मुख्य सामग्रीवर वगळा

विळखा ऑनलाइन गेम्सचा

 उगवतीचे रंग 

विळखा ऑनलाइन गेम्सचा...

परवा एका मित्राच्या घरी गेलो. तो एकटाच होता. वहिनी दिसत नव्हत्या. त्याला म्हटलं," काय रे, वहिनी गावाला गेल्या आहेत का ?" तो म्हणाला, " हो अरे, ती मयुरीकडे गेली आहे. आता तीन महिने तिकडेच राहणार. " मयुरी म्हणजे माझ्या मित्राची मुलगी पुण्यात असते. आता तिचा मुलगा दहावीला आहे. मार्चमध्ये त्याची परीक्षा आहे. परंतु तो मुलगा अभ्यास करण्यापेक्षा मोबाईल जास्त पाहतो, सतत ऑनलाईन गेम्स खेळत असतो. मित्राच्या मुलीला आणि जावयाला असे वाटते की या सगळ्याचा परिणाम त्याच्या परीक्षेतील गुणवत्तेवर होऊ नये म्हणून त्यांनी त्याच्या आजीला दोन-तीन महिने बोलावून घेतले आहे. कारण ते दोघे नोकरी निमित्ताने बाहेर असतात. मग घरी त्याच्यावर लक्ष कोण ठेवणार ? ते ऐकून मला खूप आश्चर्य वाटले. मुलांचे ऑनलाईन गेम्सच्या आहारी जाणे खरोखरच काळजी वाटावी इतके वाढले आहे.

अगदी लहान मुलांपासून तरुणांपर्यंत आणि काही मोठी माणसे सुद्धा या व्हिडिओ गेम्स आणि ऑनलाईन गेम्सच्या आहारी गेली आहेत. कुठेही गेले तरी प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसतो आणि कोणीतरी काहीतरी ऑनलाईन गेम किंवा व्हिडिओ गेम खेळताना दिसतो. सुरुवातीला करमणूक म्हणून काही वेळ त्यात घालवल्यानंतर त्याचे सवयीत कधी रुपांतर होते ते आपल्याला कळत नाही आणि मग त्याशिवाय जर राहवत नसले तर त्या सवयीचे रूपांतर व्यसनात झाले असे समजायला हरकत नाही.

हल्ली आई वडील आपल्या कामात खूप व्यस्त असतात. त्यामुळे मुलांसाठी त्याला वेळ देता येत नाही. अशावेळी विरंगुळा म्हणून किंवा करमणूक म्हणून ते त्याच्या हातात मोबाईल देतात आणि मग त्याला हळूहळू व्हिडिओ गेम्स किंवा ऑनलाईन गेम्सचे व्यसन लागते. २०२३ च्या आकडेवारीनुसार भारतात जवळपास सहा कोटी लोक ऑनलाईन गेम्स खेळतात. त्यातही लहान मुलांचे आणि तरुणांचे प्रमाण मोठे आहे.

हे आभासी जग एवढे आकर्षक आहे की त्यामुळे प्रत्यक्षातील आपल्यासमोर असलेल्या चांगल्या गोष्टींकडे आपले लक्ष जात नाही. या गेम्समधील ग्राफिक्स एवढे आकर्षक असतात की लहान मुलांबरोबरच मोठ्यांना देखील त्याचा मोह पडतो. एकदा खेळायला सुरुवात केली की पॉईंट्स वाढत जातात आणि त्याचे वेडच लागते. मग पुढील पायरी, त्याच्या पुढील पायरी असे करत करत मुले या अजगराच्या विळख्यात अडकत जातात. हा विळखा त्यांना इतका करकचून आवळतो की त्यातून बाहेर पडणे अशक्य होते. अशावेळी जर पालकांनी मुलांच्या हातातील मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न केला तर मुलं चिडचिड करतात, प्रसंगी हिंसक बनतात आणि कधी कधी तर त्याच्या पुढची म्हणजे आत्महत्येची पायरी गाठण्यापर्यंत त्यांची मजल जाते. या खेळांचे व्यसन लागल्यामुळे मुले एकलकोंडी बनतात. घरात असलेल्या आई-वडिलांशी देखील बोलण्याची त्यांची इच्छा होत नाही. ते आपल्याच आभासी जगात रमलेले असतात. ही एक प्रकारची नशाच असते. यालाच डिजिटल ड्रग्स असेही म्हटले जाते. हेडफोन लावून जगाच्या कानाकोपऱ्यातील लोकांशी बोलण्याची सोय पालकांशी बोलण्यापेक्षा त्यांना अधिक मजेशीर वाटते. कुटुंबातील सदस्यांपासून मुले अशा रीतीने लांब जातात.

काही ऑनलाईन गेम्स हे पेड असतात. अशावेळी मुले पालकांच्या ऑनलाइन कार्डाचे डिटेल्स वापरून हे गेम्स डाउनलोड करून घेतात. तसेच त्यात वेळोवेळी होणारी पैशाची मागणी देखील पुरवतात. हे गेम्स खेळत असताना बऱ्याच वेळा अनेक जाहिराती किंवा व्हिडिओ क्लिप्स पॉप अप होतात. अशा व्हिडिओ क्लिप मध्ये बऱ्याच वेळा संवेदनशील किंवा मुलांनी पाहू नये अशा प्रकारचा अडल्ट कंटेंट असतो. त्यामुळे मुलांच्या भावना नको त्या वयात उद्दीपित होतात, मुले भरकटतात आणि अभ्यासापासून दूर जातात. 

या खेळामुळे मुलांचे आर्थिक आणि शारीरिक असे दोन्ही प्रकारचे नुकसान होत असते. मोबाईलकडे सतत टक लावून बघत राहिल्यामुळे डोळ्यांचे विकार होतात, सतत एकाच जागी बसून राहिल्यामुळे आणि शारीरिक हालचालीचा अभाव असल्यामुळे लठ्ठपणामध्ये वाढ होते आणि त्यामुळे आजारांचे प्रमाण वाढते. या ऑनलाईन गेम्स चा अतिवापर मानसिक आरोग्य बिघडवणारा सुद्धा ठरतो. चिडचिडेपणा, एकाग्रतेचा अभाव, अभ्यासातील रुची कमी होणे आणि हिंसक प्रवृत्ती वाढणे यासारखे दुष्परिणाम होतात. ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून होणारी आर्थिक फसवणूक होण्याची दाट शक्यता असते तसेच संवेदनशील किंवा गोपनीय माहिती फसवणूक करणाऱ्यांच्या हाती लागल्यास ते त्याचा गैरवापर करण्याची शक्यता असते.

एक काळ असा होता की मुले ग्राउंडवर खेळण्यात रमून जात. निरनिराळे मैदानी खेळ खेळत. बऱ्याच वेळा पालकांना त्यांना ओढून आणावे लागत असे. पण आता मात्र ते व्हिडिओ गेम्स किंवा ऑनलाइन गेम्समध्ये एवढे अडकले आहेत की त्यातून त्यांना बाहेर काढणे आणि पुन्हा मैदानी खेळांकडे वळवणे कठीण झाले आहे. 

याचा अर्थ मुलांनी ऑनलाईन गेम्स खेळूच नयेत असा नाही. पण त्यांना स्क्रीन टाईम ठरवून द्यावा. अनेक देशांमध्ये मुलांच्या मोबाईल वापरावर आणि इंटरनेटच्या वापरावर कठोर बंधने आहेत. अमेरिकेसारख्या देशात सहा ते बारा वयोगटातील मुलांना फक्त एक तास मोबाईलवरील गेम्स खेळण्याची तर सहा वर्षाखालील मुलांना फक्त अर्धा तास गेम्स खेळण्यासाठी परवानगी आहे.

या सगळ्यात पालकांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. पालकांनी मुलांसाठी वेळ तर द्यायलाच हवा परंतु त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधायला हवा. ऑनलाइन फसवणूक कशी होऊ शकते आणि त्यातील धोके कोणकोणते आहेत याची माहिती त्यांना द्यायला हवी. आणि यदाकदाचित त्यांच्याकडून एखादी चूक झाली तरी त्यांना न रागावता त्यातून बाहेर कसे काढता येईल यासाठी डोके शांत ठेवून मार्गदर्शन करायला हवे. 

शक्य झाल्यास त्यांना स्वतः मैदानावर घेऊन जावे. मुलांच्या गर्दीने जर मैदानी गजबजली तर रुग्णालयातील गर्दी कमी होईल हे लक्षात ठेवावे आणि त्यांना पटवून द्यावे. मैदानावरील खेळामळे मुलांची शारीरिक आणि मानसिक निकोप वाढ होते, त्यांची शक्ती वाढते, एकाग्रता वाढते, नेतृत्व गुणांचा विकास होतो हे त्यांच्या मनावर बिंबवले पाहिजे. एकदा मुलांना त्याची आवड लागली की मग मुले स्वतःहूनच मैदानावर खेळायला पसंती देतील. 

मुलांचा मोबाईल एकदम काढून घेण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने त्यांना त्याच्याशिवाय राहण्याची सवय लावा. त्याने तुमचे ऐकल्यानंतर त्याला छोटेसे बक्षीस द्या किंवा त्याचे कौतुक करा. जेवणाच्या टेबलावर किंवा अभ्यासाच्या खोलीत मोबाईल घेऊन जाऊ देऊ नका. त्याचप्रमाणे मुलांना गाणी म्हणणे, चित्रे काढणे, वाचन करणे, बागकाम करणे यासारख्या गोष्टींची आवड लावता येईल. पण त्यासाठी पालकांना देखील स्वतःचे काम किंवा मोबाईल बाजूला ठेवून मुलांसाठी वेळ द्यावा लागेल. तरच भावी पिढीचे भविष्य उज्ज्वल होईल.

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

१६/१२/२०२५

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...