संस्कार मिळतील याकडे लक्ष द्यावे आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शाळा महाविद्यालयांकडे पुन्हा कसे वळतील यासाठी प्रयत्न करावेत. 

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव. 

२३/१२/२०२५

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...