मुख्य सामग्रीवर वगळा

नार्सिस आणि आपण..

 उगवतीचे रंग 

नार्सिस आणि आपण...

ग्रीक पुराणातील नार्सिसची (Narcissus) गोष्ट मोठी मजेशीर आणि बोधप्रद आहे. नार्सिस अत्यंत देखणा आणि बांधेसूद शरीराचा आहे. तो शिकारी आहे. तो इतका देखणा आहे की स्त्रियाच काय परंतु पुरुष देखील त्याच्यावर मोहित होतात. परंतु आपल्या रूपाचा आणि शरीरसौष्ठवाचा त्याला अहंकार होतो. हा अहंकार इतक्या पराकोटीला पोहोचतो की तो समोर येईल त्या प्रत्येक व्यक्तीचा अपमान आणि तिरस्कार करायला लागतो. एकदा तो जंगलात शिकार करत असताना एका तळ्याकाठी येतो. तिथे त्याला इको ही अप्सरा भेटते. ती अत्यंत सुंदर असते पण तिला देखील तो तिरस्कार आणि दूर लोटतो.

या इकोची कहाणी सुद्धा मोठी मजेशीर आहे. ग्रीक देवांचा राजा झ्युस (Zeus) हा भोगविलासी असतो. तो नेहमी अप्सरांच्या बरोबर वेळ घालवत असतो. त्याच्या नाचगाण्यात मग्न असतो. अशावेळी बऱ्याचदा त्याची पत्नी हेरा (Hera)येते आणि त्याच्या नाचगाण्यात आनंदात व्यत्यय येतो. ती त्याला त्यापासून परावृत करण्याचा प्रयत्न करते. झ्युसला ही गोष्ट आवडत नाही आणि तो हेराला दूर ठेवण्यासाठी इकोची मदत घेतो. इको ही खूप बोलणारी आणि गप्पिष्ट असते. ती आपल्या गोड बोलण्यात हेराला गुंतवून ठेवते. पण लवकरच तिचे हे कारस्थान हेराच्या लक्षात येते आणि ती तिला शाप देते. ती म्हणते, " यापुढे तुला बोलता येणार नाही इतरांनी बोललेल्या वाक्याचा शेवटचा भागच तुला बोलता येईल. "

शाप मिळाल्यानंतर इको कोणाशीही नीट संवाद साधू शकत नव्हती. एके दिवशी तिने जंगलात शिकारीसाठी आलेल्या सुंदर नार्सिसला पाहिले आणि ती त्याच्या प्रेमात पडली. ती नार्सिसचा पाठलाग करू लागली, पण शापामुळे ती स्वतःहून त्याला साद घालू शकत नव्हती.

​जेव्हा नार्सिसने विचारले, "इथे कोणी आहे का?" तेव्हा इको फक्त शेवटचा शब्द बोलू शकली, "आहे का ?" नार्सिसने तिला बाहेर येण्यास सांगितले, पण जेव्हा ती त्याच्या समोर गेली आणि तिने त्याला मिठी मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा गर्विष्ठ नार्सिसने तिचा धिक्कार केला आणि तिला तिथून निघून जाण्यास सांगितले.

या गोष्टीचा बिचाऱ्या इकोच्या मनावर खूप मोठा परिणाम झाला. आतापर्यंत असा अनुभव तिला कधी आला नव्हता. तिला काही सुचेना. ती शोकमग्न झाली आणि एका गुहेत जाऊन बसली. तिने खाणे-पिणे सोडले. हळूहळू तिचे शरीर नष्ट होत गेले आणि उरला  फक्त तिचा आवाज ! त्यालाच आपण इको ( Echo ) म्हणतो.  पर्वतावरील दऱ्याखोऱ्यातून हा आवाज आपल्याकडे परत येतो.

परंतु यामुळे नेमेसिस ही सुडाची देवता संतापली तिने  नार्सिसला शाप दिला. " तू ज्या व्यक्तीवर प्रेम करशील ती व्यक्ती तुला कधीच प्राप्त होणार नाही." नार्सिस तळ्याच्या काठी बसला होता. तळ्यातील स्वच्छ पाण्यात त्याचे सुंदर प्रतिबिंब पडले होते तो स्वतःच्या प्रतिबिंबावर इतका मोहित झाला की ते प्रतिबिंब आपले स्वतःचेच आहे हे त्याच्या लक्षातही आले नाही आणि ती व्यक्ती ( म्हणजे प्रतिबिंबातील ) आपल्याला मिळावी अशी तीव्र इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. परंतु तो आपल्या जागीच स्थिर झाला. तिथेच त्याचा मृत्यू झाला. काही लोकांच्या मते त्याने आपले प्राण त्यागले. त्याचा ज्या जागी मृत्यू झाला त्या जागी सुंदर डॅफोडील्सची सुंदर फुले उमलली. सौंदर्याचा गर्व शेवटी निसर्गात विलीन होतो असेच यातून सूचित होते.

या पुराणकथेतील देवांचा राजा झ्युस याचे आपल्या पुराणकथेतील स्वर्गाचा राजा इंद्र याच्याशी साम्य दिसते. इंद्र नेहमी असाच भोगविलासात मग्न असलेला दिसतो. झ्युस ची पत्नी हेरा आणि इंद्राची पत्नी शचि यांच्यातही साम्य वाटते. दोन्हीही पतिव्रता आणि शाप देण्याचे सामर्थ्य असलेल्या आहेत. 

परंतु नार्सिस आणि इको यांची कथा आपल्याला खूप काही शिकवून जाणारी आहे. नार्सिस म्हणजे स्वमग्न असणाऱ्या व्यक्तींचा प्रतिनिधी ! अशा माणसांना स्वतः खेरीज दुसरे काही सुचत नाही इतरांना ते महत्त्वच देत नाहीत. मी आणि माझं याच्या पलीकडे ते जाऊ शकत नाहीत. त्यांच वर्तुळ मर्यादित असतं. त्यातून अहंकार जन्माला येतो मग तो अहंकार रूपाचा, सत्तेचा, पैशाचा किंवा आणखी कशाचाही असू शकतो. या अहंकारापोटी ही माणसे दुसऱ्याला तुच्छ समजू लागतात. नार्सिसला स्वतः पलीकडे काही दिसत नव्हते. प्रेमाने जवळ आलेल्या इकोला त्याने दूर लोटले. अशी माणसे शेवटी स्वतःचाच नाश करून घेतात. आपल्याकडील रावणाची कथा अशीच आहे. त्याला स्वतःच्या शक्तीचा सामर्थ्याचा केवढा अहंकार झाला होता ! मी सर्व शक्तिमान आहे. माझ्या विरोधात कोणीच लढू शकत नाही असा गर्व त्याला झाला होता. प्रत्यक्ष भगवान शंकरांना देखील आव्हान देण्याचा प्रयत्न त्याने केला होता. या अहंकारातूनच त्याचे हातून चुका घडत गेल्या. विद्वान आणि सगळे काही जाणत असूनही त्याने नैतिकतेच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या. प्रभू रामचंद्रांना तो एक तुच्छ मानव समजत होता. त्यांच्या हातूनच त्याचा अंत झाला. 

अशी अनेक उदाहरणे आजही बघायला मिळतात. जी माणसे स्वतःतून बाहेर पडू शकत नाही आणि इतरांसाठी ज्यांना काही करता येत नाही अशी माणसे स्वतःच अडकून बसतात आणि त्यांची पुढची प्रगती थांबते, विकास थांबतो. इको म्हणजे प्रतिध्वनी ! तिचे पुराणकथेतील पात्र प्रतीकात्मक घ्यायला हवे. हे पात्र कर्माचा सिद्धांत सांगते. जसा प्रतिध्वनी आपल्याकडे परत येतो तसे आपण जसे कर्म करू तसे ते आपल्याकडे परत येते. इको स्वतःचे अस्तित्व हरवून बसली. स्वतःचे कर्तव्य विसरली. जी व्यक्ती स्वतःचे अस्तित्व हरवून बसते, आपले कर्तव्य विसरते, तिचा देखील इकोसारखाच विनाश होतो. या सगळ्या व्यक्तिरेखा पौराणिक असतीलही परंतु त्या आपल्याला खूप काही सांगून जातात.

नार्सिससारखी प्रवृत्ती असणे म्हणजे नार्सिसिझम. आजच्या सोशल मीडियाचा प्रभाव असणाऱ्या काळात खूप लोक स्वतःच्या प्रतिमेत अडकलेले दिसतात. वारंवार स्वतःची सेल्फी घेणे, स्वतःचे फोटो सोशल मीडियावर शेअर करणे, स्वतःला मिळालेले लाईक यामध्ये समाधान मानणे यातच ते अडकलेले दिसतात. रस्त्यावर एखादा अपघात झालेला असेल तर त्या अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करण्याऐवजी ते त्याचा व्हिडिओ बनवणे किंवा रील तयार करणे यात मग्न दिसतील. मग तो सोशल मीडियावर टाकून आपल्याला किती लाइक्स मिळतात यावर समाधान मानतील. अशा व्यक्तींना इतरांनी मदतीसाठी पसरलेले हात दिसत नाहीत. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर नार्सिसिझम हा एक असा तुरुंग आहे ज्याच्या भिंती आरशांनी बनलेल्या असतात. यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तो आरसा फोडून समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घेणे, प्रसंगी आपले दुःख बाजूला ठेवून इतरांना मदत करणे. मी ऐवजी आपण सर्व अशी भावना ठेवणे, आभासी जगाऐवजी वास्तवाचे भान ठेवणे, इतरांना निरपेक्ष भावनेने मदत करणे, इतरांबद्दल कृतज्ञता बाळगणे यासारख्या अनेक गोष्टी करता येतील.

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

२०/१२/२०२५

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा  )



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...